माजी विद्यार्थ्यांच्या योगदानातून विद्यापीठाचा विकास; देशात प्रथम स्थानासाठी सक्रिय सहभागाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे आवाहन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी
महाविद्यालय,
परभणी येथे माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा दिनांक ११ एप्रिल
२०२६ रोजी कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे
अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि
यांनी भूषविले. व्यासपीठावर माजी विद्यार्थी माननीय श्री. बालाजी पाटील खतगावकर,
श्री. रवींद्र चव्हाण, श्री. सुनील चव्हाण, श्री. अशोक शिनगारे श्री. अंकुश चव्हाण,
श्री रामभाऊ घाडगे, श्री मिलिंद सावंत, श्री किसनराव जावळे, श्री केशव वाबळे डॉ.
पुरुषोत्तम झंवर तसेच विद्यापीठाचे शिक्षण संचालक तथा विद्यार्थी संघटनेचे
उपाध्यक्ष डॉ भगवान आसेवार, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, कृषी
महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव
डॉ. रणजित चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते
माजी विद्यार्थी
संघटनेच्या वतीने दरवर्षी पाच माजी विद्यार्थ्यांचा त्यांच्या उल्लेखनीय
कार्याबद्दल सत्कार करण्यात येणार असल्याने यावर्षी माननीय उपमुख्यमंत्र्यांचे
खाजगी सचिव माननीय श्री. बालाजी पाटील खतगावकर तसेच माननीय खासदार श्री. रवींद्र
चव्हाण यांचा त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच, विद्यापीठ
परिसरात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या
पुढाकारातून माजी विद्यार्थी संघटनेच्या भव्य कार्यालयाचे उद्घाटन यावेळी करण्यात
आले.
अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, माजी
विद्यार्थी संघटनेचा स्नेहमेळावा आयोजित
करण्याचे स्वप्न आज पूर्ण झाल्याबद्दल त्यांना विशेष आनंद होत आहे. नवी दिल्ली येथील
भारतीय कृषी अनुसंधान संस्था आणि परभणीचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ या
देशातील अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपाला आल्या असून, याचे
प्रमुख श्रेय या संस्थांतील माजी विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागाला जाते.
संस्थेच्या विकासासाठी माजी विद्यार्थ्यांचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे त्यांनी
अधोरेखित केले. विद्यापीठ ही आपली दुसरी आई असल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे,
असे सांगून त्यांनी तामिळनाडू कृषी विद्यापीठ येथे माजी विद्यार्थी
संघटनेच्या वतीने उभारण्यात आलेल्या भव्य वसतिगृहाचे उदाहरण दिले. शेतीविषयक
समस्या कृषीचा विद्यार्थीच अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो, आणि या विद्यापीठाचे विद्यार्थी महाराष्ट्रभर प्रशासकीय सेवांमधून शेतकऱ्यांच्या
समस्या जाणून त्यांचे निराकरण करत आहेत, असेही त्यांनी नमूद
केले.
कृषी विद्यापीठांचे
देशाच्या अन्नसुरक्षेत मोठे योगदान असून, एकेकाळी ४० कोटी लोकसंख्येला
अन्नटंचाईचा सामना करावा लागत होता; आज १४० कोटींपेक्षा अधिक
लोकसंख्येला पुरेसे अन्नधान्य उपलब्ध करून देत भारत निर्यातही करत आहे. याचे श्रेय
देशातील ७४ कृषी विद्यापीठे आणि भारतीय कृषी अनुसंधान परिषद यांच्या ११३ संशोधन
संस्थांना जाते.
महाराष्ट्रात कृषी
विद्यापीठांच्या कार्यासाठी विशिष्ट रचना असून ‘महाविस्तार एआय’ अॅपच्या
माध्यमातून राज्यातील शेती देशाला दिशा देत आहे, असे त्यांनी
सांगितले. मागील दोन वर्षांत विद्यापीठाने चार नवीन महाविद्यालये सुरू केली असून
विविध प्रकल्प प्राप्त झाले आहेत. यासाठी केंद्र व महाराष्ट्र शासनाने मोठी मदत
केल्याबद्दल त्यांनी आभार मानले.
विद्यापीठाने ‘अ’
दर्जा प्राप्त करत पायाभूत सुविधांच्या विकासासह शैक्षणिक, संशोधन
व विस्तार कार्यावर भर दिला आहे. विद्यापीठाची नऊ संशोधन केंद्रे देशात प्रथम
क्रमांकावर कार्यरत असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
शेवटी, विद्यापीठाची
प्रतिमा उंचावण्यासाठी आणि देशात प्रथम स्थान मिळवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांचे
योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगून त्यांनी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवावा,
असे आवाहन केले. तसेच विद्यापीठात मनुष्यबळाची कमतरता असल्याने भरती
प्रक्रिया राबविण्याबरोबरच माजी विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून
देण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी नमूद केले.
श्री बालाजी पाटील खतगावकर यांनी सांगितले की, पूर्वी विद्यापीठात विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात तंटे होत असत; मात्र सध्या परिस्थिती सकारात्मक बदललेली असून, ग्रंथालयात जागा मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा होत असल्याचे ऐकून त्यांनी आनंद व्यक्त केला.
आपले अनुभव सांगताना
त्यांनी नमूद केले की,
महाविद्यालयातील प्राध्यापक वर्गाकडून विद्यार्थ्यांनी केवळ कृषी
क्षेत्रातच करिअर करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत असे आणि
स्पर्धा परीक्षांकडे काही प्रमाणात विरोधही होता. परंतु घरची आर्थिक परिस्थिती
साधारण असल्यामुळे लवकरात लवकर नोकरी मिळविण्याच्या उद्देशाने त्यांनी स्पर्धा
परीक्षांमध्ये सहभागी होत यश संपादन केले.
सध्या जल व मृदा
व्यवस्थापनाशी संबंधित विविध समस्या निर्माण झालेल्या असून, त्या
सोडविण्याचे कार्य करण्याचे भाग्य लाभल्याचे त्यांनी सांगितले. कृषी क्षेत्रातील
विद्यार्थी ‘ॲग्रीकॉस’ (Agricoss) या
संकल्पनेतून प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर राहत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
विद्यापीठामुळे अनेक मोठ्या संधी प्राप्त झाल्या असल्याचे सांगत, माननीय कुलगुरूंच्या मार्गदर्शनाखाली आज माजी विद्यार्थी मेळाव्याचे रोपटे
लावले असून, ते भविष्यात वटवृक्षात रूपांतरित व्हावे यासाठी
सर्व माजी विद्यार्थ्यांनी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी
केले. तसेच, माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि
यांच्या कार्याचे त्यांनी कौतुक करून, विद्यापीठातील गुरुजनांच्या
मार्गदर्शनामुळे स्वतःचे जीवन योग्य दिशेने घडवता आले, असे
सांगितले. “गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु” या प्रार्थनेच्या माध्यमातून त्यांनी
गुरुजनांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी त्यांनी जिल्हानिहाय विद्यार्थ्यांची
नोंदणी करण्याचे आवाहनही केले. सध्याच्या घडीला जमीन कमी होत चाललेली आहे, प्रदूषण वाढत आहे आणि जीवनशैलीत मोठे बदल होत आहेत; या
पार्श्वभूमीवर माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून समाजोपयोगी कार्य घडावे,
अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
श्री रवींद्र चव्हाण
यांनी मनोगत व्यक्त करताना नमूद केले की, त्या विद्यापीठाने आपल्याला
ओळख दिली असून, त्याच विद्यापीठात सत्कार-सन्मान झाल्याबद्दल
त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. तसेच, मतदारसंघातील सर्व
कार्यक्रम सुरू असतानाही या ठिकाणची ओढ लागल्याने आपण येथे सहभागी झालो, असे त्यांनी सांगितले. “आम्ही या विद्यापीठाचे
प्रॉडक्ट आहोत,” असे सांगत त्यांनी महाविद्यालयाच्या
सभागृहात प्रथम प्रवेश केल्यापासून ते आज व्यासपीठावरून भाषण करतानाच्या सर्व
आठवणींना उजाळा दिला. “रक्ताच्या नात्यापलीकडचे नाते म्हणजे ॲग्रीकॉस,” असेही त्यांनी नमूद केले. निवडणूक जिंकण्यात ॲग्रीकॉस मित्रपरिवाराचे मोठे
सहकार्य लाभल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. कृषी विद्यापीठाच्या सक्षमीकरणासाठी
आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. याबरोबरच, जिल्हास्तरावर
१० ते १५ विद्यार्थ्यांचा प्लेसमेंट सेल तयार करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून
द्याव्यात, असे त्यांनी सुचवले. तसेच, महाविद्यालयाच्या
वसतिगृहाच्या नूतनीकरणासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे
आवाहन करत त्यांनी स्वतःकडून एक लाख रुपयांच्या निधीचे योगदान जाहीर केले. पुढील
स्नेहमेळावा वसतिगृहासमोरच आयोजित करण्यात यावा, अशी
अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
श्री सुनील चव्हाण यांनी नमूद केले की, होस्टेल हे संस्कार करण्याचे स्थान असून त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. होस्टेलमध्ये विचारांची देवाण-घेवाण होते आणि जीवन जगण्याची कला अवगत होते. त्यामुळे महाविद्यालयीन शिक्षणासाठी होस्टेलमधील जीवन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी आपण ज्या खोल्यांमध्ये राहिलो त्या खोल्यांचे नूतनीकरण करून त्यांना अद्ययावत करावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच कृषी शिक्षण अधिक दर्जेदार व्हावे यासाठी माजी विद्यार्थी संघटनेने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. “मी या विद्यापीठातून घडलेलो असून, त्यासाठी काहीतरी परत देण्याची माझी भावना आहे,” असे त्यांनी सांगितले. विद्यापीठाने आयोजित केलेला आजचा स्नेह मेळावा हा नात्यांना उजाळा देणारा कार्यक्रम असल्याचे त्यांनी नमूद केले. प्राध्यापकांचा गुणगौरव करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करावी, असेही त्यांनी सांगितले. महाविद्यालयीन जीवनातील विविध प्रसंगांमधून जीवन जगण्याची कला शिकल्याचे त्यांनी नमूद केले. यासोबतच त्यांनी विद्यापीठाने विक्री व्यवस्थापन, हवामानाचा अचूक अंदाज आणि शेतकऱ्यांसाठी यांत्रिकीकरणावरील तंत्रज्ञान विकास यावर भर द्यावा, असे आवाहन केले. कृषी शिक्षण हे सर्व गुणांनी संपन्न आणि सर्वोच्च असल्याचे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील सुविधांचा पुरेपूर लाभ घ्यावा, असेही आवाहन केले.
श्री आनंद चोंदे यांनी सांगितले की, माजी विद्यार्थ्यांची सहकारी संस्था स्थापन करून दीड कोटी रुपयांचा निधी उभारण्यात यश मिळाले आहे. तसेच विद्यापीठातील दगडी वसतिगृहाला ‘हेरिटेज’ स्वरूप देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी सांगितले. यामुळे संपूर्ण देशाला या विद्यापीठातून दिशा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कृषी विभागाची शासकीय स्तरावरील कामे पदवीधर विद्यार्थ्यांना देण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी आवाहन केले.
श्री वामन कदम यांनी महाविद्यालयीन जीवनातील अनुभव सांगितले. यावेळी त्यांनी श्री उमाकांत दांगट यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या मार्गदर्शनाचा विशेष उल्लेख केला. तसेच माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या कार्यकाळात ‘इंद्रधनुष्य’ इमारतीसह पायाभूत सुविधांमध्ये झालेल्या विकासाचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.
डॉ. पुरुषोत्तम झंवर यांनी सांगितले की, या कार्यक्रमासाठी माननीय माजी कुलगुरू डॉ. वेदप्रकाश पाटील तसेच माजी महासंचालक श्री भागडे यांनी शुभेच्छा व संदेश पाठविले आहेत.
श्री मिलिंद सावंत यांनी विद्यापीठाने माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याची सुरुवात केल्याबद्दल आभार मानून अभिनंदन केले. “एग्रीकॉस”ची ताकद यामुळे दिसून येते आणि परस्पर सहकार्य वाढते, असे त्यांनी सांगितले. कृषी शिक्षण घेणारे विद्यार्थी बहुधा सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने त्यांना सहकार्याची गरज असते, आणि ती या संघटनेद्वारे पूर्ण होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले. तसेच विद्यापीठानेही माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुख-दुःखात सहभागी व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
श्री रवी
पतंगे यांनी विद्यापीठाने मागील काही वर्षांत केलेल्या प्रगतीचे कौतुक केले. तसेच
विद्यापीठ कार्यकारी परिषदेवर नियुक्तीसाठी कृषी पदवीधरांचाच विचार करावा आणि
त्यासाठी संघटनेच्या वतीने ठराव करून शासनस्तरावर मंजुरी घ्यावी, असे प्रतिपादन केले.
डॉ. भगवान आसेवार यांनी माजी विद्यार्थी संघटनेची पार्श्वभूमी व स्वरूप स्पष्ट केले. विद्यापीठाने महाराष्ट्रात ६४ हून अधिक आयएएस, आयपीएस तसेच उच्चपदस्थ अधिकारी घडवले असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विद्यापीठातील सध्याच्या शैक्षणिक, संशोधन व विस्तार कार्याचा आढावाही त्यांनी मांडला.
प्रास्ताविक
कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांनी केले. माजी
विद्यार्थी श्री कणके, डॉ. वडनेरकर तसेच
श्री ओम सिसोदिया यांनीही आपले मनोगत व्यक्त करून माजी विद्यार्थ्यांचा वारसा जपत
नवीन पिढीने आपले जीवन घडवावे, असे आवाहन केले.
सूत्रसंचालन माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव डॉ. रणजीत चव्हाण यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. पुरुषोत्तम झंवर यांनी केले. या स्नेह मेळाव्याचा उद्देश माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणणे, त्यांच्या अनुभवांचे आदानप्रदान करणे तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हा होता. या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी, शिक्षक आणि सध्याचे विद्यार्थी असे एकूण ३५० हून अधिक जणांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
.jpeg)
.jpeg)
.jpeg)

.jpeg)



.jpeg)
.jpeg)

.jpeg)

.jpeg)