भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) वनामकृविच्या दोन रिमोट पायलट प्रशिक्षण संस्थांना (RPTO – Remote Pilot Training Organization) मान्यता प्रदान केली
शेतीचे
आधुनिकीकरण आणि डिजिटल कृषिला गती देण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर
करण्याच्या दिशेने वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने महत्त्वपूर्ण पावले
उचलली आहेत. माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली
विद्यापीठाने या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले असून, शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविणे, उत्पादन खर्च कमी करणे तसेच शेती अधिक सुरक्षित, अचूक
आणि शाश्वत बनविणे हा या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे.
माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठात राष्ट्रीय कृषि
उच्च शिक्षण प्रकल्प (NAHEP) अंतर्गत डिजिटल
शेती, ड्रोन, रोबोटिक्स आणि स्वयंचलित कृषि
यंत्रांवरील संशोधनाला मोठी चालना मिळाली आहे. पीक निरीक्षण, कीड व रोग व्यवस्थापन, खत आणि कीटकनाशकांची अचूक
फवारणी, मृदा विश्लेषण, बियाणे पेरणी
तसेच पीक आरोग्य मूल्यांकन अशा विविध क्षेत्रांमध्ये ड्रोन तंत्रज्ञानाचा प्रभावी
वापर विकसित करण्यात येत आहे.
ड्रोन
तंत्रज्ञानामुळे शेतीतील निविष्ठांचा काटेकोर वापर शक्य होत असून खत, पाणी आणि कीटकनाशकांचा अपव्यय लक्षणीयरीत्या
कमी होतो. मोठ्या क्षेत्रावर अल्पावधीत फवारणी करता येत असल्याने वेळ, श्रम आणि खर्चाची बचत होते. तसेच विषारी कीटकनाशकांच्या थेट संपर्कापासून
शेतकरी व शेतमजुरांचे संरक्षण होत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीनेही हे
तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरत आहे.
देशात कृषि
क्षेत्रात ड्रोनच्या वापरासाठी राष्ट्रीय धोरण आणि प्रमाणित कार्यपद्धती (Standard Operating Procedure – SOP) तयार
करण्यातही माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी महत्त्वपूर्ण भूमिका
बजावली आहे. कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयाने विविध उच्चस्तरीय समित्यांच्या
अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती केली. त्यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सोयाबीन,
कापूस, ऊस, गहू, भात, मका, भुईमूग, तूर, करडई आणि तीळ या दहा प्रमुख पिकांसाठी
ड्रोनद्वारे फवारणीची प्रमाणित कार्यपद्धती निश्चित केली. या मार्गदर्शक
सूचनांमध्ये औषधांचे योग्य प्रमाण, ड्रोनची उड्डाण उंची,
उड्डाणाचा वेग, नोजलचा प्रकार, हवामानाची अनुकूल परिस्थिती तसेच पर्यावरण संरक्षणासंबंधी सविस्तर शिफारसी
करण्यात आल्या आहेत.
परभणी कृषि
विद्यापीठाने अमेरिकेतील फ्लोरिडा विद्यापीठ तसेच विविध अग्रगण्य ड्रोन
कंपन्यांसोबत सामंजस्य करार करून संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर बळ दिले आहे.
संशोधनासाठी विद्यापीठाने अत्याधुनिक ड्रोन उपलब्ध करून दिले असून विद्यार्थी व
प्राध्यापकांना अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जपान, स्पेन,
ब्राझील तसेच इतर देशांमध्ये अत्याधुनिक प्रशिक्षणाची संधी उपलब्ध
करून दिली आहे.
माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या पुढाकारातून परभणी येथे भारतातील पहिला
१८० दिवसीय कृषि ड्रोन प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या
अभ्यासक्रमाच्या आतापर्यंतच्या दोन बॅचमधील विद्यार्थ्यांना शंभर टक्के प्लेसमेंट
मिळाले असून सध्या तिसरी बॅच सुरू आहे. तसेच विद्यापीठाने ड्रोन कस्टम हायरिंग
सेंटर सुरू करून शेतकऱ्यांना प्रशिक्षणासह भाडेतत्त्वावर ड्रोन सेवा उपलब्ध करून
दिली आहे.
या सर्व
उपक्रमांमुळे विद्यापीठाने कृषि क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रसारासाठी
आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक
महासंचालनालयाने (DGCA), नवी दिल्ली
यांनी विद्यापीठाच्या दोन रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन (RPTO – Remote
Pilot Training Organization) प्रशिक्षण केंद्रांना मान्यता प्रदान
केली आहे. यापैकी पहिले केंद्र कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात १० ऑक्टोबर २०२५
पासून कार्यरत आहे. तर दुसऱ्या केंद्राला २३ जून २०२६ रोजी मान्यता मिळाली असून ते
विद्यापीठाच्या NAHEP–DFSRDA सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत सुरू
करण्यात येत आहे. या केंद्राला सन २०३६ पर्यंत अधिकृत मान्यता प्रदान करण्यात आली
आहे.
या
मान्यतेमुळे विद्यापीठात अधिकृत ड्रोन पायलट प्रशिक्षण अभ्यासक्रम अधिक व्यापक
स्वरूपात राबविण्याचा मार्ग मोकळा झाला असून शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO), स्वयं-सहाय्यता बचत गट तसेच ग्रामीण
युवकांना आधुनिक कृषि तंत्रज्ञानाशी जोडण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
कृषि
क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा व्यापक प्रसार करून भारतीय शेती अधिक आधुनिक, सुरक्षित आणि स्पर्धात्मक बनविण्याच्या दिशेने
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे नेतृत्व अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत
असल्याचे कृषि क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. संशोधन, प्रशिक्षण,
राष्ट्रीय धोरणनिर्मिती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष
शेतकऱ्यांपर्यंत प्रसार या सर्व स्तरांवर त्यांनी केलेले कार्य भारतीय कृषि
क्षेत्रासाठी एक नवा आदर्श निर्माण करणारे ठरत आहे.
शेतीत ड्रोन वापराबाबत राष्ट्रीय धोरण निश्चित करण्यासाठी
तज्ज्ञ समित्यांची स्थापना
सन २०२० मध्ये
देशातील काही भागांमध्ये टोळधाडीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर कृषि क्षेत्रात ड्रोन
तंत्रज्ञानाच्या वापराची आवश्यकता प्रकर्षाने जाणवू लागली. त्यानंतर माननीय
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आणि माननीय केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या
मार्गदर्शनाखाली कृषि क्षेत्रात ड्रोनच्या वापरासंदर्भातील संशोधनात्मक कार्याला
गती देण्यात आली. कृषि व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या कृषि, सहकार आणि शेतकरी कल्याण विभागामार्फत शेतीत
ड्रोनच्या वापरासाठी राष्ट्रीय धोरण निश्चित करण्यासाठी विविध तज्ज्ञ समित्यांची
स्थापना करण्यात आली. प्रथम डॉ. के. अलगुसुंदरम यांच्या अध्यक्षतेखाली समिती
स्थापन करण्यात आली होती. या समितीचे समन्वयक म्हणून माननीय प्रा. (डॉ.) इन्द्र
मणि यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
त्यानंतर
ड्रोनद्वारे मृदा व पीक अन्नद्रव्यांच्या वापरासाठी प्रमाणित कार्यपद्धती निश्चित
करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र
मणि यांच्या अध्यक्षतेखाली दुसऱ्या समितीची स्थापना करण्यात आली. या समितीचा अहवाल
कृषि मंत्रालयाने स्वीकारला.
यानंतर जुलै
२०२२ मध्ये विविध पिकांवर ड्रोनद्वारे कीटकनाशकांच्या फवारणीसाठी प्रमाणित
कार्यपद्धती (SOP) निश्चित करण्यासाठी
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची
स्थापना करण्यात आली. या समितीने दहा प्रमुख पिकांसाठी ड्रोनद्वारे
फवारणीसंदर्भातील प्रमाणित कार्यपद्धती तयार करून मसुदा अहवाल मंत्रालयाकडे सादर
केला. या मसुदा अहवालाचे २० एप्रिल २०२३ रोजी तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्री माननीय
श्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.
सध्या माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली ड्रोनद्वारे विविध
स्वरूपातील मृदा व पीक अन्नद्रव्यांच्या वापरासाठी सुधारित प्रमाणित कार्यपद्धती
विकसित करण्याचे कार्य सुरू असून, भारतीय कृषि क्षेत्रात ड्रोन तंत्रज्ञानाचा सुरक्षित, वैज्ञानिक आणि प्रभावी वापर सुनिश्चित करण्यासाठी ही समिती सातत्याने
कार्यरत आहे.
पिकनिहाय ड्रोन
व्दारे फवारणीचे कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि
समितीने निश्चित केलेल्या प्रमाणित कार्य पध्दती (एसओपी) मसुदा अहवालाचे तत्कालीन केंद्रीय कृषि मंत्री माननीय श्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या
हस्ते नवी दिल्ली येथे राष्ट्रीय पातळीवर विमोचन
वनामकृवि व गुरूग्राम (हरियाणा) येथील आईओटेक वर्ल्ड एविएशन प्राइवेट लिमिटेड यांच्यात सामजंस्य करार
वनामकृवि आणि
मुंबई येथील मे. ग्राऊंडजिरो एरोस्पेस लिमिटेड यांच्यात सामजंस्य करार
वनामकृवि व वॉव गो ग्रीन कृषि विमान (ड्रोन) हरियाणा यांच्यात सामजंस्य करार
वनामकृवि परभणी
व सेरेब्रोस्पार्क इंनोवेशन्स पुणे यांच्या मध्ये करार
‘रिमोट पायलट
ट्रेनिंग ऑर्गनायझेशन’ (वनामकृवि – आरपीटीओ / VNMKV–RPTO) तर्फे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पहिल्या बॅचच्या
विद्यार्थ्यांना ड्रोन पायलट परवाना प्रमाणपत्रांचे वितरण








.jpeg)

