Thursday, July 10, 2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठास आयआयआरएफ (IIRF) २०२५ मध्ये राष्ट्रीय व राज्य स्तरावरील मानाची रँक

विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन, विस्तार व नवोपक्रमात्मक कार्यक्षमतेची पावती... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानी भारतीय शैक्षणिक संस्था मूल्यांकन प्रणाली (आयआयआरएफ – IIRF - Indian Institutional Ranking Framework) २०२५ च्या कृषी व उद्यानविद्या विद्यापीठांच्या गटात राष्ट्रीय स्तरावर ३३वा आणि राज्य स्तरावर २रा क्रमांक मिळवून एक मानाचा ठसा उमटवला आहे.

ही रँकिंग नवी दिल्ली  येथील संस्थात्मक संशोधन केंद्राच्या (ICIR- सेंटर फॉर इन्स्टिट्युशनल रिसर्च)  भारतीय शैक्षणिक संस्था मूल्यांकन प्रणाली यांच्यातर्फे जाहीर करण्यात आली असून, विद्यापीठास १० जुलै २०२५ रोजी अधिकृत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

भारतीय शैक्षणिक संस्था मूल्यांकन प्रणाली ही भारतातील उच्च शिक्षण संस्थांची स्वतंत्र आणि संशोधनाधिष्ठित रँकिंग व्यवस्था आहे. ॲक्शन कन्सल्टिंग प्रायव्हेट लिमिटेड या संशोधन भागीदार संस्थेमार्फत सर्वेक्षण व विश्लेषण करून विविध विद्यापीठांची रँक ठरवली जाते.

ही संस्था जागतिक रँकिंग संस्था क्यूएस (QS) किंवा भारत सरकारची  एनआयआरएफ (NIRF)  यासारख्या आंतरराष्ट्रीय किंवा सरकारी निकषांपेक्षा वेगळी असून ती भारत-केंद्रित दृष्टिकोनातून मूल्यांकन करते. भारतीय शैक्षणिक संस्था मूल्यांकन प्रणालीच्या रँकिंगमध्ये केंद्रीय विद्यापीठे, राज्य सरकारी विद्यापीठे, अभिमत (डीम्ड) विद्यापीठे आणि खाजगी विद्यापीठे अशा वेगवेगळ्या गटांमध्ये विभागणी करून मूल्यांकन केले जाते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने कृषी आणि उद्यानविद्या विद्यापीठांच्या गटात ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व व प्रभावी मार्गदर्शनामुळे हे यश प्राप्त होऊ शकले. यानिमित्ताने कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, ही मान्यता विद्यापीठाच्या शिक्षण, संशोधन, विस्तार व नवोपक्रमात्मक कार्यक्षमतेची पावती आहे. विद्यापीठातील सर्व शिक्षक, संशोधक, विस्तार अधिकारी आणि विद्यार्थ्यांचे हे सामूहिक यश आहे, असेही त्यांनी नमूद केले. विद्यापीठ सातत्याने यशाची शिखरे गाठत आहे. विद्यापीठाच्या कार्यास महाराष्ट्र शासनाचे, पुणे येथील कृषी परिषदेचे तसेच विद्यापीठाच्या कार्यकारी व विद्वत परिषदेचे अनमोल सहकार्य लाभत आहे, याबद्दलही त्यांनी आभार व्यक्त केले.

या यशासाठी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, नियंत्रक श्री. प्रवीण निर्मळ, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, तसेच सर्व महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी यांचे योगदान महत्वाचे ठरले आहे.

तसेच मागील दोन ते अडीच वर्षांत विद्यापीठाने शिक्षण, संशोधन व विस्तार क्षेत्रात राबविण्यात आलेले विविध विशेष उपक्रम रँकिंग मिळविण्यासाठी निर्णायक ठरले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे, वसतिगृहांची दुरुस्ती, विद्यापीठ परिसरातील रस्त्यांचे नूतनीकरण, तसेच सीएसआर निधीतून ‘महाराष्ट्र यांत्रिकीकरण केंद्र’, कौशल्य विकास उपक्रम व ‘कॉमन इन्क्युबेशन सेंटर’ (सामायिक उद्योजकता संवर्धन केंद्र) ची स्थापना यांचा त्यात समावेश आहे. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, सहाव्या अधिष्ठाता समितीच्या पदवी अभ्यासक्रमांची तसेच पदव्युत्तर स्तरावरील बीएसएमए अभ्यासक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे. यासोबतच बाह्यस्त्रोत निधीच्या साहाय्याने सुरू करण्यात आलेले संशोधन प्रकल्प, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबर करण्यात आलेले सामंजस्य करार, शेतकरी बांधवांसाठी राबविण्यात येणारा ‘माझा एक दिवस माझ्या बळिराजासोबत’ हा उपक्रम, नियमितपणे राबविण्यात येणारा ऑनलाईन शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रम, संशोधनाद्वारे विकसित करण्यात आलेले विविध नवीन वाण, अवजारे व तंत्रज्ञान आणि त्यांचे प्रभावी विस्तार कार्य — या सर्व बाबींमुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन व विस्तार कार्याला गती मिळाली असून, त्याचा सकारात्मक परिणाम विद्यापीठाच्या रँकिंगवर झाला आहे.

या रँकिंगमुळे विद्यापीठात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण असून, माननीय कुलगुरूंच्या नेतृत्वाबद्दल सर्वांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.