Thursday, April 9, 2026

वनामकृवित महापुरुषांच्या जयंतीनिमित्त प्रेरणादायी कार्यक्रम; युवकांनी विचार आत्मसात करून व्यक्तिमत्त्व विकास साधावा – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या परभणी येथील कृषी महाविद्यालयात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांनी युक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमाची सुरवात प्रसिद्ध व्याख्याते श्री. राहुल गिरी यांच्या व्याखानाने झाली.

या प्रसंगी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, व्याख्याते श्री. राहुल गिरी, विभाग प्रमुख डॉ. सचिन मोरे, डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. एम. जी. जाधव, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. रावसाहेब भाग्यवंत, अध्यक्ष कार्यक्रम समिती  डॉ. रणजीत चव्हाण आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी प्रभावीपणे नमूद केले की, राष्ट्रपुरुषांच्या कार्याचा व विचारांचा सन्मान केल्याने समाजात सकारात्मक जागृती निर्माण होते. त्यांच्या प्रेरणादायी जीवनातून समाजाला योग्य दिशा मिळते. आजच्या युवकांनी महापुरुषांचे विचार केवळ जाणून घेण्यापुरते मर्यादित न ठेवता ते आत्मसात करून आपल्या आचरणात उतरवणे आवश्यक आहे. त्याद्वारे चारित्र्यनिर्मिती, ज्ञानवृद्धी व सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास साधता येतो, जे राष्ट्राच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. पुढे त्यांनी असेही अधोरेखित केले की, अशा जयंती उत्सवांना विद्यापीठ स्तरावर अधिक व्यापक, संगठित व प्रेरणादायी स्वरूप देणे गरजेचे आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी, राष्ट्रीय मूल्ये आणि नेतृत्वगुणांची जाणीव अधिक दृढ होईल.

कार्यक्रमात व्याख्याते श्री. राहुल गिरी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिराव फुले यांच्या महान कार्याचे सखोल व प्रभावी विवेचन केले. त्यांनी आपल्या भाषणात शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित करताना, सामाजिक परिवर्तनासाठी ज्ञान हेच सर्वात प्रभावी साधन असल्याचे स्पष्ट केले.

महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विपुल ग्रंथसंपदेतील विचार, त्यांची अफाट विद्वत्ता, जिद्द आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर कोणतीही प्रतिकूल परिस्थिती जिंकता येते, हे त्यांनी समर्पक उदाहरणांद्वारे पटवून दिले. तसेच महात्मा फुले यांच्या समतावादी विचारसरणीचा संदर्भ देत त्यांनी युवकांना अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली.

युवकांनी या महापुरुषांच्या विचारांचे अनुकरण करून शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचा सर्वांगीण विकास साधावा आणि समाजघडणीत सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रवीण वैद्य यांनी केले, तर वक्त्यांचा परिचय डॉ. रणजीत चव्हाण यांनी करून दिला. सूत्रसंचालन रणजीत वडकुते व आशुतोष मध्येवाढ यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. अनुराधा लाड यांनी केले.