Thursday, July 9, 2026

वनामकृविच्या ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत’ उपक्रमांतर्गत मराठवाड्यातील शेतकऱ्यांना खरीप पीक नियोजन व आधुनिक शेतीचे मार्गदर्शन

मागील तीन वर्षांपासून माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून राबविण्यात येणारा हा उपक्रम मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी नियमितपणे राबविला जातो.


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील तीन वर्षांपासून राबविण्यात येणारा माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत’ हा उपक्रम मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी नियमितपणे आयोजित केला जातो. त्यानुसार दिनांक ८ जुलै २०२६ रोजी हा उपक्रम विविध गावांमध्ये यशस्वीरीत्या राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत विद्यापीठाच्या १४ चमूंमधील ३१ शास्त्रज्ञांनी प्रक्षेत्र भेटी, चर्चासत्रे, कृती प्रात्यक्षिके आणि शेतकरी मेळाव्यांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला. या शास्त्रज्ञांनी सुमारे २५० हून अधिक शेतकऱ्यांशी संपर्क साधून त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

यामध्ये प्रामुख्याने खरीप पिकांच्या सद्यस्थितीतील व्यवस्थापनासह उत्पादन खर्चात बचत करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच नैसर्गिक व सेंद्रिय शेती, कीड व रोग व्यवस्थापन, पिकसंरक्षण, मृदा आरोग्य संवर्धन, सुधारित वाणांचा वापर, बीजप्रक्रिया, सघन कापूस लागवड तंत्रज्ञान, सोयाबीन व कापूस पिकांतील तण व्यवस्थापन, सेंद्रिय भाजीपाला लागवड तंत्रज्ञान, सोयाबीन लागवड तंत्रज्ञान, हेक्टरी शिफारशीत बियाण्याचे प्रमाण, खतांचे योग्य ग्रेड, खतांची शिफारशीत मात्रा व वापरण्याची योग्य पद्धत तसेच पशुधन व फळबाग व्यवस्थापन या विषयांवर सविस्तर माहिती देण्यात आली.

या उपक्रमांतर्गत गंगाखेड (जि. परभणी) येथे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या प्रमुख उपस्थितीत माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत’ हा कार्यक्रम शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ऑनलाइन माध्यमातून मार्गदर्शन करताना संभाव्य एल निनो परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचे योग्य नियोजन करण्याचे आवाहन केले. आंतरपीक पद्धतीचा अवलंब करून उत्पादनातील जोखीम कमी करावी तसेच शेतीतील उत्पादन खर्च कमी करण्यासाठी निविष्ठांचा संतुलित वापर करावा, असे त्यांनी सांगितले. विद्यापीठाने विकसित केलेल्या सुधारित वाणांचा व शिफारशीत तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास प्रतिकूल हवामानातही अधिक उत्पादन घेणे शक्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शेतकऱ्यांनी विद्यापीठातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन नियमितपणे घेऊन वैज्ञानिक शेतीचा अवलंब करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी सांगितले की, विद्यापीठाने विकसित केलेल्या विविध कृषि तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास शेतकऱ्यांना निश्चितच उत्पादनवाढ साधता येईल. तसेच विद्यापीठामार्फत दर मंगळवार व शुक्रवार आयोजित करण्यात येणाऱ्या ऑनलाइन मार्गदर्शन कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन शेतीविषयक समस्यांचे तज्ज्ञांकडून निराकरण करून घ्यावे, असे त्यांनी आवाहन केले.

मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी विद्यापीठाच्या विविध समाजमाध्यमांद्वारे उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या कृषि माहितीची तसेच विद्यापीठामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या खरीप, रब्बी व महिला शेतकरी मेळाव्यांची माहिती उपस्थितांना दिली. या माध्यमांचा लाभ घेऊन अद्ययावत कृषि तंत्रज्ञान आत्मसात करावे, असे त्यांनी सांगितले.

विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. गजानन गडदे यांनी यावर्षीच्या संभाव्य प्रतिकूल हवामानाच्या पार्श्वभूमीवर रासायनिक खतांचा वापर सुमारे २५ टक्क्यांनी कमी करून जैविक निविष्ठा, जैविक खते आणि जैविक बुरशीनाशकांचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले. यामुळे जमिनीचे आरोग्य सुधारण्याबरोबरच उत्पादन खर्चातही बचत होईल, असे त्यांनी नमूद केले.

उद्यानविद्या तज्ज्ञ डॉ. बसलिंगप्पा कलालबंडी यांनी एल निनोच्या पार्श्वभूमीवर फळबागांचे योग्य व्यवस्थापन, पाणी नियोजन, अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच फळबाग संरक्षणाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

रोगशास्त्रज्ञ डॉ. आनंद दौंडे यांनी बीजप्रक्रियेचे महत्त्व विशद करताना जैविक बुरशीनाशकांचा तसेच विद्यापीठाने विकसित केलेल्या बायोमिक्सचा प्रभावी वापर कसा करावा, याविषयी माहिती दिली. तसेच खरीप हंगामात संभाव्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देऊन शेतकरी व शेतकरी भगिनींनी विचारलेल्या विविध प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दिली.

या उपक्रमात परभणी येथील विस्तार शिक्षण संचालनालय, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, लातूर येथील कृषि महाविद्यालय, नांदेड येथील कापूस संशोधन केंद्र, विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्रे (छत्रपती संभाजीनगर, अंबाजोगाई, लातूर व परभणी), कृषि विज्ञान केंद्रे (छत्रपती संभाजीनगर, खामगाव व बदनापूर) तसेच अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, परभणी या संलग्न कार्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. सूर्यकांत पवार, डॉ आनंद गोरे, डॉ. गजानन गडदे, प्रा. अरुण गुट्टे, डॉ. वसंत सूर्यवंशी, डॉ. विजयकुमार चिंचाणे, डॉ. अरविंद पांडागळे, डॉ. बसलिंगप्पा कलालबंडी, डॉ. आनंद दौंडे, डॉ. दिप्ती पाटगावकर, डॉ. एस. डी. सोमवंशी, डॉ. बसवराज पिसुरे, डॉ. आर. एल. कदम, डॉ. एफ. आर. तडवी, प्रा. के. एल. जगताप, प्रा. अशोक निर्वळ तसेच बीड जिल्ह्याचे कृषी उपसंचालक श्री जाधवर, बीड जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी सोबतच कृषी विज्ञान केंद्र अंबाजोगाईचे शास्त्रज्ञ श्री नरेंद्र जोशी यांनी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले.