Thursday, July 2, 2026

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांना भावपूर्ण निरोप

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या डॉ. खिजर बेग यांचा यथोचित सत्कार




वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या संशोधन संचालनालयामार्फत दिनांक २ जुलै २०२६ रोजी संशोधन संचालक पदावर कार्यरत असलेले डॉ. खिजर बेग यांच्या स्वेच्छानिवृत्ती निमित्त भावपूर्ण निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि अध्यक्षस्थानी उपस्थित होते. व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, नियंत्रक श्रीमती भाग्यश्री जाधव, आदी मान्यवरांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम अखिल भारतीय समन्वित पशुधन यांत्रिकीकरण संशोधन प्रकल्प (AICRP on Mechanisation in Animal Husbandry) सभागृहात पार पडला.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते सत्कारमूर्ती डॉ. खिजर बेग यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच विद्यापीठातील सर्व संचालक, कुलसचिव, विद्यापीठ अभियंता, नियंत्रक, सर्व सहयोगी अधिष्ठाता तसेच संशोधन कार्यालयातील प्रभारी अधिकारी यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचा उत्साहपूर्ण सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना माननीय कुलगुरूंनी सांगितले की, डॉ. खिजर बेग यांनी घेतलेली स्वेच्छानिवृत्ती विद्यापीठाच्या हिताच्या दृष्टीने निश्चितच कठीण बाब आहे. मात्र कौटुंबिक गरजांमुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांच्या विद्यापीठ सेवेत केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करताना त्यांनी सांगितले की, राष्ट्रीय पातळीवरील संशोधनाधारित प्रकल्प तयार करताना या विद्यापीठाचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते आणि त्यामध्ये डॉ. खिजर बेग यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण राहिले आहे.

विद्यापीठाने वाण विकास, गुणवत्तापूर्ण रोप निर्मिती तसेच नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केले असून या कार्यामध्ये डॉ. खिजर बेग यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊ नये यासाठी प्रयत्न केल्याचेही कुलगुरूंनी नमूद केले. मात्र त्यांच्या इच्छेनुसार ते पुढील वाटचालीसाठी जात असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, विद्यापीठातून सेवा पूर्ण करून अथवा इतर कारणांनी बाहेर पडताना आपल्या जाण्यामुळे विद्यापीठाच्या कार्यावर कोणताही परिणाम होणार नाही किंवा कामकाज थांबणार नाही, अशी कार्यपद्धती प्रत्येकाने अंगीकारली पाहिजे.

डॉ. खिजर बेग यांच्या स्वभावाचा उल्लेख करताना ते स्वच्छ मनाचे, कर्तव्यदक्ष आणि सर्वांचे आदरणीय व्यक्तिमत्त्व असल्याचे त्यांनी सांगितले. आज सर्वांच्या उपस्थितीत झालेला उत्स्फूर्त सन्मान हेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब असल्याचे त्यांनी नमूद केले. कोणतेही यश हे समर्पित भावनेतून केलेल्या कार्यातूनच सिद्ध होते आणि अशा व्यक्तींची आठवण भविष्यात कायम राहते, असेही ते म्हणाले.

डॉ. खिजर बेग यांनी भविष्यातही विद्यापीठाशी समन्वय ठेवून जोडलेले राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करत कुलगुरूंनी त्यांच्या पुढील यशस्वी कार्यकारकीर्दीसाठी आणि जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. शेवटी त्यांनी विश्वास व्यक्त केला की, व्यक्ती सेवानिवृत्त होतात; मात्र विद्यापीठाची प्रगती कधीही थांबणार नाही.

सत्काराला उत्तर देताना डॉ. खिजर बेग म्हणाले की, याच विद्यापीठातून त्यांनी पदवी, पदव्युत्तर पदवी आणि आचार्य पदवी पूर्ण केली असून विद्यापीठाची एकूण २६ वर्षे सेवा करण्याची संधी मिळाली. या संपूर्ण कार्यकाळात सर्वांचे सहकार्य लाभले. काम करण्याची आवड सुरुवातीपासूनच होती; मात्र मागील चार वर्षांत माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या कार्यकाळात कामाचा वेग वाढला आणि सातत्यपूर्ण काम करण्याची सवय अधिक दृढ झाली.

कौटुंबिक कारणांमुळे विद्यापीठ सेवेतून निवृत्त होत असून पुढे एका चांगल्या ठिकाणी कार्य करण्याची संधी मिळत आहे. या निवडीमध्ये देखील परभणी कृषी विद्यापीठाचे मोठे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यांनी सर्वांना जिद्द, आवड आणि मेहनत या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याचे आवाहन केले.

विद्यापीठात मनुष्यबळ कमी असतानाही माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण, संशोधन, विस्तार कार्य तसेच पायाभूत सुविधा विकासामध्ये मागील चार वर्षांत उच्च दर्जाचे काम झाले आहे. सध्या विद्यापीठात आयोजित होणारे विविध कार्यक्रम अत्यंत दर्जेदार पद्धतीने पार पडतात. तसेच राष्ट्रीय पातळीवर विद्यापीठाच्या दहा संशोधन केंद्रांना प्रथम क्रमांक मिळणे ही अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी ते म्हणाले की, भविष्यात कुठेही कार्यरत असलो तरी विद्यापीठाशी समन्वय ठेवून कार्य करत राहणार असून विद्यापीठ परिवाराकडून मिळालेल्या प्रेमाबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानून कृतज्ञता व्यक्त केली.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी सांगितले की, आज झालेला सन्मान हा डॉ. खिजर बेग यांच्या उत्कृष्ट कार्याची पावती असून त्यांच्या पुढील आयुष्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी सांगितले की, डॉ. खिजर बेग यांनी २६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवाकाळात कापूस आणि सोयाबीन वाण विकासामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या या कार्यामुळे शेतकरी विकासाला मोठी चालना मिळाली आहे.

कुलसचिव श्री. पुराभा काळे यांनी सांगितले कि, डॉ. खिजर बेग हे विद्यापीठाच्या कार्यासाठी अत्यंत महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. कुलसचिव कार्यालयातील विविध निवड प्रक्रियेत त्यांनी निवड समितीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यामुळे त्यांच्या स्वेच्छानिवृत्तीच्या निर्णयाबद्दल खंत वाटत असल्याचे भावना त्यांनी व्यक्त केले.

प्रस्ताविकात उपसंचालक संशोधन डॉ. रणजीत चव्हाण यांनी सांगितले की, माननीय कुलगुरू यांच्या निर्देशानुसार विद्यापीठ सेवेतून निवृत्त होणाऱ्या प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याचा सन्मान विद्यापीठाच्या वतीने करण्यात यावा तसेच माननीय कुलगुरूंच्या स्वाक्षरीने सन्मानपत्र देण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार या उपक्रमास सुरुवात करण्यात आली असून भविष्यात दर महिन्याला अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व सत्कारमूर्तींचा परिचय डॉ. वीणा भालेराव यांनी करून दिला, तर आभार प्रदर्शन उपसंचालक संशोधन डॉ. सुनीता पवार यांनी केले.

यावेळी विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांचे अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ नीता गायकवाड,विभागप्रमुख, संशोधन योजनांचे प्रभारी अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.