Thursday, July 3, 2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहात "आधुनिक काळातील ताण-तणाव व्यवस्थापन" विषयावर मार्गदर्शन

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि महाविद्यालयातील राजमाता जिजाऊ मुलींच्या वसतिगृहात ‘कृषि दिना’निमित्त १ जुलै २०२५ रोजी  "आधुनिक काळातील ताण-तणाव व्यवस्थापन" या विषयावर व्याख्यान व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. पी. एच. वैद्य व मुख्य वसतिगृह अधीक्षक डॉ. राजेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. दीपा पाटील मॅडम (BHMS, DMAP) या उपस्थित होत्या. त्या वरिष्ठ होमिओपॅथिक सल्लागार, तणाव व्यवस्थापन समुपदेशक, आधुनिक उपयोजित मानसशास्त्रज्ञ, माइंडफुलनेस मास्टर प्रॅक्टिशनर, अध्यात्मिक जीवन प्रशिक्षक, आंतरराष्ट्रीय स्पीकर आणि साउंड हीलिंग प्रॅक्टिशनर म्हणून प्रसिद्ध आहेत.

डॉ. दीपा पाटील मॅडम यांनी आपल्या प्रभावी व्याख्यानात विद्यार्थिनींना भविष्यातील तणावांचे व्यवस्थापन कसे करावे, याबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी तणावमुक्त जीवनासाठी सकाळपासून झोपेपर्यंतच्या दिनचर्येत आवश्यक असलेल्या बदलांवर भर दिला. यामध्ये मोबाइलचा मर्यादित वापर, संतुलित आहार, नियमित योग व व्यायामाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच मासिक धर्माशी संबंधित समस्या व इतर वैयक्तिक अडचणी यावर खुली चर्चा घेत विद्यार्थिनींच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.

कार्यक्रमास वसतिगृहाच्या अधीक्षिका डॉ. गोदावरी पवार, सहयोगी प्राध्यापक डॉ. सुनीता पवार, सहाय्यक प्राध्यापक श्रीमती सारिका नारळे व श्रीमती सुनीता भुरके या उपस्थित होत्या.

या उपक्रमात राजमाता जिजाऊ, उत्तरा, सावित्रीबाई फुले, वसुंधरा आणि दिवाकर रावते या वसतिगृहांतील विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणात सहभाग लाभला. त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाला.