Thursday, September 26, 2024

वनामकृविच्या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ निमित्त मार्गदर्शन

 यशासाठी प्रमाणिक प्रयत्न आवश्यक....डॉ. उदय खोडके

नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार दीक्षारंभ कार्यक्रमाचे नव्याने प्रवेशीत प्रथम वर्षीय विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात येते. दीक्षारंभ कार्यक्रम विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर त्यांना महाविद्यालयातील विविध विभागांची आणि शिक्षक तसेच शिक्षकेतर अधिकारी कर्मचाऱ्यांची ओळख होवून विद्यार्थी महाविद्यालयात रूळण्यासाठी महत्वाचा आहे. याकरिता दीक्षारंभ कार्यक्रमांतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात मार्गदर्शन दिनांक २५ सप्टेंबर रोजी आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी भाषणात शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके हे होते. रेवाडी (हरियाणा) येथील वरिष्ठ कृषी अभियंता आणि उद्योजक इजि. रामबीर यादव हे प्रमुख पाहुणे होते. व्यासपीठावर जिमखाना उपाध्यक्ष डॉ. राहुल रामटेके, रेवाडी (हरियाणा) येथील सेवा निवृत्त लेखा अधिकारी श्री. दीपक यादव, राष्ट्रीय विमा योजनेचे सेवा निवृत्त विपणन व्यवस्थापक श्री. जगजित सिंग, विभाग प्रमुख डॉ. स्मिता खोडके आणि डॉ. मदन पेंडके आदींची उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके म्हणाले की, यशासाठी प्रामाणिक प्रयत्नाची  आवश्यकता आहे. याशिवाय जिद्द आणि चिकाटी जोड द्यावी लागते. याकरिता कृषी अभियंत्यांमध्ये जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न ठेवून यश संपादन करण्याचे आवाहन केले. कृषी अभियांत्रिकीद्वारे रोजगार संधी व औद्योगिक क्षेत्रात असलेले महत्त्व यावेळी त्यांनी विशद केले.

यावेळी इंजि. रामबीर यादव यांनी कृषी अभियंत्यांचे समाजात असलेले महत्त्व सांगितले. याबरोबरच कृषी क्षेत्राच्या विविध बँक संबंधीत व औद्योगिक क्षेत्रातील कृषी अभियंत्यांना रोजगाराच्या संधींबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाद्वारे करण्यात आले. सूत्र संचालन प्रिया देशमुख यांनी तर आभार जिमखाना सचिव डॉ. गजानन वसु यांनी मानले. कार्यक्रमास सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.