मराठवाड्यातील शेतकऱ्यांना होणार फायदा
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, बदनापूर येथे
भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR), नवी दिल्ली पुरस्कृत
‘अनुभवातून शिक्षण’ प्रकल्पांतर्गत “आयस्टर अळंबी बीज उत्पादन आणि लागवड
प्रयोगशाळा इमारती” चे भूमिपूजन गुरुवारी दि. ९ एप्रिल २०२६ रोजी माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात
संपन्न झाले.
या प्रसंगी विद्यापीठ अभियंता इंजि. दीपक कशाळकर, सहयोगी
अधिष्ठाता डॉ. दिपक पाटील, डॉ. सुर्यकांत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी आपल्या
मार्गदर्शनपर भाषणात नमूद केले की, मशरूम शेती
हा कमी जागेत, अत्यल्प पाण्यात व कमी कालावधीत जास्त उत्पन्न
देणारा अत्यंत लाभदायक व शाश्वत व्यवसाय आहे. बदलत्या हवामान परिस्थितीतही हा
व्यवसाय सहजपणे करता येतो, ही त्याची मोठी जमेची बाजू आहे. ते पुढे म्हणाले की, या
अत्याधुनिक प्रयोगशाळेमुळे मराठवाड्यातील ग्रामीण युवक, महिला
बचत गट तसेच शेतकरी बांधवांना कमी गुंतवणुकीत, आधुनिक
तंत्रज्ञानाच्या सहाय्याने स्वयंरोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. यामुळे केवळ
आर्थिक उत्पन्न वाढणार नाही, तर ग्रामीण भागात
रोजगारनिर्मितीला चालना मिळून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल अधिक बळकट होईल. तसेच,
मशरूम उत्पादनासोबत त्याचे प्रक्रिया उद्योग, मूल्यवर्धन
आणि विपणनाच्या संधी निर्माण होऊन कृषी क्षेत्राला नवसंजीवनी मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या प्रकल्पामुळे बदनापूर परिसर मशरूम उत्पादन व
प्रशिक्षणाचे प्रमुख केंद्र म्हणून नावारूपास येईल, असा
विश्वास सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिपक पाटील यांनी व्यक्त केला. तर प्रकल्प प्रमुख
डॉ. संतोष पवार यांनी माहिती देताना सांगितले की, विद्यार्थ्यांसाठी
कमवा आणि शिका (अर्न व्हाईल यू लर्न) या उपक्रमांतर्गत ही प्रयोगशाळा पूर्ण
झाल्यावर विद्यार्थ्यांना ऑयस्टर मशरूमचे बीज (स्पॉन) तयार करणे, लागवड तंत्रज्ञान, प्रक्रिया व विपणन यांचे
प्रत्यक्ष प्रशिक्षण मिळेल. भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या च्या ‘अनुभवातून
शिक्षण’ या योजनेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना कृषि पदवीचे शिक्षण घेतानाच
त्यांच्यामध्ये उद्योजकता विकासीत बनवणे हा आहे, असे सांगितले.
भूमिपूजन सोहळ्यासाठी उप-अभियंता इंजि. श्री. सुहास
धारासुरकर व शाखा अभियंता इंजि. श्री. शेख अहेमद शेख हुसेन, बदनापूर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सचिन सोमवंशी, कंत्राटदार श्री कृष्णा जी. उत्तरवार यांच्यासह कृषी महाविद्यालय बदनापूर
येथील प्राध्यापक अधिकारी कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



