Thursday, April 9, 2026

वनामकृविच्या लिहाखेडी कृषि महाविद्यालयास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि व माजी महासंचालक माननीय डॉ. त्रिलोचन मोहपात्रा यांची भेट

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या लिहाखेडी (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील कृषि महाविद्यालय तसेच राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि वनस्पती वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा माजी महासंचालक माननीय  डॉ. त्रिलोचन मोहपात्रा यांनी दिनांक ९ एप्रिल २०२६ रोजी भेट दिली.

या भेटीदरम्यान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयातील अधिकारी व विद्यार्थ्यांसोबत संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी सहयोगी संचालक (संशोधन) डॉ. सुर्यकांत पवार, कृषि महाविद्यालय (बदनापूर) चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दीपक पाटील, कृषि विज्ञान केंद्र प्रमुख डॉ. दीप्ती पाटगावकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक व भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील असल्याचे सांगितले. राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पांतर्गत विकसित जैविक औषधे व जैविक खते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. तसेच जैविक कीडनियंत्रण साधनांचा वापर वाढविण्याचे आवाहन करताना बाजरीच्या ‘एएचबी-१२००’ या वाणाचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले.

विद्यार्थ्यांनी समस्या सकारात्मक दृष्टीने स्वीकारून त्यावर मात करावी, तसेच उपलब्ध संधींचे सुवर्णसंधीत रूपांतर करावे, असे आवाहनही त्यांनी केले. विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी विद्यापीठातर्फे सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शास्त्रज्ञ, कर्मचारी व मजूर यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक करून त्यांना पुढील कार्यासाठी प्रोत्साहित केले.

माजी महासंचालक माननीय डॉ. त्रिलोचन मोहपात्रा यांनी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी निसर्गातील विविध घटकांचा अभ्यास करून नाविन्यपूर्ण संशोधनावर भर द्यावा, जैवविविधतेचे महत्त्व ओळखावे आणि आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून कृषि क्षेत्रातील आव्हानांवर मात करावी, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

प्रारंभी सहयोगी संचालक (संशोधन) डॉ. सूर्यकांत पवार यांनी प्रकल्पाचा आढावा सादर केला. बैठकीनंतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

दरम्यान, मान्यवरांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली. तसेच जैविक औषधे व जैविक खतांच्या संशोधन व उत्पादन प्रयोगशाळेस भेट देऊन विविध जैविक उत्पादनांची माहिती घेण्यात आली. ट्रायकोकार्ड निर्मिती प्रक्रियेचेही अवलोकन करण्यात आले. या कार्याचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले.

याप्रसंगी राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पाचे डॉ. दिलीप हिंगोले, डॉ. सी. बी. पाटील, डॉ. आशिष बागडे, डॉ. ज्ञानदेव मुटकुळे, श्री. संतोष ढगे यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. सुरेखा कदम यांनी केले.