वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील कृषि विस्तार शिक्षण
विभागाच्या अभ्यास मंडळाची ७३ वी बैठक दिनांक २३ जुलै रोजी संपन्न झाली.
या बैठकीस कृषि महाविद्यालय, परभणीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण
वैद्य प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ही बैठक विभागप्रमुख व अभ्यास मंडळाचे
अध्यक्ष डॉ. राजेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या वेळी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी श्री.
प्रकाश पाटील तसेच अर्धापूर तालुक्यातील शेलगाव येथील प्रगतशील शेतकरी श्री.
हनुमंत उर्फ युवराज माणिकराव राजगोरे-पाटील यांची विशेष उपस्थिती होती.
या बैठकीत पदवी, पदव्युत्तर आणि आचार्य पदवी अभ्यासक्रमातील एकूण ३० विद्यार्थ्यांनी (२६
पदवी व पदव्युत्तर आणि ४ आचार्य पदवी) त्यांच्या संशोधन प्रकल्पांची रूपरेषा सादर
केली. सर्व सदस्यांच्या सूचनांनंतर त्यास मंजुरी देण्यात आली.
प्रमुख पाहुणे डॉ. प्रवीण वैद्य यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यापीठात
विकसित होणाऱ्या तंत्रज्ञानाच्या अंमलबजावणीसंबंधी वास्तव माहिती व परिणामकारकता
विस्तार शिक्षण विभागाच्या माध्यमातूनच संशोधनाच्या आधारावर समजते. यासाठी
द्विमार्गीय संवादाच्या पद्धतीचा अवलंब करीत तंत्रज्ञान पोहोचवावे, अंमलबजावणीतील अडचणी संशोधन केंद्राला कळवाव्यात आणि त्यावर आधारित शिफारसी
तयार करून सामाजिक-आर्थिक विकासासाठी प्रयत्न करावेत, असे ते
म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. राजेश कदम यांनी सांगितले की, दरवर्षी विभागातील
३२ विद्यार्थी मराठवाड्यातील सुमारे ४,००० शेतकऱ्यांपर्यंत
पोहोचून माहिती गोळा करतात. त्यांनी विद्यार्थ्यांना अचूक माहिती संकलनावर भर देत
समाजासाठी उपयुक्त संशोधन शिफारसी देण्याचे आवाहन केले. तसेच, "विद्यापीठाचे दूत" म्हणून कार्य करत शेतकऱ्यांपर्यंत संशोधन
पोहोचवावे, असेही त्यांनी सांगितले.
श्री. हनुमंत राजगोरे-पाटील यांनी आपल्या मनोगतात नमूद केले की, शास्त्रज्ञांच्या
शिफारशींच्या आधारेच शासन धोरणं व योजना ठरवल्या जातात, त्यामुळे
अचूक संशोधन अत्यावश्यक आहे.
श्री. प्रकाश पाटील यांनी विद्यार्थ्यांनी संपूर्णतः शास्त्रीय दृष्टिकोन
अंगीकारावा, लॉजिकल रिझनिंग वापरून विश्लेषण करावे, आणि भरपूर
माहिती संकलित करून विचारपूर्वक निष्कर्ष काढावेत, असे
सांगितले. त्यांनी जिल्हा परिषद राबवत असलेल्या विविध योजनांचा उल्लेख करत,
त्यांचा अभ्यास विभागाने करावा, असे सुचवले.
त्यांनी डीबीटी योजना, रासायनिक खतांचा वापर आणि त्यावरील
खर्च यासंदर्भातही संशोधनाची गरज व्यक्त केली. यावेळी त्यांनी एक महत्त्वाचा
मुद्दा उपस्थित केला की, बहुतांश शेतकरी सरकारी
अधिकाऱ्यांकडून योजना माहितीसाठी येतात, परंतु तांत्रिक
मार्गदर्शनासाठी खाजगी संस्थांवर अवलंबून राहतात. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांनी
आपली विश्वासार्हता वाढविण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
बैठकीचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन अभ्यास मंडळाचे सचिव डॉ. सुनीलदत्त जक्कावाड यांनी केले. या बैठकीस परभणी आणि लातूर येथील विस्तार शिक्षण विभागाचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.