भारताच्या संविधानाचे जनक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन
संपूर्ण मानवजातीसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. विद्यार्थ्यांनी महापुरुषांचे विचार
आत्मसात करून आपले जीवन अधिक समृद्ध करावे. पंचशीलाच्या आचरणातून चांगले वर्तन
विकसित होते आणि त्यामुळे समाजात सन्माननीय ओळख निर्माण होते. राष्ट्राची प्रगती
ही समाजातील प्रत्येक घटकाच्या प्रगतीवर अवलंबून असते, त्यांच्या संघर्षमय
प्रवासातून आणि ज्ञानार्जनाच्या तीव्र जिद्दीमधून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी.
त्यांची जयंती केवळ उत्सव म्हणून न साजरी करता, ती अध्ययनाचा
दिवस म्हणून साजरी करावी, असे प्रतिपादन वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले.
भारताचे थोर समाजसुधारक महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या
वतीने विद्यापीठ ग्रंथालयात दि. ११ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ६ ते रात्री १२
वाजेपर्यंत सलग १८ तास अभ्यास उपक्रम आयोजित करण्यात आला. या उपक्रमाच्या
उद्घाटनप्रसंगी माननीय कुलगुरू बोलत होते.
पुढे त्यांनी शिक्षणाचे
महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब
आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी मानवकल्याणासाठी शिक्षणाला सर्वोच्च स्थान दिले.
शिक्षणामुळे व्यक्ती शीलवान बनते. तसेच गौतम बुद्ध यांनी दिलेल्या पंचशील
तत्त्वांचे पालन केल्यास व्यक्ती, समाज आणि राष्ट्र यांचा
सर्वांगीण विकास होऊ शकतो. गौतम बुद्ध यांच्या तत्त्वांचे पालन जपान, थायलंड येथे प्रभावीपणे केले जाते, त्यामुळे हे देश
प्रगतीपथावर आहेत; आपणही या तत्त्वांचे पालन करावे असे आवाहन
त्यांनी केले.
या कार्यक्रमास विद्यापीठाचे
शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य,
विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम तसेच विविध विभागांचे
प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नियोजन विभागप्रमुख डॉ. रावसाहेब भाग्यवंत, डॉ. हिराकांत काळपांडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. संतोष कदम यांनी मानले. या उपक्रमात ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
.jpeg)


.jpeg)
.jpeg)
