कार्यकारी परिषदेचे माननीय सदस्य श्री. भागवत देवसरकर यांचा पुढाकार
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाद्वारे माननीय कुलगुरु प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली ‘शेतकरी देवो भवः’ या भावनेतून कृषि विस्ताराचे कार्य अविरत सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून, विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य मा. श्री. भागवत देवसरकर यांच्या पुढाकारातून आणि विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली “विद्यापीठ आपल्या दारी – तंत्रज्ञान शेतावरती” हा विशेष उपक्रम नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात राबविण्यात येत आहे.
दिनांक ०१ व ०२ ऑगस्ट २०२५ रोजी हदगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये तण, कीड व रोग
व्यवस्थापन याविषयक थेट शेतशिवार प्रात्यक्षिके आणि मार्गदर्शन सत्रांचे आयोजन
करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे कीड व रोग
नियंत्रणाच्या तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार असून, त्याद्वारे त्यांना आधुनिक कृषि तंत्रज्ञानाची माहिती दिली जाणार आहे.
कपाशी, हरभरा, सोयाबीन, तूर व ऊस या
पिकांवरील वाढत्या कीड व रोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, विद्यापीठाच्या विविध विभागांतील तज्ज्ञ व शास्त्रज्ञ थेट शेतकऱ्यांच्या
बांधावर जाऊन एकूण पीक व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण
याविषयी सखोल मार्गदर्शन करणार आहेत.
या उपक्रमात विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण
संचालक डॉ. राकेश आहिरे, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे
प्राचार्य डॉ. राहुल रामटेके, केळी संशोधन केंद्राचे प्रभारी
अधिकारी डॉ. शिवाजीराव शिंदे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. बी. व्ही.
भेदे, कृषि विस्तार विद्यावेत्ता डॉ. वसंत सूर्यवंशी,
कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. माणिक कल्याणकर आणि तालुका कृषि
अधिकारी श्री. सदाशिव पाटील हे मान्यवर सहभागी होणार आहेत.
तज्ज्ञ अधिकारी व शास्त्रज्ञ हळद, कापूस, सोयाबीन,
तूर व ऊस या पिकांवरील कीड व रोग व्यवस्थापनासोबतच संपूर्ण पीक
व्यवस्थापनावरही मार्गदर्शन करणार आहेत.
दिनांक ०१ ऑगस्ट रोजी वडगाव बुद्रुक, कोळगाव, कंजारा,
शिवणी, वाळकी बाजार, धानोरा
टाकळा आणि वाळकी बुद्रुक मोठी या गावांना भेटी दिल्या जाणार आहेत. तर ०२ ऑगस्ट
रोजी उमरी जहागीर, वायफना बुद्रुक, येवली,
पिंपळगाव, राजवाडी, गवतवाडी/तळ्याचीवाडी,
घोगरी, चिकाळा आणि ब्रम्हवाडी या गावांमध्ये
थेट शेतकऱ्यांशी संवाद साधून प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येणार आहेत.
शेतकरी बांधवांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन तज्ज्ञ शास्त्रज्ञ
व अधिकाऱ्यांकडून आपल्या पिकांवरील कीड, रोग व उत्पादनवाढीसाठी आवश्यक
उपाययोजनांची माहिती घ्यावी, असे आवाहन कार्यकारी परिषद
सदस्य मा. श्री. भागवत देवसरकर आणि विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.