Wednesday, September 25, 2024

वनामकृविच्या कृषी महाविद्यालयातील एनसीसी प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि महाविद्यालयातील एनसीसी युनिटसाठी तीन वर्षाच्या प्रशिक्षणाकरिता शारीरिक व शैक्षणिक गुणवतेच्या आधारावर विद्यार्थ्यांची निवड २३ सप्टेंबर रोजी विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणावर करण्यात आली. या निवड प्रक्रियेत परभणी मुख्यालयात असलेले कृषि, उद्यानविद्या, अन्नतंत्र, कृषि अभियांत्रिकी आणि सामुदायिक विज्ञान या पाच शाखेंच्या महाविद्यालयातील २०० विद्यार्थ्यांनी सहभागी घेवून विविध चाचण्या दिल्या. यातून २०२४-२५ या वर्षी एकूण ३७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये ३१ विद्यार्थी आणि ६ विद्यार्थिनींचा समावेश आहे. निवड झालेल्या छात्रसैनिकांचे कुलगुरु मा. डॉ. इन्द्र मणि तसेच शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पुरूषोत्तम झंवर यांनी अभिनंदन केले.

 विद्यार्थांची निवड प्रक्रिया एनसीसी ५२ महाराष्ट्र बटालियनचे  प्रशासकीय  अधिकारी कर्नल दिलीप रेड्डी यांच्या मार्गदर्शनात लेफ्टनंट डॉ. जयकुमार देशमुख व नायब सुभेदार  राकेश कुमार यांनी  प्राचार्य  डॉ. सय्यद इस्माइल उपस्थितीत पार पाडली. कर्नल दिलीप रेड्डी यांनी विद्यार्थ्यांच्या भौतिक सुविधा व भविष्यातील प्रशिक्षण कालावधी याबद्दल विचार विनिमय करुन ऑब्स्टेकल ट्रेनिंग कोर्स, इलेक्टिव एनसीसी निवड क्रेडिट कोर्स घेण्यात यावा अशी भावना कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. सय्यद इस्माइल यांच्याकडे व्यक्त केली. एनसीसी च्या कैडेट्स च्या वतीने मान्यवरांना गार्ड ऑफ़ ऑनर देऊन सन्मानित करण्यात आले. याबद्दल सहभागी छात्रसैनिकांचे  मान्यवरांनी कौतुक केले. एनसीसी बी आणि सी प्रमाणपत्र प्राप्त विद्यार्थाना सैन्य व तत्सम भरतीमधे अधिकारी पदाच्या  मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असल्यामुळे बहुतांश विद्यार्थी व  विद्यार्थ्यांनी भरतीस उपस्थित राहून त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यातूनच विद्यार्थ्यांची भारतीय सैन्याबद्दल आकर्षण व वर्दी मधे असण्याची महत्वकांक्षा दिसून येत होती.

निवड प्रक्रियेसाठी एनसीसी अंडर ऑफिसर हृषिकेश काळेअभिषेक खराडे, संदीप वाव्हळे, अंकुश  सत्वधर, अश्विनी काळे, विशाल  ढाले, वैभव  गायकवाड़, वैष्णवी  बनसकर आदी विद्यार्थ्यांनी परिश्रम  घेतले.