ऊसावरील पांढरी माशी नियंत्रण, प्रक्षेत्र भेटी, शेतकरी मेळावे व ऑनलाईन संवादावर भर; माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचा शेतकऱ्यांना विश्वास
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांच्या संकल्पनेतून व विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या
मार्गदर्शनाखाली मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या
बुधवारी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत’ हा उपक्रम विविध गावांमध्ये
राबविण्यात येतो. या उपक्रमात प्रक्षेत्र भेट, चर्चासत्रे, कृती
प्रात्यक्षिके व शेतकरी मेळाव्याद्वारे विद्यापीठातील विविध विषयातील
शास्त्रज्ञांशी संवाद साधून शेतकऱ्यांना मार्गदर्शन प्रदान केले जाते.
दिनांक ९ जुलै रोजी एकूण १२ चमूमधील ५१ शास्त्रज्ञांनी मराठवाड्यातील आठही
जिल्ह्यात ५५० हून अधिक शेतकऱ्यांना भेट दिली, त्यांची शेतीविषयक समस्या जाणून घेऊन
त्यास समाधानकारक उत्तरे देऊन विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
या उपक्रमांतर्गत विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयाद्वारे
मौजे, कंठेश्वर (ता. पुर्णा, जि. परभणी) येथे शेतकरी
मेळावा व प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे
म्हणून माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले,
तर विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांची
प्रमुख उपस्थिती होती.
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना
सांगितले की, विद्यापीठाकडून शेतीमध्ये येणाऱ्या प्रत्येक समस्येचे निराकरण करण्यात
येईल. तसेच, सध्या परिसरातील ऊस पिकावर आलेल्या पांढऱ्या
माशीच्या व्यवस्थापनासाठी विद्यापीठाच्या कीटकशास्त्रज्ञांकडून वेळोवेळी
मार्गदर्शन केले जाईल.
विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना
विद्यापीठ तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासाठी अंतर कमी करण्याचे आवाहन केले.
त्याचप्रमाणे, दर मंगळवार व दर शुक्रवारी घेण्यात येणाऱ्या ‘ऑनलाईन शेतकरी-शास्त्रज्ञ
कृषि संवाद’ कार्यक्रमाची माहिती देऊन शेतकऱ्यांना या कार्यक्रमात सहभागी होण्यास
प्रोत्साहित केले.
मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी सांगितले की, या शुक्रवारी
शेतकऱ्यांसाठी मागणीनुसार ऊस पिकावरील कीड व रोग व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन
केले जाणार आहे. त्यासोबतच ऊस, सोयाबीन व हळद या पिकांच्या
लागवडीचे तंत्रज्ञान, रोग व्यवस्थापन व बायोमिक्सचा वापर
याबाबत अनुक्रमे डॉ. गजानन गडदे, डॉ. प्रफुल्ल घंटे, आणि डॉ. बसलिंगप्पा कलालबंडी तसेच फळबाग व्यवस्थापन व उसावरील पांढरी
माशीच्या व्यवस्थापनाविषयी डॉ. दिगंबर पटाईत यांनी मार्गदर्शन केले. या
चर्चासत्रादरम्यान शेतकऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतल्याने त्यातील अडचणी
सोडविण्यात मदत झाली.
सर्व शास्त्रज्ञांनी मौजे कंठेश्वर परिसरातील पांढरी माशीने प्रादुर्भाव
झालेल्या विविध ऊस प्रक्षेत्राची पाहणी केली व शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन
दिले. या उपक्रमात तालुका कृषी अधिकारी श्री. संतोष भालेराव, मंडळ कृषी अधिकारी
श्री. बालाजी गाडगे, तालुका तंत्र व्यवस्थापक श्री. रविराज
माने आणि ८६हून अधिक शेतकरी सहभागी झाले.