Thursday, July 17, 2025

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची नांदेड येथील कृषि महाविद्यालयास भेट; विद्यार्थ्यांशी संवाद व बांधकाम प्रगतीचा आढावा

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या नांदेड येथील शासकीय कृषि  महाविद्यालय येथे सुरू असलेल्या विविध बांधकाम प्रकल्पांचा माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक १६ जुलै रोजी प्रत्यक्ष भेट देऊन आढावा घेतला. या दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी कामाची पाहणी केली तसेच संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांना आवश्यक सूचना दिल्या.

या पाहणीवेळी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य श्री. भागवतराव देवसरकर, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, उप विद्यापीठ अभियंता डॉ. दयानंद टेकाळे, विभाग प्रमुख व नोडल अधिकारी डॉ. राजेश कदम, डॉ. नरेशकुमार जायेवार तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.

माननीय कुलगुरू महोदयांनी सुरू असलेल्या बांधकाम प्रकल्पांबाबत समाधान व्यक्त केले असून कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना कंत्राटदारास दिल्या. यानंतर, माननीय  कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि व शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना शैक्षणिक व व्यावसायिक मार्गदर्शनही केले. महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी आणि शैक्षणिक प्रगतीसाठी ही भेट अत्यंत फलदायी ठरली असल्याचे डॉ. राजेश कदम यांनी नमूद केले.