Wednesday, July 30, 2025

सेंद्रीय शेतीद्वारे जमिनीचे आरोग्य संवर्धन : वनामकृविद्वारा 'शेतकरी देवो भव:' उपक्रमांतर्गत ऑनलाईन संवाद सत्र संपन्न

सेंद्रीय शेतीला चालना देणाऱ्या उपक्रमांवर विद्यापीठाचा भर – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे प्रतिपादन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 'शेतकरी देवो भव:' या उपक्रमांतर्गत 'सेंद्रीय शेतीद्वारे जमिनीचे आरोग्य संवर्धन' या विषयावर एक विशेष ऑनलाईन कार्यक्रम दिनांक २९ जुलै रोजी आयोजित करण्यात आला."

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यापीठाचे मा. कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले. प्रमुख उपस्थिती संशोधन संचालक डॉ. खिजर बेग,  विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे यांची होती. कार्यक्रमात प्रगतशील शेतकरी सौ. उज्ज्वला व श्री. बाबासाहेब रनेर (बाभळगाव, ता. पाथरी, जि. परभणी) यांनी आपल्या सेंद्रीय शेतीतील अनुभव व यशोगाथा मांडल्या.

कार्यक्रमात  मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीकोनाचे विशेष कौतुक केले. त्यांनी नमूद केले की, राज्यातील शेती व्यवसायात महिलांचा मोठा सहभाग असून, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कार महिला शेतकऱ्यांनी प्राप्त केले आहेत.

यावेळी बोलताना त्यांनी बाभळगाव (ता. पाथरी) येथील प्रगतशील रनेर दाम्पत्याचे विशेष अभिनंदन केले. त्यांनी सेंद्रीय शेतीतून उल्लेखनीय कामगिरी केली असून, हे दाम्पत्य राज्यातील महिलांच्या यशस्वी वाटचालीचे प्रतीक आहे, असे माननीय कुलगुरूंनी नमूद केले.

कार्यक्रमाचा मुख्य उद्देश महिलांसह सर्व शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीच्या दिशेने प्रवृत्त करणे हा असल्याचे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, नुकत्याच पार पडलेल्या कुलगुरूंच्या बैठकीत विद्यापीठात नैसर्गिक व सेंद्रीय शेतीसंदर्भातील पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात चर्चा झाली आहे. देशातील इतर संस्थांप्रमाणेच येथेही हे अभ्यासक्रम सुरू व्हावेत, यासाठी विद्यापीठ पावले उचलत आहे. या दृष्टीने सेंद्रीय शेतीचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे यांना अभ्यासक्रमाची रूपरेषा निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

शेतकरी देवो भव:” या उपक्रमांतर्गत विद्यापीठाने आजवर सेंद्रीय शेतीविषयी विविध प्रशिक्षण कार्यक्रम व शेतकरी संवाद सत्र आयोजित केली आहेत. अशा संवादातून अनेक नवकल्पना व शेतकऱ्यांचे अनुभव समोर येतात, जे संशोधनासाठी उपयुक्त ठरतात, असे माननीय कुलगुरूंनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, या कार्यक्रमांमधून शेतकऱ्यांना किती प्रत्यक्ष लाभ झाला याचा अभ्यास करणे आवश्यक असून, त्यावर आधारित माहिती प्रकाशित करावी. ही माहिती जनसामान्यांसाठी उपयुक्त ठरेल आणि सेंद्रीय शेती सर्वांसाठी सुलभ होईल. यासाठी आधुनिक तंत्रज्ञान विकसित करणे गरजेचे आहे. प्रयत्नांना वेळ लागू शकतो, पण त्यात सातत्य आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

मृदा शास्त्रज्ञ डॉ. पपिता गौरखेडे यांनी प्रगतशील शेतकरी रनेर दाम्पत्याचे विशेष मुलाखत घेतली. यावेळी रनेर दाम्पत्यानी सांगितले की, सेंद्रीय शेतीतून रासायनिक खते, कीटकनाशके टाळून शेणखत, कंपोस्ट, जीवामृत, दशपर्णी अर्क यांचा वापर केल्याने जमिनीतील सूक्ष्मजीव आणि पोषकतत्त्वांचे प्रमाण वाढते. पीक फेरपालट आणि आंतरपीक वापरून जमिनीवर आलेला ताण टाळता येतो व तिचे जैविक संतुलन टिकवता येते. सेंद्रीय पद्धतीने पिकवलेले अन्नधान्य विषमुक्त व आरोग्यवर्धक असते. ही पद्धत पर्यावरणपूरक असून नद्यांतील व भूजलातील प्रदूषणही कमी करते. तसेच सेंद्रीय साधन सामुग्री शेतातच तयार केल्याने खर्च कमी होतो. सेंद्रीय उत्पादने ही प्रमाणपत्र मिळाल्यास चांगल्या दरात विकली जातात. सेंद्रीय शेतीद्वारे नुसतेच उत्पादन वाढवले जात नाही तर राष्ट्रीय स्तरावर सन्मान देखील प्राप्त होतो. असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी या कार्यक्रमात सहभागी शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीबाबत विचारलेल्या प्रश्नांचे समाधान केले. कार्यक्रमात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांसह सोलापूर, बुलढाणा, येथून ७० हून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवून संवादात सक्रिय सहभाग घेतला.