Saturday, July 11, 2026

वनामकृविच्या कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात ‘सर्प जनजागृती कार्यक्रम’ उत्साहात संपन्न

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागातर्फे तसेच ॲनिमल वेलफेअर चॅरिटेबल ट्रस्ट, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने  दिनांक १० जुलै २०२६ सर्प जनजागृती कार्यक्रम’ उत्साहात आयोजित करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रसिद्ध सर्पमित्र इंजी. वेदांत माळवटकर (परभणी) यांनी विद्यार्थ्यांना सर्पांविषयी वैज्ञानिक व उपयुक्त माहिती दिली.

अध्यक्षीय भाषणात डॉ. राहुल रामटेके यांनी पर्यावरण संवर्धनासाठी जैवविविधतेचे संरक्षण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी निसर्ग व वन्यजीव संरक्षणाबाबत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून समाजात जनजागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजना ही विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जबाबदारी, पर्यावरण संवर्धनाची जाणीव आणि नेतृत्वगुण विकसित करणारे प्रभावी व्यासपीठ असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मार्गदर्शन करताना इंजी. श्री. वेदांत माळवटकर यांनी विषारी व बिनविषारी सापांची ओळख, सर्पांचे पर्यावरणीय महत्त्व, साप आढळल्यास घ्यावयाची योग्य काळजी, सर्पदंश झाल्यास करावयाचे प्रथमोपचार तसेच करावयाच्या व टाळावयाच्या बाबी याविषयी सविस्तर माहिती दिली. साप हे निसर्गाच्या अन्नसाखळीतील महत्त्वाचे घटक असून त्यांचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सापांना इजा न करता किंवा न मारता प्रशिक्षित सर्पमित्रांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.

प्रास्ताविकात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. सुभाष विखे यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना सर्पांविषयी समाजात प्रचलित असलेल्या अंधश्रद्धा व गैरसमज दूर करण्यासाठी अशा जनजागृती कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगितले.

कार्यक्रमास महाविद्यालयातील डॉ. सुमंत जाधव, डॉ. गोपाल शिंदे, डॉ. अनिलकुमार कांबळे, डॉ. प्रविण घाडगे, डॉ. रविंद्र शिंदे, प्रा. दत्तात्रय पाटील, डॉ. विशाल इंगळे, डॉ. गजानन वसू, डॉ. अश्विनी गावंडे, डॉ. अनिकेत वाईकर तसेच सर्पमित्र श्री. अमोल माने, श्री. अक्षय चोपडे, श्री. शिवप्रसाद देशमुख व श्री. नितीन जवंजाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महाविद्यालयातील अधिकारी, कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

सूत्रसंचालन श्रद्धा पवार यांनी केले, तर आभार रोहिणी रासवे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. राजाराम वाघ, श्री. प्रमोद राठोड तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक मुदिता इंगळे, अंकिता वाघ, यश जाधव आणि आदित्य चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले.