Friday, April 24, 2026

वनामकृवित शाश्वत शेती व नैसर्गिक शेतीविषयक विभागस्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

शाश्वत शेतीसाठी विद्यापीठाचे नाविन्यपूर्ण उपक्रम; नैसर्गिक शेतीला चालना – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानांतर्गत “शाश्वत शेती – समृद्ध शेतकरी” या संकल्पनेवर आधारित विभागस्तरीय कार्यशाळा दिनांक २४ एप्रिल २०२६ रोजी विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण कार्यालयातील दीक्षांत सभागृहात उत्साहात पार पडली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषी आयुक्तालय, पुणे येथील आत्माचे संचालक तथा निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक माननीय श्री. सुनील बोरकर उपस्थित होते. व्यासपीठावर विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, लातूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक श्री. महेशकुमार तीर्थकर, परभणीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. दौलत चव्हाण तसेच लातूर, परभणी, धाराशिव आणि हिंगोली जिल्ह्यातील कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, प्रगतशील शेतकरी व तज्ञ मंडळी उपस्थित होते.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी नमूद केले की, आजच्या कार्यशाळेत शेतकऱ्यांचा उस्फूर्त सहभाग दिसून आला असून सभागृह पूर्ण क्षमतेने भरले, याबद्दल आयोजक व शेतकरी बांधवांचे त्यांनी अभिनंदन केले. महाराष्ट्र हे शेती विकासासाठी देशाला दिशा देणारे राज्य आहे, असे सांगत त्यांनी राज्यातील माननीय मुख्यमंत्री व कृषिमंत्री शेतकऱ्यांना देत असलेल्या सन्मानाचा उल्लेख केला. विद्यापीठ “शेतकरी देवो भव:” या भावनेतून कार्य करत असून, प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी “माझा एक दिवस माझा बळीराजासोबत” तसेच आठवड्यातून दोन दिवस “ऑनलाइन शेतकरी-शास्त्रज्ञ कृषि संवाद” असे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. याशिवाय दरवर्षी तीन मोठ्या शेतकरी मेळाव्यांचे आयोजन करून शेतकऱ्यांशी सातत्याने संवाद साधला जात आहे. यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक व नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाची माहिती मिळत आहे. आजच्या कार्यशाळेत प्रात्यक्षिकाधारित मार्गदर्शनाद्वारे नैसर्गिक शेतीचे ज्ञान वाढण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.

राज्यात शाश्वत शेतीसाठी माननीय राज्यपालांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविले जात असून, याच पार्श्वभूमीवर विद्यापीठ व ‘पोकरा’ (POCRA) यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. हवामान अनुकूल व शाश्वत शेतीसाठी उपयुक्त नैसर्गिक तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी विद्यापीठ, कृषी विभाग व आत्मा हे सर्व घटक एकत्रितपणे कार्य करत आहेत. नैसर्गिक पिकांसाठी विद्यापीठाकडून पीकनिहाय मानके देण्यात येत असून, यामुळे सेंद्रिय व नैसर्गिक शेतीस चालना मिळत आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना होत असून, जनतेलाही शुद्ध व पौष्टिक अन्न उपलब्ध होत आहे, असे त्यांनी नमूद केले.

पुणे येथील आत्माचे संचालक तथा निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक माननीय श्री. सुनील बोरकर यांनी सांगितले की, निसर्गाने सर्व जीवांना जगण्याचा अधिकार दिला आहे आणि निसर्गातील संतुलन राखणे आवश्यक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रासायनिक कीटकनाशकांचा अतिरेक टाळून सेंद्रिय पर्यायांचा वापर करावा. त्यांनी गुलाबी बोंड अळीचे उदाहरण देत सांगितले की, तिच्या नियंत्रणासाठी रासायनिक उपायांपेक्षा निंबोळी अर्कासारखे सेंद्रिय उपाय अधिक प्रभावी ठरतात. यामुळे अंडी व अळी दोन्हींचे नियंत्रण होते. शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा अभ्यास करून नैसर्गिक व सेंद्रिय तंत्रज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. अशा कार्यशाळा हे ज्ञानवृद्धीसाठी अत्यंत उपयुक्त व्यासपीठ असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाची प्रस्तावना लातूर विभागाचे विभागीय कृषी सहसंचालक श्री. महेशकुमार तीर्थकर यांनी केली. सूत्रसंचालन आत्मा, परभणीच्या सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक श्रीमती स्वाती घोडके यांनी केले, तर आभार प्रदर्शन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, परभणी श्री. दौलत चव्हाण यांनी केले.

कार्यशाळेत नैसर्गिक शेतीची संकल्पना, तंत्रज्ञान, अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड व रोग नियंत्रण, मृदा व जलसंवर्धन तसेच उत्पादनाच्या विपणन व्यवस्थापनावर तज्ज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन केले. हवामानानुसार पिकांचे नियोजन व शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

दिवसभर चाललेल्या या कार्यशाळेत सकाळ व दुपार अशा दोन सत्रांमध्ये विविध विषयांवर सखोल चर्चा झाली. प्रात्यक्षिके व पॅनल चर्चेचे आयोजनही करण्यात आले होते. प्रगतशील शेतकऱ्यांनी आपल्या अनुभवांचे शेअरिंग करून इतरांना प्रेरित केले.

कार्यक्रमाच्या शेवटी सहभागींच्या शंकांचे निरसन करण्यात आले. या कार्यशाळेमुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीच्या आधुनिक पद्धतींची माहिती मिळून त्यांच्या उत्पन्नवाढीस निश्चितच मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.