Tuesday, July 22, 2025

कापूस उत्पादकता व मूल्य साखळी रूपांतरण विषयक राष्ट्रीय परिषदेत वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे सखोल मार्गदर्शन

 

भारतीय अन्न व कृषी परिषद (ICFA) यांच्या वतीने "कापूस उत्पादकता व मूल्य साखळी रूपांतरण" या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन २२ जुलै २०२५ रोजी इंडिया इंटरनॅशनल सेंटर, नवी दिल्ली येथे करण्यात आले.

या परिषदेत “भारतामध्ये कापसाच्या वाढीसाठी धोरणात्मक व नियामक पाठबळ" या विषयास अनुसरून उद्घाटन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कापूस उत्पादकतेत वाढ घडवण्यासाठी धोरणात्मक आणि नियामक पाठबळ अत्यंत आवश्यक असल्याचे सांगून संपूर्ण मूल्य साखळीत सुधारणा केल्यास कापूस क्षेत्राला अधिक स्थैर्य व आर्थिक लाभ मिळू शकतो, असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आपल्या मार्गदर्शनात व्यक्त केले. पुढे त्यांनी कापसाच्या उत्पादनात होत असलेल्या घटीची प्रमुख कारणे स्पष्ट केली. हवामानातील अनियमितता, कीड व्यवस्थापन, उत्पादनाला मिळणारे बाजारमूल्य, तसेच संशोधन व विस्तार सेवांमधील अंतर ही त्यामागची महत्त्वाची कारणे असल्याचे त्यांनी नमूद केले.

कापसाच्या मूल्य साखळीतील सुधारणेसाठी त्यांनी "उत्पादन, प्रक्रिया, साठवणूक, विपणन आणि निर्यात" या सर्व टप्प्यांमध्ये समन्वय साधण्याचे महत्त्व सांगितले. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना सूतगिरण्या, वस्त्र उद्योग व निर्यातदारांशी थेट जोडण्याची गरज त्यांनी व्यक्त केली, जेणेकरून शेतकऱ्यांना अधिक लाभदायक दर मिळवून देता येतील. याशिवाय, कीडप्रतिरोधक वाणांचा वापर, सूक्ष्म सिंचन पद्धती, हवामान आधारित सल्ला व डिजिटल प्लॅटफॉर्मचा प्रभावी वापर यावर त्यांनी विशेष भर दिला.

या वेळी मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी विद्यापीठाने विकसित केलेल्या नांदेड ४४’ या वाणाची माहिती त्यांनी दिली. यासोबतच विद्यापीठाने कापूस पिकावर केलेल्या संशोधनाचा आढावा घेत एनएच २२०३७ बीटी बीजी २’ आणि एनएच २२०३८ बीटी बीजी २’ हे बीटी बीजी-२ प्रकारातील सरळ वाण सादर केले असल्याची माहितीही त्यांनी उपस्थितांना दिली.

या परिषदेच्या उदघाटन समारंभास कर्नाटक राज्य कृषी किंमत आयोगाचे अध्यक्ष व पंतप्रधान शेतकरी उत्पन्न दुप्पट योजना टास्क फोर्सचे माजी अध्यक्ष श्री अशोक दलवाई (निवृत्त आयएएस), इंडियन टेक्स्टाइल्स इंडस्ट्री फेडरेशनच्या महासचिव श्रीमती चंद्रिमा चॅटर्जी, वस्त्रोद्योग मंत्रालयाचे संचालक श्री पुर्णेश गुरु राणी (IRS), भारतीय अन्न व कृषी परिषदेचे महासंचालक डॉ. तरुण श्रीधर आदी मान्यवरांनी उपस्थिती लावली व आपले विचार मांडले. कार्यक्रमात कपाशी उत्पादनातील आव्हाने, प्रक्रिया उद्योगाची क्षमता, जागतिक निर्यात संधी, तंत्रज्ञानाचा वापर व शाश्वत शेती या मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली.

परिषदेत देशभरातील कृषी विद्यापीठांचे तज्ज्ञ, संशोधक, धोरणकर्ते, उद्योजक आणि शेतकरी प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.