बीज बचत, अचूक रोपांतर व पीक उत्पादनात वाढीसाठी उपयुक्त..... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान
महाविद्यालयात कार्यान्वित वनामक्रवि -सीएनएच प्रकल्पाअंतर्गत न्यूमॅटिक प्लांटर
या पेरणी यंत्राच्या वापराची प्रथमच
सुरुवात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते करण्यात आली. विद्यापीठाने
शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी अत्याधुनिक मल्टीक्रॉप न्युमॅटिक प्लांटरची ओळख करून
दिली आहे.या यंत्राद्वारे विद्यापीठाच्या बीएसपी खानापूर ब्लॉक ए प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिक
घेण्यात आले.
यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी प्रात्यक्षिक ठिकाणी
भेट देऊन उपस्थितीत विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, कर्मचारी, ट्रॅक्टर
चालक यांना न्यूमॅटिक प्लांटर व इतर आधुनिक पेरणी यंत्राचे महत्व सांगितले. या
यंत्राद्वारे बियांची अचूक टाकणी, रोपांपासून रोपांतील
निश्चित अंतर राखणे तसेच बीजांचे अचूक व एकएकट्या बियांची (सिंग्युलेटेड)पद्धतीने
पेरणी करणे शक्य होणार आहे. या यंत्राच्या वापरामुळे विविध पिकांची पेरणी आधुनिक
पद्धतीने काटेकोर, कमी वेळात व कमी खर्चात केली जावून, बीज बचत, चांगली उगवण प्रक्रिया आणि पीक उभारणीत एकसंधता साधून उत्पादनात
वाढ होईल.
यासारखे अनेक फायदे शेतकऱ्यांना मिळणार आहेत. विविध पिकांसाठी उपयुक्त
असलेल्या या यंत्रामुळे शेतातील कामकाज अधिक कार्यक्षम व वैज्ञानिक पद्धतीने होईल, असा विद्यापीठाचा विश्वास आहे.
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या दूरदृष्टीपूर्ण मार्गदर्शनाखाली हे
यंत्र विद्यापीठात प्रात्यक्षिकासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे यंत्र
प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, मका, हरभरा,
मूग, उडीद, तुर, ज्वार,
गहू आदी छोट्या – मोठ्या पिकांसाठी
पेरणीच्या प्लेट्स बदलून उपयुक्त ठरणार आहे.
संचालक संशोधन डॉ. खिजर बेग यांनी या यंत्राचे प्रात्यक्षिक पहात पुढील
वर्षी मोठ्या प्रमाणात विविध पिकांच्या पेरणी करिता न्यूमॅटिक प्लांटर वापर
करण्याचे सांगितले. कृषि अभियांत्रिकी व
तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके यांनी
विद्यापीठामध्ये विविध ठिकाणी या यंत्राचे प्रात्यक्षिक आयोजित करण्याकरिता
महाविद्यालय सदैव तत्पर असल्याचे सांगितले. यावेळी डॉ. हिराकांत काळपांडे,डॉ. दयानंद टेकाळे, डॉ. हरिहर कौसडीकर, डॉ. गोपाळ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
सदरील यंत्र हे सी एन एच इंडस्ट्रियल इंडिया प्राइवेट लिमिटेड नवी दिल्ली
यांचेकडून घेण्यात आले असून या यंत्राचे प्रशिक्षण विद्यापीठ ट्रॅक्टर चालकांना
कंपनीकडून आयोजित करण्यात आले. हे यंत्र शेतकऱ्यांसाठी अधिकाधिक प्रभावी ठरेल, यासाठी विद्यापीठातील कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयामार्फत प्रात्यक्षिके
व प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जाणार आहेत
विद्यापीठ प्रक्षेत्रावर न्यूमॅटिक प्लांटर या यंत्राचे प्रात्यक्षिक व
प्रशिक्षण आयोजित करण्याकरिता प्रा.
दत्तात्रय पाटील, डॉ. अविनाश राठोड व सी एन एच इंडस्ट्रियल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या
कंपनीचे प्रक्षेत्र व्यवस्थापक इंजि. अमोल कदम, तांत्रिक
अधिकारी श्री सुकलाल सपकाळे, श्री रणबावळे व खानापूर ब्लॉक ए प्रक्षेत्रावरील कर्मचाऱ्यांनी
परिश्रम घेतले.