वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या गोळेगाव येथील कृषी महाविद्यालयास वनस्पती वाण संरक्षण
व शेतकरी हक्क प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा माजी महासंचालक माननीय डॉ. त्रिलोचन
मोहपात्रा यांनी दिनांक ११ एप्रिल २०२६ रोजी सदिच्छा भेट दिली. त्यांच्या
उपस्थितीमुळे महाविद्यालयीन परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी त्यांनी
प्राध्यापक,
अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थ्यांशी संवाद
साधत मार्गदर्शन केले. आपल्या प्रेरणादायी भाषणात ते म्हणाले की, आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळविण्यावर न थांबता
आधुनिक तंत्रज्ञान, कौशल्ये व उद्योजकता आत्मसात करणे
अत्यावश्यक आहे. “नोकरी शोधणारे नव्हे, तर नोकरी निर्माण
करणारे बना,” असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
बी.एस्सी. (कृषी)
अभ्यासक्रमातील सातव्या सत्रातील कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत इंडस्ट्रियल
अटॅचमेंट व व्हिलेज अटॅचमेंटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष शेतीतील
समस्या,
तंत्रज्ञानाचा वापर व शेतकऱ्यांच्या गरजा समजून घ्याव्यात, असे त्यांनी स्पष्ट केले. विद्यापीठ व संशोधन केंद्रांनी विकसित केलेल्या
शिफारशींचा प्रभावी वापर करून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविणे ही विद्यार्थ्यांची
जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच आठव्या सत्रातील अनुभवातून शिक्षण
कार्यक्रमाच्या (Experiential Learning Programme) मॉडेल
अंतर्गत हँड्स-ऑन प्रशिक्षण, कौशल्य विकास, उत्पादन प्रक्रिया, मूल्यवर्धन व विपणन व्यवस्थापन
या घटकांवर विशेष भर देऊन विद्यार्थ्यांनी स्वतःचे उद्योग उभारावेत, असे त्यांनी सांगितले. कृषी क्षेत्रात स्टार्टअप्स, अॅग्री-उद्योजकता
व नवकल्पनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध
असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
भविष्यात पारंपरिक
नोकऱ्यांच्या संधी कमी होत चालल्या असून, नव्या तंत्रज्ञानावर आधारित
कृषी व्यवसाय, प्रक्रिया उद्योग, कृषी
सेवा केंद्रे व डिजिटल कृषी यांसारख्या क्षेत्रांत विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा,
असे भावनिक आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञान,
कौशल्य व नवोन्मेषाच्या बळावर स्वतःसह शेतकऱ्यांचे उत्पन्न
वाढविण्याचे ध्येय ठेवावे, असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षण विभागाचे डॉ. प्रवीण राठोड, डॉ. डी. एच. सारंग यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना उद्योजकतेची नवी दिशा मिळाली असून कृषी क्षेत्रातील संधींबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला.



.jpeg)
