Friday, April 10, 2026

वनामाकृविच्या मध्यवर्ती प्रक्षेत्रावर वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि माननीय अध्यक्ष डॉ. त्रिलोचन मोहपात्रा यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी व वन विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यापीठाच्या मध्यवर्ती प्रक्षेत्र अंतर्गत बलसा ब्लॉकमध्ये दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी “वृक्षारोपण कार्यक्रम” उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. पर्यावरण संवर्धन व शाश्वत शेतीला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमास मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भारत सरकारच्या वनस्पती वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणाचे माननीय अध्यक्ष डॉ. त्रिलोचन मोहपात्रा उपस्थित होते. त्यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या वेळी मान्यवरांनी प्रातिनिधिक स्वरुपात प्रत्यक्ष खड्डा खणून, रोप लावून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

यावेळी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ विश्वनाथ खंदारे, डॉ दीपक पाटील, मध्यवर्ती प्रक्षेत्राचे प्रमुख तथा विभाग प्रमुख डॉ. विलास खर्गखराटे, डॉ. हिराकांत काळपांडे, प्रभारी अधिकारी डॉ सुनिल उमाटे तसेच परभणी वन विभागाचे अधिकारी डॉ. आर. पी. नाळे, श्री. जी. पी. ढगे, श्री. एच. एन. जाधवर यांच्यासह विद्यापीठातील विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, विद्यापीठ ‘शेतकरी देवो भव:’ या संकल्पनेवर कार्यरत असून पर्यावरणपूरक उपक्रमांना नेहमीच प्राधान्य देण्यात येईल.

प्रमुख पाहुणे माननीय डॉ. मोहपात्रा यांनी आपल्या भाषणात सांगितले की, वृक्षारोपण ही केवळ औपचारिकता नसून ती भविष्यासाठीची गुंतवणूक आहे. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने वृक्षलागवड व संवर्धनात सक्रिय सहभाग घ्यावा.

हा कार्यक्रम परभणी येथील सोयाबीन न्यूक्लियस बियाणे उत्पादन केंद्र, बालसा ब्लॉक येथे संपन्न झाला. कार्यक्रमामुळे परिसरात पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती कुंडीकर यांनी केले.