माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली संकरीत गो पैदास प्रकल्पाचा पुढाकार
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत संकरीत गो पैदास
प्रकल्पाची स्थापना सन १९७५ मध्ये करण्यात आली. या प्रकल्पामागचा मुख्य उद्देश
म्हणजे देशी जातीच्या गाईंचे संकरीकरण करून दुग्धोत्पादन वाढवणे आणि त्याचबरोबर
देशी गोवंशाचे संवर्धन करणे हा आहे. मराठवाड्यातील प्रसिद्ध देवणी जातीची जनावरे
ही दुहेरी उपयोगिता (दुग्धोत्पादन व शेतीकाम) यासाठी ओळखली जातात.
सद्यःस्थितीत प्रकल्पात होलस्टीन फ्रिजियन (होलदेव) व देवणी गोवंशाचे एकूण
१७० जनावरे आहेत, त्यापैकी ९० जनावरे ही देवणी गोवंशाची आहेत. महाराष्ट्र शासनाच्या कृषि,
पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व
मत्स्यव्यवसाय विभागाच्या दिनांक १३ जून २०२५ च्या आदेशानुसार राज्यात दरवर्षी २२
जुलै रोजी “शुद्ध देशी गोवंश जतन आणि संवर्धन दिन” साजरा करण्याचे निर्देश देण्यात
आले आहेत.
देशी गायीच्या दुधाची पौष्टिकता, तसेच शेण व गोमुत्राच्या उपयोगामुळे
गायीस "कामधेनू" असे मानले जाते. राज्यातील विविध भागांत विविध देशी
गायींच्या जाती आढळतात. उदा. मराठवाड्यात देवणी, लालकंधारी;
पश्चिम महाराष्ट्रात खिल्लार; उत्तर
महाराष्ट्रात डांगी; तर विदर्भात गवळाऊ. मात्र, देशी गायींची संख्या दिवसेंदिवस घटत चालल्याचे चित्र आहे. त्यामुळे
त्यांच्या संवर्धनासाठी शासनाने २० सप्टेंबर रोजीच्या निर्णयान्वये देशी गायीस
“राज्यमाता गोमाता” म्हणून घोषित केले आहे.
या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत
संकरीत गो पैदास प्रकल्प येथे दिनांक २२ जुलै २०२५ रोजी “शुद्ध देशी गोवंश जतन आणि
संवर्धन दिन” साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली, संचालक संशोधन डॉ. खिजर
बेग यांच्या पुढाकाराने, तसेच प्रकल्प प्रमुख व विभाग प्रमुख
डॉ. गजेंद्र लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रातिनिधिक स्वरूपात देवणी गायीची पूजा करून करण्यात
आली. प्रारंभी विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र लोंढे यांनी देशी गोवंशातील विविधतेचे
महत्त्व, वैदिक काळापासून चालत आलेली संवर्धन परंपरा, तसेच
सेंद्रिय शेतीतील गोवंशाचे योगदान विषद केले. त्यांनी शेतकऱ्यांसाठी पशुपालनाचा
पर्याय आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी महत्त्वाचा असल्याचेही नमूद केले.
पशुविज्ञान शास्त्रज्ञ डॉ. एस. एस. देशमुख यांनी प्रकल्पात १९७५ पासून
देवणी गोवंशाचे संवर्धन आणि अभ्यास करण्यात येत असल्याची माहिती दिली. सहयोगी
प्राध्यापक डॉ. डी. व्ही. बैनवाड यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचे महत्त्व
स्पष्ट केले. डॉ. पी. व्ही. पडघान आणि शास्त्रज्ञ डॉ. नरेंद्र कांबळे यांनीही देशी
गोवंशाच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्त्वावर प्रकाश टाकला.
पदव्युत्तर विद्यार्थी श्री. सार्थक वाजे व कु. सृष्टी भिंगारडे यांनी
संकरीत गो पैदास प्रकल्पातील गोवंश संवर्धन व व्यवस्थापनासंबंधीचे आपले अनुभव शेअर
केले. वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री. जी. पी. भोसले यांनी आभार प्रदर्शन केले. या
कार्यक्रमात कनिष्ठ संशोधन सहाय्यक श्री. रवि काळे, कंत्राटी पशुधन पर्यवेक्षक श्री.
महेंद्र कचरे, कंत्राटी गुत्तेदार श्री. माणिक शिंदे,
तसेच पदव्युत्तर व आचार्य पदवीचे विद्यार्थी, प्रकल्पातील
कामगार व भगिनी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.