Tuesday, September 17, 2024

वनामकृवित मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा

जन्मलो आणि वास्तव्यास आहोत त्या भूमीचा अभिमान, गौरव करून समर्पित भाव ठेवावा... कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि



वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्त दिनांक १७  सप्टेंबर रोजी मुख्य प्रांगणात कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि  यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) येथील राजमाता विजयाराजे सिंधीया कृषि विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरू तथा भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापनचे माजी उप महासंचालक माननीय प्रा. (डॉ.) अनिल कुमार सिंह आणि विशेष अतिथी म्हणून बुलंदशहर (उत्तर प्रदेश) येथील सनशाईन व्हिजीटेबल प्रा. लि. चे संचालक माननीय कर्नल श्री सुभाष दैशवाल हे होते. तसेच शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके आणि संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, कुलसचिव श्री संतोष वेणीकर, नियंत्रक श्री प्रवीण निर्मळ, विद्यापीठ अभियंता श्री दीपक कशाळकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. गजेंद्र लोंढे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश कदम, सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पुरुषोत्तम झंवर आदीसह विद्यापीठातील विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि यांनी मराठवाडा मुक्ती करिता शहीद वीरांना विनम्र अभिवादन करून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच प्रत्येकांनी आपण जेथे जन्मलो आणि वास्तव्यास आहोत त्या भूमीचा अभिमान, गौरव करावा आणि समर्पित भाव ठेवावा. विद्यापीठ राष्ट्रीय पातळीवर अनेक क्षेत्रात प्रथम क्रमांकावर असून पुढाकार करत आहे. विद्यापीठ मनुष्यबळ विकासावर भर देत आहे. शास्त्रज्ञांनी आणि विद्यार्थ्यांनी विदेशात तसेच देश पातळीवर प्रशिक्षण घेतले. याचा लाभ मराठवाड्यातील शेती विकासासाठी होत आहे. विस्तार कार्य शेतकरी केंद्रीत असून ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत’ अशा अभिनव उपक्रमासह विविध विस्तार कार्य करत आहे. संशोधनामध्ये नवाचार यावर भर असून विविध वाण, तंत्रज्ञान, अवजारे, जमीन विकसित करून बीजोत्पादनाचे कार्य सुरु आहे. शैक्षणिक उपक्रमामध्ये विद्यापीठाने यावर्षीपासून नवीन चार महाविद्यालये सुरु केले असून या वर्षा पासून नवीन शैक्षणिक धोरण विद्यापीठात लागू करण्यात येणार आहे. यावेळी राष्ट्रीय छात्र सैनिकांनी माननीय कुलगुरू यांना छत्र अधिकारी लेफ्टनंट डॉक्टर जयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सलामी देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील गायक श्री उदय वाईकर यांनी केले.