Thursday, April 23, 2026

वनामकृविच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयात अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ २२ मे २०२६ रोजी अत्यंत उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके उपस्थित होते.

या प्रसंगी व्यासपीठावर विभागप्रमुख डॉ. वीणा भालेराव, माजी विभागप्रमुख डॉ. सुनिता काळे, डॉ. मेधा उमरीकर, माजी प्राध्यापिका डॉ. आशा शेळके तसेच महाविद्यालयाचे जिमखाना उपाध्यक्ष व पदवी अभ्यासक्रमाचे पाल्य प्राध्यापक डॉ. शंकर पुरी उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यानंतर प्राचार्य व प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमात डॉ. राहुल रामटेके यांनी मागील साडेचार महिन्यांपासून सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाचा सहयोगी अधिष्ठाता पदाचा पदभार सांभाळला असल्याने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

अध्यक्षीय भाषणात सहयोगी अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड म्हणाल्या की, जीवन जगण्यासाठी पैसा महत्त्वाचा आहे; तो कमावण्याची कला आत्मसात करा. आई-वडिलांच्या कष्टांची व शिक्षकांच्या मार्गदर्शनाची जाणीव ठेवा. उच्च शिक्षण घ्या आणि संतुलित जीवनशैली अवलंबा.

डॉ. राहुल रामटेके यांनी आपल्या भाषणात सांगितले की, महाविद्यालयाने विद्यार्थ्यांचा पाया भक्कम करण्याचे कार्य केले आहे. पुढील यशस्वी आयुष्याची इमारत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या मेहनतीने व सकारात्मक दृष्टिकोनातून उभी करावी. कोणत्याही परिस्थितीत तात्काळ प्रतिक्रिया न देता संयम ठेवावा, लक्ष केंद्रित ठेवून आचरण करावे आणि कठोर परिश्रम घ्यावेत. चार वर्षांत मिळालेल्या ज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून जीवन यशस्वी करण्यासाठी शिस्त, बंधन व नैतिक मूल्ये जपावीत. तसेच कुटुंबाचा आधार बनून पालक व शिक्षकांचा सन्मान राखावा.

याप्रसंगी महाविद्यालयातील माजी प्राध्यापिका डॉ. सविता काळे, डॉ. मेधा उमरीकर, डॉ. आशा देशमुख तसेच जिमखाना उपाध्यक्ष डॉ. शंकर पुरी यांनी आपले मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तसेच महाविद्यालयातील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात विद्यापीठ, महाविद्यालय व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत भावनिक भावना मांडल्या.

कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ. नीता गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिमखाना उपाध्यक्ष डॉ. शंकर पुरी व द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.