विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी
आणि विद्यार्थ्यांशी थेट संवाद
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आपल्या कार्यकाळातील तीन वर्षे आज दिनांक २५ जुलै रोजी पूर्ण केली. “शेतकरी देवो भव:” या तत्त्वाशी बांधिल राहून त्यांनी शेतकऱ्यांसाठी, विद्यार्थी-केंद्रीत शिक्षणासाठी, नाविन्यपूर्ण संशोधनासाठी तसेच कर्मचारी-केंद्रित प्रशासनाच्या कार्यपद्धतीद्वारे विद्यापीठाचा सर्वांगीण विकास घडवून आणला. या निमित्ताने विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधण्यासाठी विद्यार्थी कल्याण कार्यालयाच्या वतीने एक विशेष बैठक कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे
स्वतः होते. व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ.
खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. संतोष वेणीकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ.
प्रवीण वैद्य, तसेच विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम
यांची उपस्थिती होती.
यावेळी विद्यापीठाच्या सर्व संचालनालये, महाविद्यालये आणि संशोधन
केंद्रांच्या वतीने माननीय कुलगुरू यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले
की, सर्व अधिकारी आणि विद्यार्थ्यांनी माझ्याबद्दल व्यक्त केलेल्या भावना,
हे माझ्या कर्तव्याचेच प्रतिबिंब आहे. यावेळी त्यांनी 'कुलगुरू' या पदाच्या भूमिकेचे मार्मिक स्पष्टीकरण
दिले. त्यांनी सांगितले की, विद्यापीठाचे कार्यक्षेत्र हे आठ
जिल्ह्यांमध्ये विस्तारलेले आहे. या संपूर्ण यंत्रणेचा कारभार म्हणजेच ‘कूल’ आहे
आणि त्यास योग्य पद्धतीने चालवण्याचे कार्य ‘गुरू’चे आहे. म्हणूनच 'कुलगुरू' ही भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
ते पुढे म्हणाले की, जीवनात जबाबदारी ही खूप महत्त्वाची असते. माझ्या वडिलांनी नेहमीच जबाबदारीचे भान शिकवले. प्रत्येकाने आपला स्वभाव चांगला बनवावा. कार्य करत असताना लोक आपल्यावर प्रेम करतात, पण आपण त्या पदावरून गेल्यानंतर लोकांनी अधिक प्रेम करावे, असे व्यक्तिमत्त्व आपण घडवले पाहिजे. त्यासाठी पदाच्या जबाबदाऱ्या समजून घेत प्रामाणिकपणे काम केले पाहिजे. ते म्हणाले, संकटे येत राहणारच, पण त्यावर मात करत आपली दिशा योग्य ठेवावी. संधी आल्यावर ती ओळखून तिचे सोनं करावे. आपण ध्येयवेडे होऊन काम केले पाहिजे. याच कार्यपद्धतीची फलश्रुती म्हणजे विद्यापीठाला भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या (आयसीएआर) राष्ट्रीय कृषि शिक्षण अधिस्वीकृती समितीद्वारा प्रतिष्ठेचे ‘ए ग्रेड’ मानांकनासह अधिस्वीकृती तसेच राष्ट्रीय पातळीवर रु ६५ कोटींच्या संशोधन प्रकल्पांना मंजुरी मिळालेली आहे. याशिवायही अनेक प्रकल्प व उपक्रम विद्यापीठात राबवले जात असून, त्यातून सातत्याने यश मिळत आहे. विद्यापीठातील यश हे सर्व कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे शक्य झाले आहे. त्यामुळेच विद्यापीठाच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
परभणीत कार्य करत असताना मला येथे अपार प्रेम आणि आपुलकी मिळाली, हीच माझ्यासाठी
सर्वात मोठी भेट आहे, असे त्यांनी भावनिक शब्दांत सांगितले. त्यांना
शेतकऱ्यांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी कार्य करण्याची तीव्र इच्छा होती. त्यामुळेच
त्यांनी भारतीय कृषि अनुसंधान परिषदेतील चार भिंतींच्या आतल्या नोकरीच्या अनेक
संधी नाकारल्या. ‘शेतकरी देवो भव:’ या भावनेने प्रेरित होऊन
विद्यापीठ शेतकऱ्यांसाठी आणि विद्यार्थी-केंद्रित शिक्षण, नाविन्यपूर्ण
संशोधन आणि कर्मचारी-केंद्रित प्रशासनाच्या माध्यमातून कार्यरत आहे. या
कार्यपद्धतीला अजून उंच पातळीवर नेण्याची माझी तीव्र इच्छा आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील सर्व माननीय राजकीय नेत्यांचे, प्रशासनातील वरिष्ठ
अधिकारी तसेच विद्यापीठातील सर्व संचालक व प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार
मानले.
आपल्याला सर्वसाधारण व्यक्तींपासून विशेष बनवण्याचे कार्य विद्यापीठ करते.
त्यामुळे विद्यापीठाला योग्य स्थान व महत्त्व दिले पाहिजे, असे ते म्हणाले. शेवटी
त्यांनी सर्वांना आवाहन केले की, आपण एकमेकांबद्दल
सहकार्याची आणि आपुलकीची भावना ठेवावी, द्वेष आणि मत्सर
बाजूला ठेवावा, नैतिक मूल्ये जपावीत आणि आपले व्यक्तिमत्त्व
उत्तम बनवावे.
शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी आपल्या भाषणात कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांच्या नेतृत्वगुणांचे विशेष कौतुक केले. त्यांनी सांगितले की, त्यांच्या
प्रेरणादायी नेतृत्वामुळे अनेक अधिकारी उत्तम नेतृत्वक्षम व्यक्ती म्हणून घडले
असून विद्यापीठाची प्रतिमा राष्ट्रीय पातळीवर उंचावली आहे. ॲग्रीटेलसारख्या
संस्थेच्या रँकिंगमध्ये विद्यापीठ देशात पहिल्या दहामध्ये तर इतर अनेक रँकिंगमध्ये
पहिल्या ३० क्रमांकात स्थान मिळवले आहे.
डॉ. आसेवार यांनी पुढे सांगितले की, भविष्यात माननीय कुलगुरूंच्या
नेतृत्वात विद्यापीठात मोठे प्रकल्प उभारण्यात येऊन विद्यापीठ देशातील पहिल्या दहा
विद्यापीठांमध्ये स्थान मिळवेल, असा आत्मविश्वास व्यक्त
करण्यात येतो.
माननीय कुलगुरूंच्या कार्यकाळात विद्यापीठाने प्रत्येक क्षेत्रात उल्लेखनीय
प्रगती केली आहे. ते नेहमीच सर्वांसाठी वेळ देवून प्रोत्साहन व प्रेरणा देतात. जरी त्यांचा
कार्यकाळ दीड वर्षांचा राहिला असला, तरी त्यांच्या प्रभावी
नेतृत्वात अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस परिश्रम घेत असून तीन वर्षांचे कार्य पूर्ण
होईल, अशी ठाम आशा व्यक्त करण्यात आली.
कुलसचिव श्री. संतोष वेणीकर यांनी सांगितले की, प्रशासकीय कार्यामध्ये
माननीय कुलगुरू यांचे अनमोल मार्गदर्शन मिळत असून, त्यांच्या
कार्यकाळात अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना लाभ देणारी अनेक महत्त्वपूर्ण कामे यशस्वीपणे
पूर्ण करण्यात आली आहेत.
संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी नमूद केले की, माननीय कुलगुरूंच्या नेतृत्वाने
रु. ६५ कोटींच्या संशोधन प्रकल्पांना मंजुरी मिळवून दिली असून, विद्यापीठाच्या
इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रकल्पांना मान्यता मिळाल्याची नोंद
झाली आहे. याशिवाय, त्यांनी २५०० एकर जमीन वहीतीखाली आणण्यात
यश मिळवले असून, बीज उत्पादनातही लक्षणीय वाढ झाली आहे.
भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या माध्यमातून अनेक प्रकल्प या विद्यापीठाला
प्राधान्याने मंजूर होत आहेत.
विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी नमूद की, माननीय कुलगुरूंनी सर्वांच्या मानसिकतेत सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे. डॉ. प्रवीण वैद्य यांनी आदरणीय कुलगुरू कामाला प्राधान्य देतात व यशाची अपेक्षा न करता ते ईश्वरावर सोडतात, असे सांगितले.
विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी
नमूद केले की, माननीय कुलगुरूंनी पदभार स्वीकारल्यापासून विद्यापीठाचा चेहरा-मोहरा बदललेला
आहे. त्यांनी आजपर्यंतच्या सुमारे एक हजार दिवसांच्या कार्यकाळात ५०० हून अधिक राष्ट्रीय
व आंतरराष्ट्रीय कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडले आहेत. त्यांच्या कुशल नेतृत्वामुळेच
राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक ज्येष्ठ नेते आणि वरिष्ठ अधिकारी विद्यापीठाला भेट
देण्यासाठी आले. विद्यापीठातील आम्ही काही प्रमाणात त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकलो,
याचा आम्हाला अभिमान आहे. भविष्यात आम्ही शंभर टक्के समर्पण भावनेने
कार्य करत त्यांचे स्वप्न साकार करण्याचे आश्वासन देतो. सर्व अधिकार्यांना प्रोत्साहित
करून त्यांच्याकडून पूर्ण क्षमतेने कार्य करून घेणे हे त्यांच्याकडे असलेले नेतृत्वकौशल्यच
आहे.
विभाग प्रमुख डॉ. सचिन मोरे, शास्त्रज्ञ डॉ. गोपाळ शिंदे डॉ. गोदावरी पवार आणि डॉ. अनंत लाड, यांनीही आदरणीय कुलगुरूंच्या कार्याची आदरपूर्वक माहिती दिली.
विद्यार्थिनी उन्नती चव्हाण यांनी मनोगतात सांगितले की, माननीय कुलगुरू
सर्वच कार्यक्रमात सक्रीय सहभागी होतात. त्यांच्याकडून आम्हाला नेहमीच सकारात्मक
ऊर्जा मिळते आणि सतत प्रोत्साहन मिळते. त्यांच्याशी संपर्क करताना कधीही दडपण
जाणवत नाही. तर दुसऱ्या एका विद्यार्थ्याने माननीय कुलगुरूंचा ठाम निर्धार,
साधेपणा आणि हसतमुख, प्रभावी नेतृत्व हे एक
आदर्श असल्याचे नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार डॉ. रणजीत चव्हाण यांनी मानले. या संवाद सत्राला विद्यापीठातील सर्व महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, प्राध्यापक, शास्त्रज्ञ अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने आणि उत्स्फूर्तपणे उपस्थित होते.
