विद्यापीठाचे शेतकरी केंद्रित आणि त्यांच्या हितार्थ कार्य ... कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि
माननीय कुलगुरू
डॉ. इन्द्र मणि यांनी त्यांचा अकोला येथील
दौऱ्यादरम्यान जिल्ह्यातील मौजे घुसर आणि आळंदा यागावी भेट देवून संपूर्ण एक दिवस
बळीराजा सोबत व्यतीत केला. त्यांनी शाश्वत शेतीसाठी यांत्रिकीकरण, ड्रोनसारख्या
आधुनिक तंत्रज्ञावर भर देवून स्वयंचलित शेतीसाठी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी
शेतकऱ्यांच्या विविध समस्या ऐकूण घेतल्या व त्यावर उपयोजना सुचविल्या.
याबरोबरच पूर्णा तालुक्यातील सोन्ना येथील कार्यक्रमात कुलगुरू मा. डॉ. इन्द्र
मणि हे ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी विद्यापीठाचे शेतकरी
केंद्रित आणि त्यांच्या हितार्थ कार्य करत असून विद्यापीठाच्या विविध उपक्रमाविषयी
माहिती दिली. तसेच सद्यपरिस्थितीमध्ये जो कीड रोगांचा प्रादुर्भाव होत आहे,
त्याकरिता आठवड्यातून दोन वेळा विद्यापीठातर्फे ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांच्या
प्रश्नांना शास्त्रज्ञांद्वारे उत्तरे देऊन त्यांच्या शंकांचे समाधान करण्यात येत
आहे. यास शेतकऱ्यांचा भरघोस प्रतिसाद सुद्धा मिळत आहे. विद्यापीठ शेतकरी प्रथम हे
ध्येय ठेवून कार्य करत आहे. येणाऱ्या १७ सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम
दिनाचे औचित्य साधून विद्यापीठातर्फे रबी पीक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.
त्याकरिता त्यांनी सर्व शेतकऱ्यांना सदरील कार्यक्रमास येण्याचे निमंत्रण दिले.
विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, यांनी सोन्ना येथे शेतकऱ्यांनी उत्पन्न
वाढविण्यासोबतच योग्य तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचा खर्च हा कमी करावा जेणेकरून
आपली आर्थिक जोखीम कमी करता येईल असे नमूद केले. यावेळी डॉ गजानन गडदे आणि डॉ. दिगंबर पटाईत यांनीही
मार्गदर्शन केले.
याबरोबरच मराठवाड्यातील बऱ्याच भागातील अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकावर पिवळा
मोझॅक तसेच काही ठिकाणी हिरवा मोझॅक म्हणजेच केवडा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता.
पिवळा मोझॅक या रोगाचा जास्त प्रादुर्भाव झाल्यामुळे काही शेतकऱ्यांना संपूर्ण
पिकचं उपटून टाकावे लागते. तसेच कपाशीतील गुलाबी बोंडअळी व बोंडसड हि एक समस्या
समोर येत आहे. याकरिता गावाना भेटी देऊन सोयाबीन, कापूस आणि तूर पिकातील कीड व रोग
व्यवस्थापना संबंधी तसेच सततच्या पावसानंतर तूर पिकात घ्यावयाची काळजी संबंधी
मार्गदर्शन विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांद्वारे करण्यात आले . शास्त्रज्ञांनी शेतकरी
करत असलेल्या विविध उपक्रमाची पाहणी केली व त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी तांत्रिक
मार्गदर्शन केले. यावेळी शेतकऱ्यांच्या शेतावर भेटीस भर देण्यात आला.