Thursday, April 16, 2026

वनामकृविच्या पाणी व्यवस्थापन प्रकल्पाद्वारे अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना तुषार सिंचन संचाचे वाटप

सूक्ष्म सिंचन म्हणजे पाण्याची बचत, शेतीची समृद्धी आणि शाश्वत शेतीकडे वाटचाल! – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वित सिंचन पाणी व्यवस्थापन प्रकल्प व भारतीय कृषि अनुसंधान परिषदेअंतर्गत भुवनेश्वर येथील भारतीय जल व्यवस्थापन संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी तुषार सिंचन संच वाटप कार्यक्रम दिनांक १६ एप्रिल २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला.

अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके, तसेच प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी आणि परभणी जिल्ह्यातील पिंपळगाव (ठोंबरे) व करडगाव येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अनुसूचित जाती (SC SP) उपयोजनेअंतर्गत पिंपळगाव (ठोंबरे), ता. जि. परभणी येथील १० शेतकऱ्यांना तसेच अनुसूचित जमाती (TSP) उपयोजनेअंतर्गत करडगाव, ता. जि. परभणी येथील ०५ शेतकऱ्यांना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते एकूण १५ तुषार सिंचन संचांचे वाटप करण्यात आले.

यावेळी माननीय कुलगुरूंनी शेतीमध्ये पाण्याचे अनन्यसाधारण महत्त्व अधोरेखित केले. सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याचे योग्य नियोजन करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अपेक्षित केलेल्या सर्वसमावेशक विकासासाठी सूक्ष्म सिंचनाचा उपयोग महत्त्वाचा ठरू शकतो, असे त्यांनी प्रतिपादन केले. पाणी बिना और ज्ञानी बिना खेती नहीं” या ओळींमधून त्यांनी विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले.

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी तुषार व ठिबक सिंचन पद्धती तसेच विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध पिकांच्या वाण व तंत्रज्ञानाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

प्रास्ताविक मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी यांनी केले. त्यांनी प्रकल्पांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम व संशोधन कार्याची माहिती दिली. तसेच डॉ. सुमंत जाधव (विभाग प्रमुख) व डॉ. विशाल इंगळे (सिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग) यांनी तुषार सिंचन संचाचा योग्य वापर, निगा व देखभाल याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

या उपक्रमामुळे मराठवाड्यातील अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना पाणी बचत तंत्रज्ञानाचा लाभ होऊन शेती उत्पादनात वाढ होण्यास मदत होणार आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. ऋषिकेश औंढेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. भास्कर सुरनर, श्री. सोनू धुर्वे, श्री. देवेंद्र कुरा, श्री. युवराज भोगील, श्री. विलास जाधव, श्री. प्रकाश मोते, श्री. बाळू रनेर, श्री. महादेव भाले व श्री. संजय देशमुख यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास विद्यापीठातील अधिकारी व परिसरातील अनेक शेतकरी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.