वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांच्या प्रमुख उपस्थितीत वनस्पती वाण संरक्षण व शेतकरी हक्क
प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा माजी महासंचालक माननीय डॉ. त्रिलोचन मोहपात्रा यांनी दिनांक ९ एप्रिल
२०२६ रोजी विद्यापीठाच्या हिमायतबाग (छत्रपती संभाजीनगर) येथील फळ संशोधन
केंद्राला भेट दिली.
यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, फळ संशोधन
केंद्रामार्फत विकसित करण्यात आलेले विविध फळपिकांचे सुधारित वाण गुणवत्तेच्या
दृष्टीने उत्कृष्ट असून राज्यातील शेतकऱ्यांमध्ये त्यांची मोठी मागणी आहे.
विद्यापीठ शेतकऱ्यांच्या गरजेनुसार संशोधनाला प्राधान्य देत असून भविष्यात अधिक
उत्पादनक्षम, रोगप्रतिकारक व बाजारपेठेतील मागणी पूर्ण
करणारे वाण विकसित करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे त्यांनी
स्पष्ट केले.
माननीय डॉ. त्रिलोचन मोहपात्रा यांनी आंबा, मोसंबी यांसारखी प्रमुख फळपिके
चुनखडीयुक्त जमिनीस अत्यंत संवेदनशील असल्याचे नमूद केले. त्यामुळे अशा प्रतिकूल
परिस्थितीतही चांगले उत्पादन देणारे प्रतिकारक्षम वाण विकसित करण्यावर कृषि
विद्यापीठांनी विशेष भर द्यावा, असे त्यांनी प्रतिपादन केले.
ते पुढे म्हणाले की, हवामान बदल, जमिनीची
घटती सुपीकता आणि पाण्याची टंचाई या पार्श्वभूमीवर फळपिकांसाठी टिकाऊ वाणांची
निर्मिती ही काळाची गरज आहे. संशोधनासोबतच विकसित वाणांचे संरक्षण, संवर्धन आणि शेतकऱ्यांपर्यंत प्रभावी प्रसार करणेही तितकेच महत्त्वाचे
आहे. भविष्यातील अन्नसुरक्षा आणि शाश्वत शेतीसाठी ही एक मौल्यवान गुंतवणूक ठरेल,
असेही त्यांनी नमूद केले.
यावेळी बदनापूर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिपक पाटील, फळ संशोधन
केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. संजय पाटील, सहायक
उद्यानविद्यावेत्ता डॉ. रवींद्र नाईनवाड, वरिष्ठ संशोधन
सहायक गिरीश सोनवणे, ओंकार पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
शेवटी संशोधन केंद्रातील विविध प्रकल्प, प्रक्षेत्रे व रोपवाटिकांची पाहणी
करण्यात आली. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संशोधनाच्या प्रगतीविषयी माहिती
दिली.




