Friday, July 18, 2025

वनामकृवित कृषि तंत्रज्ञान आणि विकास कार्यक्रमाच्या परिणाम मूल्यांकनावर कार्यशाळा संपन्न

 परिणाम मूल्यांकन हे सुधारणा व धोरणनिर्मितीसाठी अमूल्य साधन – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
आयएफपीआरआयचे (IFPRI
वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अंजनी कुमार 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि विस्तार शिक्षण आणि कृषि अर्थ शास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने “कृषि तंत्रज्ञान व विकास कार्यक्रमाच्या परिणाम मूल्यांकन: एक दृष्टिकोन” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन १८ जुलै २०२५ रोजी करण्यात आले. ही कार्यशाळा विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीमधील सिंपोजियम हॉल येथे संपन्न झाली.

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते तर नवी दिल्ली येथील आयएफपीआरआयचे (IFPRI) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अंजनी कुमार हे मुख्य अतिथी व प्रमुख वक्ते तसेच सीआयएफइचे अधिष्ठाता डॉ. स्वदेश तिवारी प्रमुख पाहुणे होते. व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम  आणि डॉ. सचिन मोरे आदींची उपस्थिती होती.

या वेळी अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कृषि तंत्रज्ञान व विकास कार्यक्रमाच्या परिणाम मूल्यांकनामुळे केवळ कार्यक्रमाचे यशच मोजले जात नाही, तर भविष्यातील सुधारणा, धोरणनिर्मिती व शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी ते एक अमूल्य साधन ठरते असे सांगितले. तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी शास्त्रज्ञानी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करणे आवश्यक आहे. तसेच  शेतकऱ्यांसोबत सामंजस्य करार करून ज्ञानाचे परस्पर आदान-प्रदान होणे आवश्यक आहे. त्यानंतर त्यांनी भोसी (ता. भोकर) येथील शेतकरी श्री. नंदकिशोर गायकवाड यांच्या उल्लेखनीय कार्याची प्रशंसा केली आणि नमूद केले की अनेक शेतकरी उत्कृष्ट कार्य करत असून, त्यांचे कार्य राष्ट्रीय पातळीवर गाजत आहे. माननीय कुलगुरूंनी पुढे सांगितले की, शेतकऱ्यांनी उद्योगशील राहणे आवश्यक आहे. केवळ इच्छा असून उपयोग नाही, प्रत्यक्ष कृती आणि नवकल्पनांतूनच यश मिळते. विद्यापीठ सध्या मर्यादित मनुष्यबळाचा कार्यक्षमतेने वापर करून उच्च दर्जाचे काम करत आहे. विद्यापीठाकडे विपुल प्रमाणात जमीन, पाणी यासारखी साधनसंपत्ती उपलब्ध आहे आणि तिचा योग्य वापर केला जात आहे. शेतकऱ्यांना मिळणारा नफा, उत्पादन खर्च, जमा-खर्च, मानसिक व सामाजिक बदल यांचे प्रात्यक्षिक मूल्यांकन करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून तंत्रज्ञानाच्या प्रभावाचे विश्लेषण करता येईल. हे कार्य शास्त्रीय पद्धतीने, विश्लेषणात्मक दृष्टिकोनातून केले पाहिजे. त्यासाठी कृषि विस्तार शिक्षण व कृषि अर्थशास्त्र या सामाजिक शास्त्रातील विभागांतून उच्च दर्जाचे विश्लेषणात्मक तंत्रज्ञान व पद्धती (tools) विकसित करणे गरजेचे आहे. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन प्रकल्प उभारण्याचे त्यांनी सुचविले. जर तंत्रज्ञान किंवा यांत्रिकीकरणातून अर्थकारण वगळले तर त्याचे मूल्य शून्य ठरते; त्यामुळे प्रत्येक तंत्रज्ञानाचा आर्थिक लाभ किती झाला, हे जाणून घेणे अनिवार्य आहे. सध्या हवामानातील बदलांमुळे शेती व्यवसाय अधिक धोकादायक बनला आहे. तरीही विद्यापीठाने विकसित केलेला 'गोदावरी' तुर वाण शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न देत आहे, हे देखील अचूक व शास्त्रीय मूल्यांकनातूनच समोर आले आहे.

कृषि तंत्रज्ञान व विकास कार्यक्रमाच्या परिणाम मूल्यांकन या बाबत वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अंजनी कुमार यांनी मुख्य मार्गदर्शन करताना मूल्यांकन प्रश्नांचे प्रकार, परिणाम मूल्यांकन का करावे? निरीक्षण, मूल्यमापन व परिणाम मूल्यांकन यामधील फरक, मूल्यांकन दृष्टिकोन, परिणाम मूल्यांकन केव्हा करावे?, परिणाम मूल्यांकनाचे दृष्टिकोन, सामान्य परिमाणात्मक पद्धती, परिणाम मूल्यांकनाचा रोड मॅप याबाबतही सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, परिणाम मूल्यांकनासाठी वैज्ञानिक दृष्टीकोन, आकडेवारी आधारित विश्लेषण आणि स्थळभेटी या त्रिसूत्रीचा वापर केल्यास अधिक प्रभावी निष्कर्ष प्राप्त करता येतात.

कार्यशाळेत शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार,  सीआयएफइचे अधिष्ठाता डॉ. स्वदेश तिवारी यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविकात विभाग प्रमुख डॉ. राजेश कदम यांनी कृषि विस्तार शिक्षण आणि डॉ. सचिन मोरे यांनी कृषि अर्थशास्त्र विभागात परिणाम मूल्यांकनाचे महत्व विशद केले. तसेच त्यांनी कार्यक्रमाचे संयोजन उत्कृष्टरीत्या केले.

कार्यशाळेत कृषि विद्यापीठाचे सर्व महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, विविध विभागप्रमुख, संशोधक, शास्त्रज्ञ व विद्यार्थी असे २०० हून अधिक संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेतला. सूत्रसंचालन डॉ. रणजीत चव्हाण यांनी केले तर आभार डॉ. धीरज पाथ्रीकर यांनी मानले.