उद्घाटनप्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे मार्गदर्शन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि आत्मा कार्यालय, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने भारत सरकारच्या राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन अंतर्गत ५६ कृषि सखींसाठी पाच दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रशिक्षण दिनांक १५ ते १९ जुलै २०२५ दरम्यान आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण शिबिराचा उद्घाटन सोहळा दिनांक १५ जुलै २०२५ रोजी विद्यापीठाच्या
प्रशासकीय इमारतीतील सिम्पोजियम हॉल (हॉल क्रमांक १८) येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ.
खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ राकेश अहिरे, सेंद्रीय शेती प्रकल्प केंद्राचे प्रमुख डॉ.
आनंद गोरे, डॉ. पपिता गौरखेडे, आत्माचे प्रकल्प उपसंचालक श्री अभिशेष घोडके, प्रगतशील शेतकरी श्री नरेश शिंदे
आणि श्रीमती सुषमा देव यांची उपस्थिती होती.
उद्घाटनप्रसंगी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी उपस्थित कृषि सखींना मार्गदर्शन करताना सांगितले की, हे प्रशिक्षण निवासी
स्वरूपाचे असल्याने कृषि सखींनी विद्यापीठाच्या
संपूर्ण परिसराचा अभ्यास व अवलोकन करावा. हा कार्यक्रम केवळ माहितीपर न राहता कौशल्य
विकासासाठी उपयोगी ठरावा, आणि त्याचा सकारात्मक प्रभाव क्षेत्रात
दिसून यावा, ही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय नैसर्गिक
शेती अभियान हा देशाचा एक महत्त्वाकांक्षी उपक्रम असून, सध्या
रासायनिक शेतीमुळे जमिनीची गुणवत्ता व मानवांचे आरोग्य दोन्ही प्रभावित झाले आहेत.
त्यामुळे नैसर्गिक शेतीकडे वळणे ही काळाची गरज आहे. हे परिवर्तन सहज शक्य नसले तरी
सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे नक्कीच यश मिळू शकते, असा विश्वास
त्यांनी व्यक्त केला. सध्या रासायनिक घटकांच्या अतिरेकी वापरामुळे शेतीची स्थिती खालावलेली
असली तरी आता ती हळूहळू सुधारेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
जर्मनीसारख्या प्रगत देशांमध्येही नैसर्गिक शेतीविषयी उत्सुकता असून, भारतात येऊन ती शिकण्याची तयारी अनेक परदेशी व्यक्तींनी दाखवली आहे. त्यामुळे
या क्षेत्रात विद्यापीठाच्या सेंद्रिय शेती संशोधन प्रकल्पाने योग्य मानके व मापदंड
तयार करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
सध्या अन्नातील घटक योग्य नसल्याने जागतिक स्तरावर चिंता निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर नैसर्गिक शेती हा एक प्रभावी पर्याय ठरू शकतो. मराठवाड्यातील शेतकरी
उत्साही असून, अशा उपक्रमांमध्ये नेहमीच पुढाकार घेतात. विद्यापीठ 'शेतकरी देवो भव:' या भावनेतून कार्य करीत असून,
शेतकऱ्यांना सहभागी करून घेत राष्ट्रीय पातळीवरील उपक्रमांमध्ये सक्रीय
सहभाग नोंदवत आहे.याशिवाय शेतीमध्ये महिलांचाही मोठा वाटा असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक ठिकाणी यशस्वी शेती केली जात आहे. या प्रशिक्षणामध्ये
महिला कृषि सखींना नैसर्गिक शेतीविषयी सखोल
व प्रात्यक्षिकावर भर द्यावा, असे त्यांनी सुचवले. या महिलांना
उत्कृष्ट प्रशिक्षक व मार्गदर्शक बनवण्यासाठी विद्यापीठ भविष्यात अधिक प्रशिक्षण कार्यक्रमांचे
आयोजन करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमादरम्यान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि कृषि यांचा वसंतराव
नाईक कृषि उल्लेखनीय योगदान पुरस्कार – २०२५ प्राप्त झाल्याबद्दल कृषी सखींच्या वतीने
सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. आनंद गोरे यांनी सांगितले की, माननीय पंतप्रधान श्री.
नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून ‘राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान’ दि. २५ नोव्हेंबर
२०२४ रोजी सुरू करण्यात आले असून, यामध्ये ७५ लाख हेक्टर क्षेत्र
नैसर्गिक शेतीखाली आणण्याचे उद्दिष्ट आहे. यासोबतच १५,००० गट
(क्लस्टर्स) तयार करण्यात येणार असून, एक कोटी शेतकरी या अभियानात
सहभागी होणार आहेत. प्रत्येक गटासाठी ५० हेक्टर क्षेत्र निश्चित करण्यात आले असून,
एका गटासाठी दोन कृषि सखींची
नियुक्ती करण्यात येणार आहे. या कृषि सखींमार्फत
संबंधित गटातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. या कृषि सखींना तांत्रिक दृष्टिकोनातून सक्षम करण्यासाठी
या पाच दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच, नियमित कालावधीनंतर भविष्यातही या कृषि सख्यांना प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचेही त्यांनी
नमूद केले.
यावेळी आत्माचे प्रकल्प उपसंचालक श्री अभिशेष घोडके यांनीही कृषि सखीना मार्गदर्शन केले. कार्यक्रमास विद्यापीठातील
डॉ स्मिता सोलंकी, डॉ. नीता गायकवाड, डॉ श्रद्धा धुरुगुडे, तसेच आत्माच्या श्रीमती
स्वाती घोडके आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन डॉ मीनाक्षी पाटील यांनी केले तर आभार डॉ. पपिता गौरखेडे यांनी मानले.
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचा 'वसंतराव नाईक कृषि उल्लेखनीय योगदान पुरस्कार – २०२५' प्राप्त झाल्याबद्दल कृषी सखींच्या वतीने सत्कार करण्यात आला.