भारतात
शेती क्षेत्रात मोठी क्षमता आहे, शेती व्यवसायात कुशल मनुष्यबळ निर्मिती होणे गरजेचे
असून स्वयंरोजगार उपलब्ध मनुष्य बळाचे कौशल्य विकसित होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन
कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनी केले. ते
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि नवी दिल्ली येथील सी. एन. एच.
इंडस्ट्रीयल इंडिया (न्यू हॉलंड), यांच्या सामाजिक एकीत्वाच्या माध्यमातून शेतकरी व
ग्रामीण युवकांसाठी सुधारित शेती औजारांचा योग्य वापर, निगा व देखभाल या विषयावरील
तीन दिवसीय प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी दिनांक १८ सप्टेंबर रोजी अध्यक्षीय भाषणात
बोलत होते. ते पुढे म्हणाले की कृषि औजारांची व यंत्राची व्यवस्थित काळजी घेतली नाही
तर त्यांचे आयुष्यमान कमी होऊन इंधन खर्चातही वाढ होते. तो तोटा टाळण्यासाठी सुधारित
शेती औजारांची योग्यरीत्या निगा व देखभाल करण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.
या
प्रसंगी शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता (कृषि ) डॉ. उदय खोडके यांनीही
प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक
डॉ. भगवान आसेवार व्यासपीठावर उपस्थित होते., पशु संवर्धनाचे यांत्रिकीकरण
योजनेच्या संशोधन अभियंता डॉ. स्मिता सोलंकी यांनी प्रास्ताविक केले.
कार्यक्रमात शेतकरी प्रतिनिधी ज्ञानोबा पारदे, भारत आव्हाड आणि शीतल कच्छवे यांनी मनोगत व्यक्त केले. सदरील प्रशिक्षणात विविध कृषि औजारे जसे की, पर्हाटी भुकटी यंत्र, खत पसरणी यंत्र , ड्रोन द्वारे फवारणी, सौर फवारणी यंत्र इत्यादी औजारांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले, तसेच विद्यापीठात नव्यानेच उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र मेक्यानायझेशन फार्ममध्ये शेतकऱ्यांना ट्रक्टरच्या विविध भागांची प्रात्यक्षिका द्वारे माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्र संचलन डॉ. मधुकर मोरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. दत्तात्रय पाटील यांनी मानले. कार्यक्रमास विभाग प्रमुख डॉ. राहुल रामटेके, डॉ. स्मिता खोडके, डॉ. सुभाष विखे, डॉ. रवी शिंदे, डॉ. दयानंद टेकाळे,डॉ. गोपाल शिंदे, डॉ. प्रमोदिनी मोरे आदि उपस्थित होते. प्रशिक्षणात परभणी जिल्ह्यातील ५५ शेतकरी सहभागी झाले.