वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठात शिक्षण संचालनालयाच्या वतीने हवामान अनुकूल (क्लायमेट
स्मार्ट) शेती याविषयावर ग्वालियर (मध्य प्रदेश) येथील राजमाता विजयाराजे सिंधीया कृषि
विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू तथा भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या नैसर्गिक साधन
संपत्ती व्यवस्थापनचे माजी उप महासंचालक माननीय प्रा. (डॉ.) अनिल कुमार सिंह
यांचे व्याख्यान दिनांक १६ सप्टेंबर रोजी
आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. उदय
खोडके, संशोधन संचालक डॉ. खिजर
बेग आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ.
भगवान आसेवार आदींची उपस्थिती होती.
हवामान अनुकूल
(अचूक) शेती याविषयाचे तज्ञ माजी कुलगुरू माननीय प्रा. (डॉ.) अनिल कुमार सिंह यांनी हवामान बदलाची सुरुवातीस कारणे सांगितली. जागतिक,
देश आणि राज्य पातळीवरील होणारे हवामान बदलाचे प्रामुख्याने तापमानात वाढीच्या परिणामाविषयी
बोलताना ते म्हणाले की १.५ अंश तापमानात वाढ झाली तर दुष्काळाची तीव्रता दुप्पट
होऊ शकते आणि २.० अंश तापमानामध्ये वाढ झालीतर दुष्काळात दुपटीपेक्षाही अधिक वाढ होऊ
शकते. मागील दहा वर्षातील तापमान झालेला बदल नमूद करून शेती उद्योगावर होणारे
परिणाम आणि पीक उत्पादनातील घट नमूद केली. भविष्यात २०५० मध्ये १.७ मिलियन
होणाऱ्या लोकसंख्येसाठी आजच्या पेक्षा चार पटीने उत्पादन तसेच पाण्याचे साठवण तीन
पट वाढवावे लागेल. एवढेच नव्हे तर जैवतंत्रज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान यामध्ये
सुधारणा करून मजुरांची कार्यक्षमता ही सहा पटीने वाढवावे लागेल. तसेच अन्न व पोषण
सुरक्षितता, उत्पन्न वाढ आणि रोजगार निर्मिती, पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणे, शाश्वत
आणि उत्कृष्ट जीवनमान जगण्यासाठी बाबींना प्राधान्यक्रम द्यावा लागेल. याकरिता महत्त्वाचा
बाब म्हणजे हवामान अनुकूल (क्लायमेट स्मार्ट) शेती (अचूक शेती) ही
आहे. यासाठी उत्कृष्ट दर्जाचे बियाणे, पाण्याचा पुरेपूर वापर, खतांची क्षमता
वाढवणे, रासायनिक औषधांचा कमीत कमी वापर, कमीत कमी मशागत, मजुरांची कार्यक्षमता
वाढवणे या बाबींचा प्रामुख्याने समावेश महत्त्वाचा आहे. यावेळी त्यांनी हवामान अनुकूल (क्लायमेट स्मार्ट) शेतीसाठीचे करावयाच्या उपायोजना आणि टप्पे प्रामुख्याने
विशद केले.
अध्यक्षीय भाषणात
कुलगुरू
मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी अन्न, पाणी आणि ऊर्जा या लोकसंख्येसाठी
महत्त्वाच्या बाबी आहेत. पाण्याचा न्यायिक वापर होणे तसेच मातीचे योग्य पद्धतीने
व्यवस्थापन होणे आवश्यक आहे. यासाठी सूक्ष्म सिंचन, ठिबक सिंचन, तुषार सिंचन,
फर्टिगेशन यासारख्या आधुनिक सिंचन पद्धतींचा अवलंब करणे आवश्यक असून शेती
स्वयंचलित करून पाण्याची बचत करावी लागेल. हवामान अनुकूल
(क्लायमेट
स्मार्ट) शेतीसाठी ड्रोन
सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचे महत्त्व या कार्यक्रमातून आपण जाणून घेतले. याच
धर्तीवर विद्यापीठांमध्ये पाच नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापनावर संशोधन केंद्र
असून चार आधुनिक प्रयोगशाळा स्थापित केल्या आहेत. विद्यार्थ्यांना आणि शास्त्रज्ञांना
या मार्गदर्शनाची त्यांच्या संशोधनासाठी मदत होईल. या ज्ञानाचा पुरेपूर लाभ करून
घ्यावा असे त्यांनी आवाहन केले.
शिक्षण संचालक डॉ.
उदय खोडके यांनी विद्यापीठातील तरुण शास्त्रज्ञ आणि पदव्युत्तर तसेच आचार्य अभ्यासक्रमास असलेल्या विद्यार्थ्यांना नैसर्गिक
साधन संपत्ती व्यवस्थापन तसेच हवामान अनुकूल (क्लायमेट
स्मार्ट) शेती या संकल्पनेची
माहिती विख्यात शास्त्रज्ञ माजी कुलगुरू माननीय प्रा. (डॉ) अनिल कुमार सिंह
यांच्याकडून आत्मसात करणे हा कार्यक्रमाचा उद्देश आहे असे प्रस्ताविकात नमूद केले.
कार्यक्रमासाठी सहयोगी
अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे, सहयोगी अधिष्ठाता डॉ.
गजेंद्र लोंढे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. वासुदेव नारखेडे, सहयोगी अधिष्ठाता डॉ.
विश्वनाथ खंदारे, विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी आणि
बहुसंख्येने विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला
कार्यक्रमात कुलगुरू
मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्यासह विद्यापीठातील
शास्त्रज्ञ विभाग प्रमुख डॉ. प्रवीण वैद्य, विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र लोंढे, विभाग
प्रमुख डॉ. सचिन मोरे, डॉ. के. टी. जाधव, डॉ. गजेंद्र जगताप यांच्यासह पदव्युत्तर
तसेच आचार्य अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांनी
माजी कुलगुरू माननीय प्रा. (डॉ) अनिल कुमार सिंह यांच्याशी संवाद साधला आणि कार्बन
क्रेडिट ,ग्रीन वायू, हवामान अनुकूल पीक पद्धती अशा विविध प्रश्नावर चर्चा करून अधिकची
माहिती मिळवली. सूत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव यांनी तर आभार डॉ. सचिन मोरे यांनी
मानले.