Saturday, September 14, 2024

वनामकृविच्या ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ कृषि संवादात दुहेरी संभाषणावर भर

 वेळेत फवारणीसाठी ड्रोन तंत्रज्ञान फायद्याचे.... कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि


शेतकऱ्यांजवळ खते, फवारणीची औषधी यासारख्या साधनसामुग्री असतात, त्या वापरण्याचे ज्ञानही असते. परंतु अतिवृष्टीमुळे शेतामध्ये साधनसामुग्री वापरण्यास व मशागतीच्या कामामध्ये अडचण निर्माण झाली. शाश्वत शेतीसाठी वेळेतच फवारणी करून कीड नियंत्रण करणे आवश्यक असल्याने अशा परीस्थितीमध्ये ड्रोन तंत्रज्ञान नक्कीच फायद्याचे ठरते असे प्रतिपादन कुलगुरू  मा. डॉ. इन्द्र मणि  यांनी केले, ते दिनांक १३ सप्टेंबर रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने कीटकशास्त्र विभागातील क्रॉपसॅप प्रकल्प अंतर्गत ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ कृषि संवादाच्या आकराव्या भागात अध्यक्षस्थानावरून  बोलत होते. माननीय  कुलगुरू डॉ. इन्द्र मणि पुढे म्हणाले की, विद्यापीठाने ड्रोनची सुविधा माफक दारामध्ये सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे, याचा लाभ घ्यावा. तसेच ड्रोनचा वापर सांघिकरित्या करावा. विद्यापीठ ऑनलाइन उपक्रम दर मंगळवारी आणि शुक्रवारी सायंकाळी ७.०० वाजता राबवत आहे. यामध्ये दुहेरी संभाषणावर भर देण्यात येत आहे. यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन केले.  

विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी द्वारा मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात १७ सप्टेंबर रोजी आयोजित  रबी पीक परिसंवादास जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तांत्रिक सत्रात हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी हवामानाचा अंदाज सांगून शेती कामाचे नियोजनाबद्धल मार्गदर्शन केले. वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ आंनद गोरे यांनी अति पावसामुळे बाधित क्षेत्राचे व्यवस्थापन याविषयी माहिती दिली. कीटकशास्त्रज्ञ डॉ बस्वराज भेदे यांनी सद्यस्थितीतील कपाशीवरील गुलाबी बोंड अळीचे ओळख, नुकसानीचा प्रकार आणि त्याचे अचूक व्यवस्थापन तसेच कपाशीच्या आकस्मित मर रोगाचे नियंत्रण यावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमामध्ये दुहेरी संभाषणावर भर देण्यात आला. शेतकऱ्यांनी गरजेनुसार आपल्या शेती विषयक समस्या मांडल्या. विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ आनंद गोरे, डॉ. वसंत सूर्यवंशी, डॉ. अरुण गुट्टे, डॉ. सूर्यकांत पवार, डॉ. अरविंद पांडागळे, डॉ बस्वराज भेदे, डॉ. अनंत लाड, डॉ. गजानन गडदे, डॉ. कैलास डाखोरे, डॉ. प्रल्हाद जायभाये यांनी त्वरित समाधानकारक उत्तरे दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अनंत लाड यांनी तर डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी आभार मानले कार्यक्रमामध्ये मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषि विद्यावेत्त्ता, कृषि विज्ञान केंद्राचे समन्वयक, आणि बहुसंख्येने शेतकरी सहभागी झाले होते.