वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे विस्तार
शिक्षण संचालनालयाच्या वतीने शेतकरी, शास्त्रज्ञ, विस्तारक, विद्यार्थी तसेच कृषि विभागाचे अधिकारी व
कर्मचारी यांच्यासाठी “हवामान-सक्षम सेंद्रिय व नैसर्गिक शेतीसाठी स्थानिक वाणांचे
व्यवस्थापन” या विषयावर एक दिवसीय परस्परसंवादी कार्यशाळा दिनांक १० एप्रिल २०२६ रोजी संपन्न
झाली.
या
कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माननीय कृषि मंत्री नामदार श्री.
दत्तात्रयजी भरणे यांच्या शुभेच्छा संदेशाद्वारे करण्यात आले. अध्यक्षस्थानी
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून भारत
सरकारच्या वनस्पती वाण संरक्षण व शेतकरी हक्क प्राधिकरणाचे माननीय अध्यक्ष डॉ.
त्रिलोचन मोहपात्रा उपस्थित होते.
व्यासपीठावर विद्यापीठाचे
विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे,
शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन
संचालक डॉ. खिजर बेग, नियंत्रक श्री. आनंद कदम, सहयोगी अधिष्ठाता डॉ प्रवीण वैद्य,
विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे माजी सदस्य
श्री रवी पतंगे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे,
शिक्षण प्रभारी डॉ रणजीत चव्हाण, प्रगतशील शेतकरी श्री जयाजी पाईकराव,
श्री. भगवान इंगोले, श्री. मधुकर घुगे आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती
माननीय
कृषिमंत्री नामदार श्री. दत्तात्रयजी भरणे यांनी संदेशाद्वारे मार्गदर्शन करताना सांगितले
की, रासायनिक घटकांचा
पिके, जमीन तसेच पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. स्थानिक
वाण हे हवामानास अनुकूल व अधिक प्रतिकारक्षम असल्याने त्यांचा वापर करणे आवश्यक
आहे, असे त्यांनी नमूद केले.
यावेळी
त्यांनी श्रीमती राहीबाई पोपरे यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांच्या अनुकरणातून
स्थानिक व पर्यावरणपूरक वाणांची निवड करण्याचे आवाहन केले. स्थानिक वाणांचे
महत्त्व लक्षात घेता जिल्हास्तरावर स्थानिक वाणांची ‘सीड बँक’ स्थापन करण्याची
घोषणा त्यांनी केली. या उपक्रमात महाबीजचे योगदान घेतले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र
शासनाचा कृषी विभाग माननीय मुख्यमंत्री व माननीय उपमुख्यमंत्री यांच्या
नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे,
असे त्यांनी नमूद केले. तसेच कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी स्थानिक
व देशी वाणांचे ज्ञान आत्मसात करून त्याच्या प्रसारासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की,
माननीय डॉ. त्रिलोचन मोहपात्रा यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने
आयोजित प्रदर्शनीला भेट देऊन सहभागी शेतकऱ्यांना राष्ट्रीय पातळीवर कशाप्रकारे मदत
करता येईल यावर चिंतन केले. विद्यापीठाचा “शेतकरी देवो भव:” हा केवळ नारा नसून त्या विचारधारेवरच कार्य सुरू असल्याचे
त्यांनी स्पष्ट केले. हवामान बदलामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पूरस्थिती, दुष्काळ तसेच अतिवृष्टीचा सामना करावा लागत
आहे. या प्रदेशात कोरडवाहू शेती क्षेत्र अधिक असून किडी व रोगांचा प्रादुर्भावही
वाढत आहे. महाराष्ट्र हवामान बदलाच्या दुष्परिणामांमध्ये देशात तिसऱ्या क्रमांकावर
असल्याचेही त्यांनी नमूद केले.
या
परिस्थितीचा सामना करण्यासाठी सेंद्रिय व नैसर्गिक शेतीला चालना देणे आवश्यक असून, नैसर्गिक शेतीद्वारे जोखीम व्यवस्थापन साधत
शाश्वत शेती शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी जमीन तयार करण्यापासून ते
साठवणुकीपर्यंत शेतकरी-केंद्रित तंत्रज्ञान विकसित करण्यात येणार आहे. तसेच
संमिश्र पीक पद्धती अवलंबणे अत्यावश्यक असून, यासाठी
शेतकऱ्यांच्या सक्रिय पुढाकाराची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
विद्यापीठ
विद्यार्थी-केंद्रित शिक्षण, नाविन्यपूर्ण संशोधन, शेतकरी-केंद्रित विस्तार कार्य
आणि कर्मचारी-केंद्रित प्रशासन राबवत आहे. याचमुळे शैक्षणिक, संशोधन व विस्तार क्षेत्रात महाराष्ट्रामध्ये विद्यापीठ अग्रस्थानी राहून
भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा ‘अ’ दर्जा प्राप्त करण्यात यश मिळाले आहे.
विद्यापीठाच्या
कार्यासाठी केंद्र व महाराष्ट्र शासनाचे सहकार्य लाभत असून, हवामान अंदाजासाठी यंत्रणा व संशोधन केंद्रांचे
बळकटीकरण करण्यात आले असल्याबद्दल त्यांनी आभार मानले. तसेच विद्यापीठात सुरू
असलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध उपक्रमांचाही त्यांनी उल्लेख
केला.
पूर्वी
पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे परभणी हे दूरस्थ क्षेत्र असल्याची भावना निर्माण
होत असल्याने राष्ट्रीय पातळीवरील मान्यवर व शास्त्रज्ञ येथे येण्यास टाळत होते.
मात्र ही परिस्थिती बदलण्याचा निर्धार करण्यात आला होता. आज डॉ. मोहपात्रा
यांच्यासारख्या व्यक्तिमत्त्वाची उपस्थिती ही त्या प्रयत्नांच्या यशाची साक्ष
असल्याचे त्यांनी नमूद केले.
माननीय डॉ.
त्रिलोचन मोहपात्रा यांनी माननीय कुलगुरूंच्या ‘शेतकरी देवो भव:’ या भावनेचे
अभिनंदन करत मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले. उपाशी माणसासाठी
देव म्हणजे अन्न असून तेही शुद्ध व गुणवत्तापूर्ण मिळणे आवश्यक आहे; ही गरज कालही होती, आजही
आहे आणि भविष्यात अधिक वाढणार आहे, असे त्यांनी नमूद केले.
यासाठी एकात्मिक शेती पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे असून त्याद्वारे शाश्वत शेती
साध्य होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. शाश्वत शेतीसाठी
त्यांनी तीन महत्त्वाच्या बाबी अधोरेखित केल्या. त्यामध्ये तंत्रज्ञान हे
आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असावे, सामाजिक दायित्व जपणारे
असावे आणि मानवी आरोग्याचे संवर्धन करणारे असावे, असे
त्यांनी स्पष्ट केले. तसेच शेती करताना जमीन व वातावरण प्रदूषित होणार नाही याची
विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
या बाबी
लक्षात घेऊन शास्त्रज्ञ व शेतकरी यांनी समन्वयाने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. आहारामध्ये गुणवत्ता
असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. हवामानानुकूल तंत्रज्ञान विकसित
करण्यासाठी देशी वाण, सेंद्रिय व नैसर्गिक शेती पद्धतींचे
संवर्धन, बचत व प्रभावी अवलंबन करावे, असेही
त्यांनी सांगितले.
बियाणे व
वाणांच्या संरक्षणासाठी तसेच शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी केंद्र सरकारच्या
संस्थांमार्फत विविध लाभ दिले जातात,
त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे त्यांनी
नमूद केले. यासोबतच माननीय कुलगुरूंच्या कार्याचे त्यांनी कौतुक करून अभिनंदन केले.
कार्यक्रमात
मान्यवरांच्या हस्ते प्रगतशील शेतकरी श्री. जयाजी पाईकराव, श्रीमती पूजा जमाले, श्री.
मधुकर घुगे, श्री. गणेशराव शेंगुळ, श्री.
ज्ञानोबा पारडे तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचा शेतकरी पुरस्कार प्राप्त श्री.
शिंदे यांचा सत्कार करण्यात आला.
प्रमुख
अन्वेषक डॉ. आनंद गोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. तांत्रिक सत्रात डॉ.
पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. कैलास डाखोरे,
डॉ. हरिहर कोरडीकर, डॉ. मधुकर मोरे आणि डॉ.
आनंद गोरे यांनी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर सेंद्रिय व नैसर्गिक शेतीला चालना
देण्यासाठी स्थानिक वाणांचे महत्त्व, त्यांचे संवर्धन व
व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात
शेतकरी श्री. दिलीप कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करताना वाढती लोकसंख्या आणि
जैववैविध्याचा विचार करून संकरित वाणांच्या तुलनेत नैसर्गिक वाणांना चालना
देण्याची गरज असल्याचे मत मांडले.
सूत्रसंचालन
शिक्षण प्रभारी डॉ. रणजीत चव्हाण यांनी केले,
तर आभार प्रदर्शन डॉ. पपीता गौरखेडे यांनी मानले.
कार्यशाळेचे यशस्वी आयोजनासाठी
माननीय कुलगुरू महोदय, संचालक संशोधन, संचालक
विस्तार शिक्षण आणि संचालक शिक्षण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजक विभागप्रमुख डॉ.
हिराकांत काळपांडे,
सेंद्रिय व नैसर्गिक शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख
अन्वेषक डॉ. आनंद गोरे, उपसंचालक (संशोधन) डॉ. हरिहर कौसडीकर
तसेच कृषी जैवतंत्रज्ञान महाविद्यालय (लातूर) चे सहयोगी अधिष्ठाता डॉ. अच्युत
भरोसे यांच्यासह विविध समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सर्व सदस्य यांनी परीश्रम घेतले.
कार्यक्रमासाठी
संपूर्ण मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमधील विद्यापीठांचे विविध विभाग, कृषी
विभाग व कृषी विज्ञान केंद्रांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. एकूण ७२४ हून अधिक
सहभागी उपस्थित होते, यामध्ये १२४ अधिकारी आणि ६०० हून अधिक
शेतकऱ्यांचा समावेश होता.
कृषी
प्रदर्शनाचे आयोजन
या
कार्यशाळेच्या निमित्ताने कृषी प्रदर्शनाचे आयोजन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात
आले. या प्रदर्शनामध्ये विविध पिकांच्या स्थानिक वाणांचे (लँडरेसेस), पारंपरिक बियाण्यांचे तसेच सुधारित वाणांचे
आकर्षक पद्धतीने सादरीकरण करण्यात आले. विविध अन्नधान्य पिके, कडधान्ये, तेलबिया, भाजीपाला
पिके, फळपिके तसेच हवामान बदलाशी सुसंगत असलेल्या स्थानिक
वाणांची माहिती फलक, नमुने आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या
माध्यमातून मांडण्यात आली.
विद्यापीठाच्या
विविध संशोधन केंद्रे, कृषी विज्ञान केंद्रे
आणि विभागांनी स्वतंत्र स्टॉल उभारून नैसर्गिक व सेंद्रिय शेतीतील तंत्रज्ञान,
हवामान बदलास अनुकूल शेती पद्धती, पीक
व्यवस्थापन, बियाणे संवर्धन, जैविक कीड
व रोग व्यवस्थापन, मृदा आरोग्य सुधारणा तसेच स्थानिक वाणांवर
आधारित शाश्वत शेतीचे विविध पैलू शेतकऱ्यांसमोर मांडले. या स्टॉलमध्ये
माहितीपत्रके, पोस्टर्स, नमुने आणि
प्रत्यक्ष मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
तसेच विविध स्वयंसेवी संस्था (NGOs), शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच प्रगत व नाविन्यपूर्ण कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांनी उभारलेले स्टॉल मान्यवर पाहुणे, शेतकरी आणि उपस्थित अभ्यागतांसाठी विशेष आकर्षण ठरले. स्थानिक बियाणे संवर्धन, पारंपरिक शेती पद्धती, मूल्यवर्धित उत्पादने तसेच नैसर्गिक शेतीतील यशस्वी प्रयोग याबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली. प्रदर्शनास भेट देणाऱ्या मान्यवरांनी स्टॉलना भेट देऊन माहिती जाणून घेतली तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
.jpeg)

.jpeg)

.jpeg)
.jpeg)


.jpeg)