वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान
महाविद्यालयात दिनांक १० जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात आणि
भक्तिभावाने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या
सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे होत्या.
याप्रसंगी डॉ. जया बंगाळे यांनी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेचे ऐतिहासिक
आणि आध्यात्मिक महत्त्व उलगडून सांगितले. त्यांनी नमूद केले की, गुरू म्हणजे
अज्ञानातून ज्ञानाकडे नेणारा दीपस्तंभ असतो. विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंच्या
सान्निध्यात राहून केवळ ज्ञानच नव्हे, तर संस्कारही आत्मसात
करावेत. मातापिता आणि गुरुजनांविषयी सदैव कृतज्ञता आणि आदर बाळगल्यास आयुष्य घडते.
यावेळी विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृतीतील गुरुपौर्णिमेचे स्थान विशद करताना
महर्षी व्यास यांच्या जीवनकार्याचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमात विभागप्रमुख प्रा. नीता गायकवाड, डॉ. वीणा भालेराव आणि डॉ. शंकर पुरी
यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी गुरूंच्या भूमिकेचे जीवनातील
महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून सोहेल हश्मी आणि अपूर्वा लांडगे यांनी
गुरुपौर्णिमा या सणाचे महत्त्व आणि गुरुजनांबद्दलच्या भावना व्यक्त करत आपल्या
मनोगतातून एक भावनिक आणि प्रेरणादायी संदेश दिला.
कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन अपूर्वा लांडगे यांनी
केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक, अधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या
संख्येने उपस्थित होते. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने विद्येची परंपरा आणि
गुरू-शिष्य संस्कृतीचा गौरव करत विद्यार्थ्यांनी आपल्या ऋणांची जाणीव व्यक्त केली.