वाणु, पैसा यालाच इंग्रजीमध्ये मिलीपीड म्हणतात. मिलीपेड कीटक नसून बहुपाद गटातील (डिप्लोपोडा) प्रासंधिपाद प्राणी आहे. जगभरात 12,000 पेक्षा अधिक प्रजाती आहेत. सहसा ओलसर, जंगले (जिथे पाउस जास्त पडतो) दगडाच्या खाली, मातीमध्ये इ. भागात आढळतात (गवत, पाने, कचरा, कंपोष्ट). काही प्रजाती पुरग्रस्त भागात टिकू शकतात व दोन महीन्यापर्यंत पाण्यात बुडतात. वेगवान हालचाल करु शकत नाहीत आणि बहूतेक प्रजाती सडणा-या वनस्पती सामग्रीवर जगतात. मिलीपीडमध्ये विषारी स्टिनर नसतात परंतू त्यापेकी काही शरीरातल्या छिद्रामधून दुर्गंधीयुक्त रसायने तयार करतात ही रसायने अनेक भक्षकांना दुर ठेवण्यास मदत करतात. धोक्याच्या वेळी मिलीपीड मउ असणा-या शरिराच्या खालच्या बाजुचे संरक्षण करताना कडक असलेल्या वलय उघडीस करून त्याच्या शरीरात घट्ट आवर्त वर्तुळ करतात. बहुतेकदा रात्री नैसर्गीक स्थान सोडतात, आणि पायाच्या साह्याने रेंगाळत वर्षाच्या विशिष्ट विशेषत: शरद ऋतू दरम्यान ते मोठया संख्येने स्थलांतर करू शकतात. वसंत आणि ग्रीष्म ऋतु मध्ये जास्त ओल्या किंवा कोरडया हवामानाच्या अनुषंगाने स्थलांतरीत करतात.
खरिप हंगामामध्ये
पैसाचा (वाणु) प्रादुर्भाव अनेक गावांमध्ये विविध पिकावर दिसुन येत आहे. विशेष
करून सोयाबीन, कापूस ई. पिकामध्ये प्रादुर्भाव होत आहे. ही
कीड निशाचर आहे, रात्रीलाच सक्रिय असते. उगवत असलेल्या बिया,
लहान रोपे पूर्ण खाऊन फस्त करतात. यामुळे तूट जास्त प्रमाणात होते,
प्रादुर्भाव जास्त झाल्यास दुबार पेरणी करावी लागते. तसेच पीक मोठे
झाल्यावर पाने खातात. या किडीच्या व्यवस्थापनासाठी सामूहिकरीत्या सतत प्रयत्न करणे
आवश्यक असल्याचे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे डॉ.
पुरुषोत्तम नेहरकर, सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ. अनंत लाड आणि संशोधन सहयोगी डॉ. राजरतन
खंदारे यांनी सांगितले केले आहे.
पैसा (वाणु) ओळख :
मिलीपीड (हजार लेगर्स असे म्हटले जाते) आपल्या भागात Eurymerodesmus
spp. आढळतात. तपकिरी, काळपट रंगाचे असून
प्रत्येक शरिराच्या भागाचे दोन किंवा चार पाय असतात. मिलीपीडजवळ खरोखरच हजार पाय
नसतात. प्रजातीवर अवलंबून त्याचे पाय ४७ ते १९७ जोडयाचे असतात तर सर्वात जास्त ७५० पाय आहेत.
जवळजवळ शरिराचे २५ – १०० भाग (Segments) असतात. शरिराचे डोके
आणि इतर शरिर असे दोन भागात विभाजन होते. प्रौढ मिलीपीडची लांबी ०.५ ते ६.५ इंच
असते. जेव्हा आपण स्पर्श करतो किंवा विश्रांती घेते तेव्हा बहुतेक मिलीपीड कर्लअप
करतात (गोळा होतात) तेव्हा त्यास आपल्या भागात पैसा असे म्हणतात.
जीवनक्रम :
जन्माच्या वेळी मिलीपीडसच्या शरिराचे 6
भाग असतात आणि पायाचे 3 जोडया असतात.
- जेव्हा कात टाकतात त्यावेळी शरीराचे भाग आणि
पाय संख्या वाढतात.
- नर मिलीपीडसला ७ व्या भागाला पाय नसतात त्या
ठिकाणी जननेंद्रिये (Modified
legs) असतात तर मादी जननेंद्रिये मिलीपीडसच्या दुस-या पायाच्या
जोडीजवळ असते.
- या किडीची मादी एका वेळेस १० ते ३०० अंडी
ओलसर जागेवर घालते. वाणु कीड बहुभक्षी तसेच समूहाने आढळणारी कीड आहे.
- अंडयामधून अळी बाहेर पडते तेव्हा पाय नसतात
जेव्हा पहीली अवस्था असते तेव्हा पाय फुटतात अशा प्रकारे प्रत्येक अवस्थे वेळी पाय
फुटतात व शरिराची लांबी कप्याने वाढतात.
- जास्तीत जास्त २ ते १२ इंच पर्यंत वाढ होते
आणि ७ ते १० वर्ष पर्यंत जगतात.
नुकसानीचा प्रकार :
पैसा (वाणु) निशाचर असुन सामान्यतः सडणारी पाने, कुजलेले लाकूड आणि इतर प्रकारच्या ओलसर, किडणा-या
वनस्पती खातात. साधारणपणे त्यांची भुमिका कुजलेल्या झाडाचे विघटन करण्यास मदत
करणारी आहे. रोपावस्थेत पावसाची दीर्घ काळ उघडीप व जमिनीला भेगा पडल्यास किडींचा
प्रादुर्भाव वाढतो किंवा त्यांची संख्या जास्त होते तेव्हा ते जमिनीवर संपर्कात
येणा-या रोपटे, बियाणे जसे कापूस, सोयाबिन
या सारख्या पिकाचे नुकसान करतात. जमिनीलगत रोपे कापून टाकतात कालांतराने रोपावर
जाउन पाने कुरतडतात.
एकात्मिक व्यवस्थापन
कीटकासह समस्या ब-याचदा ओल्या हवामानाशी जुळतात मिलीपीडचा
प्रवेश कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी दिर्घ मुदतीचा उपाय म्हणजे आर्द्रता आणि
लपण्याची ठिकाणे कमी करणे विशेषत: गवत कापने, ओले गवत,
दगड, जमीनीवर ठेवलेल्या वस्तू, बांधावरील गवत इ. काढले पाहीजे.
- ब-याचदा आर्द्र, घनदाट
पिकात जास्त पाणी देणे किंवा संध्याकाळी पिकात पाणी चालू ठेवल्यास मिलीपीडच्या
समस्यास कारणीभुत ठरु शकतात.
- कीड लपण्याच्या जागा जसे की, शेतातील
पालापाचोळा किंवा वाळलेले कुजलेले काही काडीकचरा गोळा करून नष्ट करावे वाणी रात्री
जास्त सक्रिय असल्याने रात्रीच्या वेळी शेतात गवताचे ढीग करून ठेवावेत आणि सकाळी
गवताच्या ढीगाखाली जमा झालेले वाणी जमा करून मिठाच्या किंवा साबणाच्या द्रावणात
टाकावे.
- ज्या शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बियाण्याला
बीजप्रक्रिया केली आहे तिथे या किडीचा प्रादुर्भाव कमी आढळून आलेला आहे.
- मिलीपीडस रात्री जास्त सक्रीय असल्या कारणाने
शेतक-यांनी रात्रीच्या वेळी शेतात गवताचे ढिग करुन ठेवावेत आणि सकाळी गवताच्या
ढिगाखाली जमा झालेले मिलीपीड जमा करून मिठाच्या द्रावणात टाकावे.
- पिकामध्ये वेळेवर कोळपणी करावी त्यामुळे
जमिनीतील अंडी व लपून बसलेल्या वाणी किडी उघड्या पडून नष्ट होतील.
- चांगला पाउस पडल्यास या किडींचे नैसर्गीक
नियंत्रण होते.
- किड संपूर्ण शेतात पसरलेली असल्यास क्लोरोपायरीफॉस २० ईसी ३ मिली किंवा क्लोरोपायरीफॉस ५०% + सायपरमेथ्रीन ५% एसपी १.५ मिली प्रति लीटर या प्रमाणे फवारणी करावी
- ज्या शेतांमध्ये वारंवार या किडीचा
प्रादुर्भाव होत असेल तिथे पेरणीपूर्वी कार्बोसल्फान ६ % दाणेदार किंवा
क्लोरोपायरीफॉस १०% दाणेदार किंवा फिप्रोनील (०.३%) ५ किलो प्रति १०० किलो शेणखतात मिसळून १ हेक्टर शेतात पसरवावे (वरील कीटकनाशके शेतक-यांनी शेतावर वापरले असता त्यांच्या
अनुभवातून परिणामकारक दिसत आहेत, परंतु CIB&RC
लेबल क्लेम नाहीत).
अधिक महितीसाठी संपर्क मोबाईल क्रमांक
डॉ. पुरुषोत्तम नेहरकर – ९८२२९३६९८६ किंवा डॉ. अनंत लाड – ९७३०९४८१२८ / ७५८८०८२०२४


