Saturday, April 4, 2026

वनामकृविद्वारा विकसित बैलचलित सुधारित अवजारे व यंत्रांचे कोल्हापूर येथील कृषि विज्ञान केंद्रात ‘तंत्रज्ञान स्त्रोत केंद्रा’चे उद्घाटन

आधुनिक व पारंपरिक तंत्रज्ञानाच्या संगमातून शेती उत्पादनवाढीला चालना : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या प्रायोजकत्वाखाली ‘पशुसंवर्धनाचे यांत्रिकीकरण योजना’ अंतर्गत विकसित विविध बैलचलित सुधारित अवजारांच्या प्रसारासाठी भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR) अंतर्गत कार्यरत श्री सिद्धगिरी कृषि विज्ञान केंद्र, कणेरी मठ (ता. करवीर, जि. कोल्हापूर) येथे “तंत्रज्ञान स्त्रोत केंद्र (TRC)” स्थापन करण्यात आले आहे.

या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे उद्घाटन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि कणेरी मठ येथील कृषि विज्ञान केंद्राचे अध्यक्ष परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांच्या शुभहस्ते दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी संपन्न झाले.

या केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठांतर्गत पशुसंवर्धन यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत विकसित अवजारे व यंत्रांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, तसेच बैलचलित सुधारित अवजारे व यंत्रसामग्रीबाबत प्रशिक्षण व प्रत्यक्ष प्रात्यक्षिके देणे हा मुख्य उद्देश आहे.

यावेळी बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी या उपक्रमामुळे आधुनिक व पारंपरिक तंत्रज्ञानाचा संगम साधून शेतकऱ्यांची उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होईल. तसेच ग्रामीण भागातील पशुसंवर्धन क्षेत्राला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. पुढे त्यांनी तंत्रज्ञान स्त्रोत केंद्रातील अवजारांचा वापर करून नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला अधिक प्रोत्साहन देण्याचे आवाहनही केले.

परमपूज्य काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी सांगितले की, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या या अवजारांचा वापर या भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होऊन उत्पादनवाढीस मदत होईल व मशागत खर्चात बचत होईल. तसेच या अवजारांचा उपयोग कृषि विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर नैसर्गिक शेतीत प्रभावीपणे करता येईल. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे या तंत्रज्ञानाचे महत्त्व पटवून दिले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी पशुसंवर्धन यांत्रिकीकरण योजनेचे संशोधन अभियंता डॉ. दयानंद टेकाळे, पशुशास्त्रज्ञ डॉ. संदेश देशमुख, श्री. दीपक यंदे तसेच कणेरी मठ येथील कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र सिंह, डॉ. पांडुरंग काळे, डॉ. विश्वंभर जाधव, डॉ. प्रतिभा ठोंबरे व इतर अधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.