वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
अंतर्गत सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या मानव विकास आणि कौटुंबिक अभ्यास विभागाद्वारे
विद्यार्थ्यांनी ‘बालविवाह प्रतिबंधावर पालक शिक्षण’ या अत्यंत महत्त्वपूर्ण
विषयावर इंदेवाडी (ता. परभणी) येथे दिनांक १९ एप्रिल २०२६ रोजी प्रभावी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
केले.
या कार्यक्रमांतर्गत पदवीपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी “बालविवाह” या
विषयावर सादर केलेली नाटिका विशेष आकर्षण ठरली. विद्यार्थ्यांनी अत्यंत जिवंत
अभिनय, संवादकौशल्य आणि भावनिक मांडणीच्या
माध्यमातून बालविवाहाचे दुष्परिणाम, त्यामागील सामाजिक व
आर्थिक कारणे, तसेच त्यावरील कायदेशीर व प्रतिबंधात्मक उपाय
प्रभावीपणे उलगडून दाखवले. या सादरीकरणामुळे ग्रामस्थांमध्ये विषयाबाबत सखोल
जागरूकता निर्माण झाली.
यावेळी बालविवाह प्रतिबंध अधिनियम, २००६
अंतर्गत असलेल्या तरतुदी, अल्पवयीन मुलींच्या आरोग्य,
शिक्षण व भविष्यावर होणारे दुष्परिणाम याविषयीही सविस्तर मार्गदर्शन
करण्यात आले. “शिक्षण हीच खरी सशक्तीकरणाची गुरुकिल्ली आहे” हा संदेश
विद्यार्थ्यांनी ठळकपणे मांडला.
या उपक्रमास डॉ. वीणा भालेराव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास
उपस्थित ग्रामस्थ, पालक व युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद
देत बालविवाह थांबविण्यासाठी कटिबद्धता व्यक्त केली. काही नागरिकांनी भविष्यात अशा
प्रथांना विरोध करण्याची आणि इतरांनाही जागरूक करण्याची शपथ घेतली.
सदर उपक्रमामुळे ग्रामीण भागात बालविवाहास प्रतिबंध करण्यासाठी सकारात्मक
वातावरण निर्माण होण्यास मोठी मदत होईल, तसेच
समाजात शिक्षण, समानता व सशक्तीकरणाच्या मूल्यांना चालना
मिळेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला.
