Sunday, September 29, 2024

वनामकृवित शेतकरी उत्पादक कंपनी कार्यशाळा आणि सोयाबीन शेती दिन साजरा

 


कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि

सहाय्यक महासंचालक मा. डॉ. डी. के. यादवा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सोयाबीन संशोधन केंद्राद्वारे शेतकरी उत्पादक कंपन्यांची  कार्यशाळा आणि सोयाबीन शेती दिन दिनांक २९ सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि हे होते तर प्रमुख अतिथी नवी दिल्ली येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या बियाणे विभागाचे सहाय्यक महासंचालक मा. डॉ. डी. के. यादवा, विशेष अतिथी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या भारतीय बियाणे शास्त्र संस्थेचे संचालक मा डॉ. संजय कुमार हे होते. व्यासपीठावर नवी दिल्ली येथील केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे उपायुक्त मा. डॉ दिलीप कुमार श्रीवास्तवा हे कार्यक्रमासाठी सन्माननीय पाहुणे म्हणून तर इल्कोम्पोनिक्स सेल्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री सत्येंद्र एन द्विवेदी, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, बीज उत्पादक संघाचे अध्यक्ष ॲड अमोल रणदिवे आदींची उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यापीठाच्या बीज वितरण प्रणाली मधील महत्त्वाचे समजले जाणारे बीज प्रतीक चिन्ह, बीज परीक्षण प्रयोगशाळेस प्राप्त आयएसओ प्रमाणपत्र आणि संभाजीनगर येथे झालेल्या बियाणे कार्यशाळेच्या प्रोसिडिंगचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, मराठवाड्यातील शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांची विद्यापीठास योग्य सहकार्य लाभत आहे. विद्यापीठ विकासात ड्रायव्हर ते डायरेक्टर यांची सर्वांची महत्त्वाची भूमिका आहे. विद्यापीठाने शेतकऱ्यांना दर्जेदार आणि पुरेसे बियाणे मिळण्याच्या दृष्टीने यावर्षी नव्याने विकसित ६०० हेक्टर जमिनीसह एकूण ८०० हेक्टर वर सोयाबीन पिकाची पेरणी केलेली आहे. तसेच बिजोत्पादन कार्यक्रमास सिंचन सुविधा उपलब्ध करून सिंचन संरक्षणही देण्यात आले. शेतकरी उत्पादक कंपन्या विद्यापीठ विकसित बियाणे शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. विद्यापीठ आपल्या प्रक्षेत्रावर सर्व उत्पादने घेऊन त्याचे निष्कर्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रात्यक्षिक आयोजित करत आहे. सोयाबीन सारख्या महत्त्वपूर्ण वाणांमध्ये बियाणे आणि वाण बदल यावर भर देऊन संशोधन  कार्य करण्यात येईल. विद्यापीठाची बियाणे तपासणी प्रयोगशाळेस राष्ट्रीय पातळीवर मानांकन मिळवून भारतीय बीज प्रमाणीकरण यंत्रणेचे सदस्य बनण्याचा निर्धार त्यांनी यावेळी केला.

सहाय्यक महासंचालक मा. डॉ. डी के यादवा यांनी कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांच्या काळात विद्यापीठाने जमीन विकसित करून बीजोत्पादन कार्याची प्रशंसा करून त्यांच्या कार्याच्या गौरव केला. सोयाबीनमध्ये वाण, बियाणे बदलाच्या कार्यासाठी विद्यापीठे, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे संशोधन केंद्रे, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे कार्य महत्वपूर्ण आहे. आजपर्यंत भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने विकसित केलेल्या वाणामध्ये जवळपास ८५ टक्के हवामान अनुकूल वाण विकसित केलेले आहेत. तसेच देशातील कुपोषणाचा आणि व्यक्तीमधील अशक्तपणा दूर करण्यासाठी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेद्वारे अनेक पिकामध्ये जैवसंतृप्त वाण विकसित केले असून यामध्ये वसंतराव नाईक मराठावाडा कृषी विद्यापीठाने ज्वार आणि बाजरा या पिकांच्या जैवसंतृप्त वाणाच्या विकासामध्ये आपले महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. महाराष्ट्रामध्ये शेतीची प्रांतवार रचना करून चार विद्यापीठांची निर्मिती करण्यात आली. या चारही विद्यापीठाद्वारे स्थळनिहाय पिकांचे जवळपास ५८० विविध वाण विकसित करण्यात आले. यापैकी या विद्यापीठाने १५० वाण दिले आहेत. विद्यापीठ मूलभूत ते सत्यतादर्शक किंवा प्रमाणित बियाणापर्यंतच्या साखळीमध्ये उत्कृष्ट बियाणे देण्यात महत्त्वपूर्ण व अचूक योगदान देत आहे. विद्यापीठांच्या या वाणामुळे देशाची खाद्यतेला सह इतर शेती उत्पादनाची आयात थांबवण्यासाठी नक्कीच मदत होईल अशी आशा व्यक्त केली.

यावेल बोलताना संचालक मा डॉ. संजय कुमार म्हणाले की, शेतीमध्ये हवामान बदलामुळे किडी, रोग, अतिवृष्टी, सिंचन समस्या वाढत चाललेल्या आहेत. लोकसंख्या वाढत असून साधन संपत्ती कमी होत आहे. भारत खाद्यतेलाची आयात करत आहे. खाद्यतेलाचे निर्मिती होण्यासाठी उत्कृष्ट तेल बियाणे उपलब्ध करावे लागेल. यासाठी सोयाबीन विषयावरील शेतकरी उत्पादक कंपन्यांची कार्यशाळा लाभदायक ठरेल. विविध पिकांचे वाण, बियाणे यामध्ये फायद्याचे बदल होणे बदल करून नवनवीन वाण विकसित होणे आवश्यक आहे. यासाठी शासन, विद्यापीठ आणि शेतकरी उत्पादक कंपन्या यांचा महत्त्वाचा सहभाग आणि योगदान महत्त्वाचे आहे असे नमूद केले

कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे उपायुक्त मा. डॉ दिलीप कुमार श्रीवास्तवा यांनी केंद्र शासनाच्या बीजोत्पादनासाठी असलेल्या साथी या पोर्टलची माहिती दिली. या पोर्टलमध्ये मुलभूत ते प्रमाणित बियाणे श्रंखलेतील बीजोत्पादन कार्यपद्धतीची संपूर्ण माहिती निदर्शनात येते. या कार्यपद्धतीची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे एक अग्रगण्य राज्य असून साथी या कार्यपद्धतीचा महाराष्ट्रामध्ये योग्य पद्धतीने अवलंबन करण्यात येते. याबरोबरच बियाणे निर्यातीद्वारे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचे कार्य राष्ट्रीय पातळीवरील बियाणे संस्थेद्वारे केले जाते. या कार्यात महाराष्ट्र राज्य बीज प्रमाणीकरण मंडळ हे एक सदस्य आहे. याद्वारे शेतकऱ्यामार्फत दर्जेदार बियाण्याची निर्मिती करून बियाणे निर्यात वाढविण्याच्या दृष्टीने कार्य करणे आवश्यक आहे. बीजोत्पादन झाल्यानंतर राज्य पातळीवरील बीज प्रमाणीकरण यंत्रणेद्वारे तपासलेल्या बियाणाचा ५ टक्के  नमुना बनारस येथील बीज तपासणी प्रयोगशाळेत पाठवला जातो. यादृष्टीने बीज प्रमाणीकरण यंत्रणेच्या राज्य पातळीवरील प्रयोगशाळा मानांकित असणे आवश्यक आहे. याकरिता विद्यापीठाने विद्यापीठाची बीज तपासणी यंत्रणा मानांकनासाठीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करावा अशी विनंती त्यांनी केली.

इल्कोम्पोनिक्स सेल्सचे व्यवस्थापकीय संचालक श्री सत्येंद्र एन द्विवेदी यांनी आहारामध्ये सेंद्रिय आणि सात्विक घटकांना महत्व देणे आवश्यक असून यासाठी सेंद्रिय शेती चालना द्यावी. महाराष्ट्रामध्ये गुळाची निर्मिती अधिक होते. याचा लाभ घेऊन महाराष्ट्रातील विविध शेतकरी उत्पादक संघटनेसोबत सेंद्रिय गुळ उत्पादन करण्यासाठी सामंजस्य करार करून त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे कार्य भविष्यात करण्यात येईल असे नमूद केले.

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी सोयाबीन सह विद्यापीठाने विकसित वाणाची माहिती देऊन शेतकऱ्याच्या विकासातील विद्यापीठाचे कार्य नमूद केले. विद्यापीठाचे बियाणे अधिकाधिक शेतकऱ्यापर्यंत पोहोचणेच्या दृष्टीने विद्यापीठाने यावर्षी ८०० हेक्टर क्षेत्रावर बीजोत्पादन घेऊन शासकीय यंत्रणा आणि शेतकरी उत्पादन कंपन्याद्वारे बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले जाईल असे नमूद केले.

बीज उत्पादक संघाचे अध्यक्ष ॲड अमोल रणदिवे यांनी शेतकरी उत्पादन कंपन्यांचे बीजोत्पादन कार्य विशद केले. बीजोत्पादन घेण्यासाठी सर्व स्तरावर योग्य सहकार्य मिळून पैदासकार बियाणे कंपन्यांना विद्यापीठाकडून मिळते. राज्य आणि केंद्र शासनाच्या मदतीने बीज उत्पादक कंपन्यांना मिळणाऱ्या अनुदानाचा प्रश्नही मार्गी लागला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने सोयाबीनचा एम ए यु एस ७२५ आणि तुरीचे  बीडीएन ७११, बीडीएन ७१६, गोदावरी यासारखे वाण शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले. या वाणाचे शेतकऱ्यांच्या शेतावर विक्रमी उत्पादन होत असून सोयाबीनचे १९ क्विंटल प्रति एकरी उत्पादन घेतल्याचे नमूद केले.

दुपारच्या सत्रात मान्यवरांची आणि शेतकरी उत्पादक कंपन्याच्या सदस्यांची विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्रक्षेत्रावर पेरलेल्या सोयाबीन प्रक्षेत्रास शिवार फेरी आयोजित करून विद्यापीठाचे सर्व वाण दाखविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोयाबीन पैदासकार डॉ एस एम उमाटे यांनी केले . यावेळी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, सहयोगी अधिष्ठाता डॉ. आर बी क्षीरसागर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे, सहयोगी संचालक (बियाणे)  डॉ. हिराकांत काळपांडे, विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी तसेच विविध शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रमुख आणि सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यशाळेत उपस्थित शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सदस्यांनी सोयाबीन मधील विविध मुद्द्यावर प्रश्न विचारले यास मान्यवरांनी समाधानकारक उत्तरे दिली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर प्रीतम भुतडा यांनी केले तर आभार डॉ. आर एस जाधव यांनी मानले.

 

संचालक मा डॉ. संजय कुमार 

उपायुक्त मा. डॉ दिलीप कुमार श्रीवास्तवा 

व्यवस्थापकीय संचालक श्री सत्येंद्र एन द्विवेदी



कार्यशाळेच्या प्रोसिडिंगचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन

बीज प्रतीक चिन्ह, व बीज परीक्षण प्रयोगशाळेस प्राप्त आयएसओ प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते विमोचन



Thursday, September 26, 2024

वनामकृविच्या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ निमित्त मार्गदर्शन

 यशासाठी प्रमाणिक प्रयत्न आवश्यक....डॉ. उदय खोडके

नवीन शैक्षणिक धोरण २०२० नुसार दीक्षारंभ कार्यक्रमाचे नव्याने प्रवेशीत प्रथम वर्षीय विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात येते. दीक्षारंभ कार्यक्रम विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर त्यांना महाविद्यालयातील विविध विभागांची आणि शिक्षक तसेच शिक्षकेतर अधिकारी कर्मचाऱ्यांची ओळख होवून विद्यार्थी महाविद्यालयात रूळण्यासाठी महत्वाचा आहे. याकरिता दीक्षारंभ कार्यक्रमांतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात मार्गदर्शन दिनांक २५ सप्टेंबर रोजी आयोजित केले होते. अध्यक्षस्थानी भाषणात शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके हे होते. रेवाडी (हरियाणा) येथील वरिष्ठ कृषी अभियंता आणि उद्योजक इजि. रामबीर यादव हे प्रमुख पाहुणे होते. व्यासपीठावर जिमखाना उपाध्यक्ष डॉ. राहुल रामटेके, रेवाडी (हरियाणा) येथील सेवा निवृत्त लेखा अधिकारी श्री. दीपक यादव, राष्ट्रीय विमा योजनेचे सेवा निवृत्त विपणन व्यवस्थापक श्री. जगजित सिंग, विभाग प्रमुख डॉ. स्मिता खोडके आणि डॉ. मदन पेंडके आदींची उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके म्हणाले की, यशासाठी प्रामाणिक प्रयत्नाची  आवश्यकता आहे. याशिवाय जिद्द आणि चिकाटी जोड द्यावी लागते. याकरिता कृषी अभियंत्यांमध्ये जिद्द, चिकाटी आणि प्रामाणिक प्रयत्न ठेवून यश संपादन करण्याचे आवाहन केले. कृषी अभियांत्रिकीद्वारे रोजगार संधी व औद्योगिक क्षेत्रात असलेले महत्त्व यावेळी त्यांनी विशद केले.

यावेळी इंजि. रामबीर यादव यांनी कृषी अभियंत्यांचे समाजात असलेले महत्त्व सांगितले. याबरोबरच कृषी क्षेत्राच्या विविध बँक संबंधीत व औद्योगिक क्षेत्रातील कृषी अभियंत्यांना रोजगाराच्या संधींबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाद्वारे करण्यात आले. सूत्र संचालन प्रिया देशमुख यांनी तर आभार जिमखाना सचिव डॉ. गजानन वसु यांनी मानले. कार्यक्रमास सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.




Wednesday, September 25, 2024

शेतकऱ्यांना हवामान बदलानुरूप तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याची गरज... कुलगुरु मा डॉ. इन्द्र मणि

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सेंद्रीय शेती प्रशिक्षण व संवाद मालिकेचा १३ वा भाग हवामान बदल आणि शेती व्यवस्थापन या विषयावर दिनांक २४ सप्टेंबर रोजी कुलगुरु मा. (प्रा.) डॉ. इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन संपन्न झाला. प्रमुख वक्ते जेष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे हे होते. यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांची उपस्थिती होती.  

अध्यक्षीय भाषणात कुलगुरु मा. (प्रा.) डॉ. इन्द्र मणि म्हणाले कीहवामान बदलामुळे सर्वच क्षेत्रात कमालीची अनिश्चितता जाणवत आहे. याचा कृषि क्षेत्रावर दूरगामी आणि विपरीत परिणाम दिसून येत आहेत. हवामान बदलानुसार तंत्रज्ञान विकासासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध व्यासपीठांवर विचार मंथन होत आहे. विद्यापीठानेही हवामान बदलानुरूप तंत्रज्ञान विकसित करून नीक्रा प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहचविले आहे. यामध्ये असलेले कोरडवाहू शेती तंत्रज्ञान जसे की, बीबीएफ़ लागवड पद्धत, आंतरपीक पद्धत, एकात्मिक शेती पद्धती, शेततळे तंत्रज्ञान, पोटाशियम नायट्रेटची फवारणी, विहीर पुनर्भरण, कुपनलिका पुनर्भरण, कमीत कमी संरक्षित सिंचन, सिंचनाच्या आधुनिक पद्धती, अधिक पावसात निचरा चर, बीबीएफ़ लागवड पद्धत, योग्य वाणांचा वापर, पिक संरक्षण याचा अवलंब करावा. युवकांनी शेती उद्योगात पुढाकार घेवून या तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. त्यांना प्रेरणा, पाठबळ आणि हवामान बदलानुरूप तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्याची गरज आहे असे प्रतिपादन केले .

प्रमुख वक्ते जेष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी मार्गदर्शन करतांना मान्सूनचे नैरुत्य आणि ईशान्य असे दोन मुख्य प्रकार सांगून तापमान वाढ आणि त्याअनुषंगाने हवामान बदल ही संकल्पना पुढे आली असे सांगितले. हवामान बदलामुळे होणारे परिणामास सामोरे जावे लागत आहे. कृषि क्षेत्र आणि कृषि उत्पादनावर मोठा विपरीत परिणाम होत आहे. यासोबतच सुपीक मातीचा थर वाहून जाणे, अन्नद्रव्यांचा ऱ्हास, उत्पादनातील घट, मानवी व पशुधनाचे आरोग्य यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यांनी  हवामानाचा अंदाज व सद्यस्थितीपाऊसमानवाऱ्याचा वेग व यांचा पिकांवर होणारा परिणाम सांगून या अंदाजानुसार  सद्य‌स्थितीत पीक व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन केले. यासाठी मागील ५ ते १० वर्षाच्या अभ्यासावरून पीक नियोजनात व पीक पद्धतीत बदल करणे आवश्यक आहे. हलक्या आणि कोरडवाहू जमिनीवर कपाशी ऐवजी इतर पीक, कडधान्य पिकांचा पीक पद्धतीत समावेश, ज्वारी, मका, बाजरी, यावर भर देणे आवश्यक आहे असे सांगितले. संरक्षित शेतीवर यापुढील कालावधीमध्ये भर द्यावा लागेल ५ ते १० किंवा २० गुंठे पासून सुरुवात करून भाजीपाला, फुलशेती यावर भर देणे ही काळाची गरज आहे. शेतीला पूरक जोडधंद्याची जोड देवून एकात्मिक शेती पद्धतीच्या माध्यमातून हवामान बदलामुळे वाढलेली जोखीम कमी करता येईल. सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून लागवडीवरील खर्च कमी करणे, जमिनीचे आरोग्य सुधारणे, सकस उत्पादन घेणे या बाबी साध्य करता येतील व त्याद्वारेही हवामान बदलाचे परिणाम कमी करता येतील.  फळपिक लागवड आणि एकूणच पीक विविधीकरणाकडे वळणे क्रमप्राप्त आहे असे त्यांनी असे प्रतिपादन केले.

या कार्यक्रमात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसह अकोला, सातारासांगली, कोल्हापूर, नंदुरबार, अहमदनगरनागपूरयेथून ऑनलाईन सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे शेतीविषयक समस्या विचारल्या, त्यास डॉ. रामचंद्र साबळे यांच्यासह विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरेडॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. अरुण गुट्टे,  डॉ. वसंत सूर्यवंशीडॉ. सूर्यकांत पवारडॉ. अनंत लाड, डॉ. किशोर झाडे, डॉ. कैलास डाखोरे, डॉ. पपीता गौरखेडे यांनी उत्तरे देऊन समाधान केले.    

कार्यक्रमाचे आयोजन संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे आणि  मृदा शास्त्रज्ञ डॉ. पपिता गौरखेडे यांनी केले. याकार्यक्रमाचे प्रक्षेपण झूम मिटिंगयु टूबफेसबुक या सामाजिक माध्यमाद्वारे करण्यात आले.


वनामकृविच्या कृषी महाविद्यालयातील एनसीसी प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि महाविद्यालयातील एनसीसी युनिटसाठी तीन वर्षाच्या प्रशिक्षणाकरिता शारीरिक व शैक्षणिक गुणवतेच्या आधारावर विद्यार्थ्यांची निवड २३ सप्टेंबर रोजी विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणावर करण्यात आली. या निवड प्रक्रियेत परभणी मुख्यालयात असलेले कृषि, उद्यानविद्या, अन्नतंत्र, कृषि अभियांत्रिकी आणि सामुदायिक विज्ञान या पाच शाखेंच्या महाविद्यालयातील २०० विद्यार्थ्यांनी सहभागी घेवून विविध चाचण्या दिल्या. यातून २०२४-२५ या वर्षी एकूण ३७ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. यामध्ये ३१ विद्यार्थी आणि ६ विद्यार्थिनींचा समावेश आहे. निवड झालेल्या छात्रसैनिकांचे कुलगुरु मा. डॉ. इन्द्र मणि तसेच शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. पुरूषोत्तम झंवर यांनी अभिनंदन केले.

 विद्यार्थांची निवड प्रक्रिया एनसीसी ५२ महाराष्ट्र बटालियनचे  प्रशासकीय  अधिकारी कर्नल दिलीप रेड्डी यांच्या मार्गदर्शनात लेफ्टनंट डॉ. जयकुमार देशमुख व नायब सुभेदार  राकेश कुमार यांनी  प्राचार्य  डॉ. सय्यद इस्माइल उपस्थितीत पार पाडली. कर्नल दिलीप रेड्डी यांनी विद्यार्थ्यांच्या भौतिक सुविधा व भविष्यातील प्रशिक्षण कालावधी याबद्दल विचार विनिमय करुन ऑब्स्टेकल ट्रेनिंग कोर्स, इलेक्टिव एनसीसी निवड क्रेडिट कोर्स घेण्यात यावा अशी भावना कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य  डॉ. सय्यद इस्माइल यांच्याकडे व्यक्त केली. एनसीसी च्या कैडेट्स च्या वतीने मान्यवरांना गार्ड ऑफ़ ऑनर देऊन सन्मानित करण्यात आले. याबद्दल सहभागी छात्रसैनिकांचे  मान्यवरांनी कौतुक केले. एनसीसी बी आणि सी प्रमाणपत्र प्राप्त विद्यार्थाना सैन्य व तत्सम भरतीमधे अधिकारी पदाच्या  मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध असल्यामुळे बहुतांश विद्यार्थी व  विद्यार्थ्यांनी भरतीस उपस्थित राहून त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यातूनच विद्यार्थ्यांची भारतीय सैन्याबद्दल आकर्षण व वर्दी मधे असण्याची महत्वकांक्षा दिसून येत होती.

निवड प्रक्रियेसाठी एनसीसी अंडर ऑफिसर हृषिकेश काळेअभिषेक खराडे, संदीप वाव्हळे, अंकुश  सत्वधर, अश्विनी काळे, विशाल  ढाले, वैभव  गायकवाड़, वैष्णवी  बनसकर आदी विद्यार्थ्यांनी परिश्रम  घेतले.




Tuesday, September 24, 2024

उद्यानविद्या महाविद्यालयात दीक्षारंभ कार्यक्रम संपन्न


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील उद्यानविद्या महाविद्यालय येथील येथील २०२४ या शैक्षणिक वर्षात प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांचा दीक्षारंभ व समुपदेशन कार्यक्रम दिनांक २३ सप्टेंबर रोजी संपन्न झाला. कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि आणि शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके हे विशेष अतिथी म्हणून ऑनलाईन प्रणालीद्वारे उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना व पालकांना उद्यानविद्या पदवीचे भविष्यात होणारे फायदे व यामधून स्वयंरोजगार निर्मितीच्या संधी सांगितल्या. विद्यार्थ्यांनी विद्यापीठ स्तरावरील राबविले जात असलेल्या वेगवेगळ्या कार्याकामामध्ये सहभागी व्हावे तसेच विद्यापीठाच्या विविध केंद्रास भेटी देवून माहिती घ्यावी. याबरोबरच विद्यार्थ्यांच्या नैतिक तसेच कलागुणांना वाव देवून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन केले.

शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके यांनी नवीन शिक्षण धोरण २०२० बाबत विस्तीर्ण मार्गदर्शन केले. प्रास्ताविक उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे यांनी केले. प्रभारी शिक्षण अधिकारी डॉ. श्रुती वानखेडे यांनी नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना विविध नियमावली व शैक्षणिक कार्यप्रणालीचे समुपदेशन केले. सूत्रसंचालन डॉ. अंशुल लोहकरे तर आमार प्रा. ज्योती कळंबे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीततेसाठी डॉ. बी. एम कलालवंडी, डॉ. जी. पी. जगताप, डॉ. व्ही. व्ही भगत, डॉ. सचिन पव्हणे, डॉ. सुबोध खंडागळे, श्री. अभिजीत देशमुख, श्री. सतीश पुंड, श्रीमती शमा पठाण, श्री. मोकाडे व श्री. वाळबे परिश्रम घेतले.

डॉ. विश्वनाथ खंदारे





Saturday, September 21, 2024

हळद व अद्रक पीक व्यवस्थापनावर ऑनलाइन शेतकरी शास्त्रज्ञ संवादामध्ये मार्गदर्शन

 संवादामध्ये जास्तीत जास्त प्रश्न उत्तरावर भर द्यावा.... कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि

हळद व अद्रक ही पिके कंदवर्गीय असल्यामुळे यामध्ये जमिनीतून उद्भवणारे किडीवर रोगांचे परिणाम होण्याची शक्यता असते. या पिकांच्या व्यवस्थापनावर योग्य मार्गदर्शन विद्यापीठाच्या शास्त्रज्ञाद्वारे  होत आहे. तसेच यापिकांसाठी विद्यापीठ विकसित बायोमिक्सचा वापर शेतकऱ्यांनी करावा असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनी केले. ते दिनांक २० सप्टेंबर रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय व कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने कीटकशास्त्र विभागातील क्रॉपसॅप प्रकल्प अंतर्गत ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ कृषि संवादाच्या बाराव्या भागात अध्यक्षस्थानावरून  बोलत होते. ते पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची विद्यापीठामध्ये नोंद घेतली जात असून या प्रश्नांच्या आधारित संशोधनासाठी तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमासाठी उपयोगिता होईल. या संशोधनाचा भविष्यात शेती विकासासाठी लाभ होईल. याकरिता कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त प्रश्न उत्तरावर भर द्यावा असे नमूद केले.

तांत्रिक मार्गदर्शनात हवामान शास्त्रज्ञ डॉ. कैलास डाखोरे यांनी हवामानाचा अंदाज सांगितला. उद्यान विद्या विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. शिवाजी शिंदे यांनी हळद व अद्रक पीक व्यवस्थापन यासाठी विकसित नवीन तंत्रज्ञान आणि वाणांची माहिती दिली. पीक रोग तज्ञ डॉ. गजेंद्र जगताप यांनी हळद व अद्रक पिकातील रोग आणि त्यांचे नियंत्रण याविषयी तर कीटक शास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत यांनी कीड नियंत्रण याविषयी मार्गदर्शन केले. 

कार्यक्रमात बहुसंख्येने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते. यावेळी त्यांनी हळद व अद्रक विकास सह सोयाबीन, कापूस, फळबाग याविषयी प्रश्न विचारले यास विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. गजेंद्र जगताप, डॉ. दिगंबर पटाईत. डॉ. अनंत लाड, डॉ. गजानन गडदे यांनी समाधानकारक उत्तरे दिली.  कार्यक्रमाचे प्रस्ताविक विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. अनंत लाड यांनी तर आभार मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी मानले.

तीन दिवसीय शिवारफेरीचे कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि यांच्या हस्ते उद्घाटन

हवामानातील बदलामुळे शेतीतील नियोजनात बदल करावे लागतील.... कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि

देशाच्या विकासात शेतीचा प्रमुख वाटा आहे. शेती आणि शेतकऱ्यानां वगळून कोणताच विकास साधता येत नाही. शेती पुढे हवामान बदलासारखी मोठी आव्हाने उभे टाकत आहेत. ते पेलण्यासाठी शेतीत आवश्यक बदल करावे लागतील. शेतीमध्ये ड्रोन सारख्या आधुनिक तंत्रज्ञाचा वापर, यांत्रिकीकरणावर भर देवून आव्हाने पेलण्यासाठी शेतकऱ्यात क्षमता निर्माण करावी लागेल. शेतकऱ्यांत आर्थिक सुबकता व स्थैर्य आणण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. यासाठी महाराष्ट्रातील चारही कृषि विद्यापीठे कार्य करत आहेत, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि यांनी केले

अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शुक्रवार त रविवार अशा तीन दिवशी शिवार फेरीचे शुक्रवारी दिनांक २० सप्टेंबर रोजी त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते शेतकऱ्यांसह कृषी शास्त्रज्ञांना संबोधित करताना बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मा. सौ.  संगिता अढाऊ, आमदार मा श्री. अमोल मिटकरी, आमदार मा  श्री. किरण सरनाईक, पंदेकृविचे कुलगुरू मा. डॉ. शरद गडाख,  महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक मा श्री.  रावसाहेब बागडे (IAS), भारत सरकारच्या निती आयोगाचे माजी सदस्य डॉ. व्ही ही. सदामते, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक मा. श्री योगेश कुंभेजकर, विभागीय कृषी सहसंचालक श्री किसन मुळे (अमरावती) श्री. शंकर तोटावर (नागपूर) डॉ. हरिहर कौसडीकर यांच्यासह विद्यापीठ कार्यकारी परिषद सदस्य व विद्यापीठाचे संचालक, प्राचार्य आणि विविध विभागाचे प्रमुख यांचे उपस्थिती होती. 

कुलगुरू माननीय डॉ. इन्द्र मणि पुढे म्हणाले की, हवामानातील बदलामुळे शेतीतील नियोजनात बदल करावे लागतील, नवीन तंत्रज्ञानासह स्वयंचलित शेती करून शेती मधला खर्च कमी करावा लागेल. कमी खर्चात अधिक उत्पादन देणाऱ्या वाणाचे संशोधने तसेच त्याचा वापर करण्याची गरजही त्यांनी विशद केली.

यावेळी मा. सौ.  संगिता अढाऊ, आमदार मा श्री. अमोल मिटकरी, आमदार मा  श्री. किरण सरनाईक, पंदेकृविचे कुलगुरू मा. डॉ. शरद गडाख यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ स्थापना दिनानिमित्त दरवर्षी शिवार फेरीचे आयोजन केले जाते. यामध्ये जवळपास २० एकर प्रक्षेत्रावर विविध पिकांचे जिवंत पीक प्रात्यक्षिके दाखवण्यात येतात. याशिवाय कृषी विद्यापीठाचे निर्मित शेतीविषयक तंत्रज्ञान तसेच विविध वाणाचे शेतकऱ्यांना प्रदर्शन आयोजित केले जाते. यातून शेतकरी आधुनिक शेती तंत्रज्ञान आत्मसात करतात. शिवारफेरीत पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने विविध जिल्ह्यातून शेतकरी सहभागी झाले होते यामुळे विद्यापीठात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.  

Friday, September 20, 2024

कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात अभियंता दिन आणि दीक्षारंभ कार्यक्रम संपन्न

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय येथे जिमखाना, शिक्षण विभाग आणि भारतीय कृषि अभियंता संस्था, परभणी शाखा यांच्या वतीने अभियंता दिन आणि दीक्षारंभ कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १९ सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि हे होते.  शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. राहूल रामटेके आणि शिक्षण विभागाचे प्रभारी प्रा. विवेकानंद भोसले आदींची उपस्थिती होती.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मा डॉ. इन्द्र मणि यांनी कृषि अभियांत्रिकी विषयाचे महत्त्व विद केले. विद्यार्थ्यांनी जीवनात जिद्द, प्रामाणिक प्रयत्न आणि चिकाटीच्या जोरावर यश संपादन करावे असे त्यांनी यावेळी आवाहन केले. शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके यांनी यावेळी कृषि अभियंत्यांना भविष्यातील संधींबद्दल मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा. विवेकानंद भोसले यांनी करताना दीक्षारंभ समारंभ आयोजनाचा हेतू स्पष्ट केला.

कार्यक्रमात ऋषीतिलक सातोनकर, ऐश्वर्या नायर, विशाल कुमार आणि अभिषेक प्रजापत यांनी अभियंता दिनानिमित्त भाषण केले. याप्रसंगी निबंध स्पर्धेत अग्निस दत्ता (प्रथम), गीता टेंगसे, गायत्री नलिंदे (द्वितीय) आणि सांक्षी दवने (तृतीय) तर भित्तीपत्रक स्पर्धेत शिवानी लंगोटे (प्रथम), मधुरा बुचाते (द्वितीय), प्रेरणा गंगावणे आणि हिमांशु मोहता (तृतीय) आल्याबद्दल अतिथिंच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे स्वागत आणि ओळख करून देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्र संचालन विद्यार्थिनी अंशिका राऊत हिने केले तर आभार जिमखाना सचिव डॉ. गजानन वसु यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. मधुकर मोरे, डॉ. रवि शिंदे, डॉ. प्रमोदीनी मोरे, डॉ. अनिकेत वायकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास विभाग प्रमुख डॉ. स्मिता खोडके, डॉ. स्मिता सोलंकी, डॉ. आर.जी. भाग्यवंत, डॉ. हरिष आवारी, डॉ. मदन पेंडके, डॉ. सुभाष विखे यांच्यासह सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.







शेतीत स्वयंरोजगार उपलब्ध होण्यासाठी मनुष्यबळाचे कौश्यल्य विकसित होणे गरजेचे…कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि


भारतात शेती क्षेत्रात मोठी क्षमता आहे, शेती व्यवसायात कुशल मनुष्यबळ निर्मिती होणे गरजेचे असून स्वयंरोजगार उपलब्ध मनुष्य बळाचे कौशल्य विकसित होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन कुलगुरू मा. डॉ. इन्द्र मणि यांनी केले. ते  वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि नवी दिल्ली येथील सी. एन. एच. इंडस्ट्रीयल इंडिया (न्यू हॉलंड), यांच्या सामाजिक एकीत्वाच्या माध्यमातून शेतकरी व ग्रामीण युवकांसाठी सुधारित शेती औजारांचा योग्य वापर, निगा व देखभाल या विषयावरील तीन दिवसीय प्रशिक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी दिनांक १८ सप्टेंबर रोजी अध्यक्षीय भाषणात बोलत होते. ते पुढे म्हणाले की कृषि औजारांची व यंत्राची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर त्यांचे आयुष्यमान कमी होऊन इंधन खर्चातही वाढ होते. तो तोटा टाळण्यासाठी सुधारित शेती औजारांची योग्यरीत्या निगा व देखभाल करण्याचे आवाहन त्यांनी या वेळी केले.

या प्रसंगी शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता (कृषि ) डॉ. उदय खोडके यांनीही प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार व्यासपीठावर उपस्थित होते., पशु संवर्धनाचे यांत्रिकीकरण योजनेच्या संशोधन अभियंता डॉ. स्मिता सोलंकी यांनी  प्रास्ताविक केले.

कार्यक्रमात शेतकरी प्रतिनिधी ज्ञानोबा पारदे, भारत आव्हाड आणि शीतल कच्छवे यांनी मनोगत व्यक्त केले. सदरील प्रशिक्षणात विविध कृषि औजारे जसे की, पर्हाटी भुकटी यंत्र, खत पसरणी यंत्र , ड्रोन द्वारे फवारणी, सौर फवारणी यंत्र इत्यादी औजारांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले, तसेच विद्यापीठात नव्यानेच उभारण्यात आलेल्या महाराष्ट्र मेक्यानायझेशन फार्ममध्ये शेतकऱ्यांना ट्रक्टरच्या विविध भागांची प्रात्यक्षिका द्वारे माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाचे सूत्र संचलन डॉ. मधुकर मोरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. दत्तात्रय पाटील यांनी मानले. कार्यक्रमास विभाग प्रमुख डॉ. राहुल रामटेके, डॉ. स्मिता खोडके, डॉ. सुभाष विखे, डॉ. रवी शिंदे, डॉ. दयानंद टेकाळे,डॉ. गोपाल शिंदे, डॉ. प्रमोदिनी मोरे आदि उपस्थित होते. प्रशिक्षणात परभणी जिल्ह्यातील ५५ शेतकरी सहभागी झाले.  






Thursday, September 19, 2024

जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी चारित्र्यवान व शिस्तप्रिय होणे आवश्यक - कुलगुरु मा. डॉ. इन्द्र मणि

सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात दीक्षारंभ कार्यक्रम 


परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यात भरीव योगदान असून आजपावेतो विद्यापीठांतर्गत ५०,००० पदवीधर व जवळपास ४५,००० पदविका धारक विद्यार्थ्यांनी कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन दिल्याने सामाजिक प्रगती घडवून आणण्यासाठी त्यांची मोलाची भूमिका असल्याचे प्रतिपादन कुलगुरु मा. डॉ. इन्द्र मणि यांनी केले. या विद्यापीठातील विद्यार्थी प्रशासनात विविध महत्त्वाच्या पदांवर सेवा बजावत असून त्याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी विशद केले. व्यक्तीच्या शिक्षणापेक्षाही त्याच्या चारित्र्याला अधिक महत्त्व असून त्यांच्या अंगी शिस्त असेल तरच ते आपल्या जीवनात उत्कर्ष साधू शकतात. विद्यापीठाच्या प्रत्येक विद्यार्थीने समाजात रोल मॉडेल होण्याकरिता अथक प्रयत्न करण्याची नितांत गरज असल्याचे त्यांनी यावेळी प्रतिपादित केले. सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात नवप्रवेशित प्रथम सत्राच्या विद्यार्थ्यांसाठी दिक्षारंभ कार्यक्रमाच्या निमित्ताने आयोजित विद्यार्थी- शिक्षक-पालक सुसंवादकार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना त्यांनी आपले विचार मांडले.

या प्रसंगी संचालक शिक्षण तथा अधिष्ठाता डॉ. उदय खोडके यांनी या शैक्षणिक वर्षापासून विद्यापीठात नवीन शैक्षणिक धोरण आवलंबिले जात असून या धोरणामध्ये भारतीय शिक्षण पध्दती प्रमाणे अमुलाग्र बदल घडवून आणले जात असून हे शिक्षण जास्तीतजास्त व्यवसायाभिमुख व कौशल्याधारित करण्यात आले आहे असे त्यांनी नमूद केले. तसेच हे शिक्षण विद्यार्थ्यांसाठी आनंददायी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी स्वत:चे शिक्षण पूर्ण करत असतांना आपल्या विविध कला-गुणांना वाव देऊन प्रत्येक शैक्षणिक कार्यात तसेच क्रीडा स्पर्धेत सहभागी होणे आवश्यक आहे असे विचार त्यांनी मांडले.

सामुदायिक विज्ञान विषयाचा नवीन अभ्यासक्रम हा विद्यार्थ्यांच्या ज्ञान व कौशल्याच्या कक्षा रुंदावण्यासाठी अतिशय उपयुक्त असून जीवनातील विविध आव्हाने पेलण्याकरिता त्यांना सक्षम करण्यासाठीही त्याचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. जया बंगाळे यांनी आपल्या प्रास्ताविकात स्पष्ट केले.तसेच या महाविद्यालयाची प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया यशस्वीरित्या राबवून महाविद्यालयास मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रवेशित होण्यासाठी  आटोकाट प्रयत्न केल्याबद्दल प्रवेश प्रक्रिया समिती अध्यक्ष डॉ. शंकर पुरी यांचे या प्रसंगी अभिनंदन केले.

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. वीणा भालेराव यांनी केले. यावेळी नवप्रवेशित विद्यार्थ्यींनी स्नेहा भदर्गे व गायत्री जोशी यांनी या अभ्यासक्रमाविषयी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या. पालक प्रतिनिधी श्री. माणिक रासवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सदरील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. नीता गायकवाड, वरिष्ठ शास्त्रज्ञ, अ.भा.स.सं.प्र. कृषिरत महिला, पाल्य प्राध्यापक डॉ. विद्यानंद मनवर, डॉ. अश्विनी बिडवेयांच्यासह पदवी अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षातील विद्यार्थी व इतर कर्मचारी यांनी प्रयत्न केले. सदरील कार्यक्रमास डॉ.सुनीता काळे,डॉ. विजया पवार, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ शंकर पुरी,डॉ. आश्विनी बेद्रे,प्रा. प्रियंका स्वामी,   प्रा. स्वाती गायकवाड, प्रा. ज्योती मुंडे,प्रा मानसी बाभुळगावकर तथा विद्यार्थी व पालक  बहुसंख्येने उपस्थित होते.