Wednesday, July 1, 2026

वनामकृवित स्व. वसंतराव नाईक जयंती उत्साहात; कृषि विकासासाठी आदर्श घेण्याचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे आवाहन

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती दिवस दिनांक १ जुलै रोजी कृषि दिन म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यापीठ परिसरातील स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या स्मारकास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते पुष्पपूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, स्वर्गीय वसंतराव नाईक हे देशाला आणि महाराष्ट्राला लाभलेले अनमोल रत्न होते. अत्यंत कठीण काळात त्यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळली आणि सलग ११ वर्षे राज्याचा यशस्वी कारभार पाहिला. मुख्यमंत्री होण्यापूर्वी देशात लोकसंख्या कमी असतानाही अन्नधान्याची मोठी टंचाई होती. मात्र त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली हरितक्रांतीची सुरुवात झाली आणि ती यशस्वीपणे राबविण्यात आली.

त्यामुळे आज देशाची लोकसंख्या १४० कोटींपेक्षा अधिक असूनही भारत सुमारे ३७६ दशलक्ष टन अन्नधान्य उत्पादन करत आहे. एवढेच नव्हे तर देशातील सुमारे ८० कोटी लोकांना मोफत अन्नधान्य पुरवठा करून भारत अन्नधान्याच्या बाबतीत आत्मनिर्भर झाला असून अनेक देशांना अन्नधान्याची निर्यातही करत आहे. गेल्या वर्षी भारताचे माननीय पंतप्रधान यांनीदेखील भारत संपूर्ण जगाला अन्नधान्य पुरवठा करू शकतो, असे नमूद केले होते. हे यश हरितक्रांतीमुळेच शक्य झाले आहे.

स्वातंत्र्यानंतरच्या सुरुवातीच्या काळात जागतिक पातळीवर भारतामध्ये आर्थिक गुंतवणूक करणे फायदेशीर ठरणार नाही, अशी चर्चा होत होती. मात्र अशा कठीण परिस्थितीत स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी हे आव्हान समर्थपणे पेलत हरितक्रांतीच्या माध्यमातून देशाच्या शेती विकासाला नवी दिशा दिली.

ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य देशाच्या कृषि विकासामध्ये दिशादर्शक कार्य करत आहे. यावेळी त्यांनी माजी केंद्रीय कृषिमंत्री मा. श्री शरदचंद्र पवार यांच्या कृषि विकासातील योगदानाचाही विशेष उल्लेख केला. भारतीय शेती महाराष्ट्रातील कृषि क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात ज्ञान आत्मसात करत आहे. त्यामुळे आपण महाराष्ट्राचे नागरिक म्हणून या महान व्यक्तिमत्त्वांचा आदर्श घेऊन शेती विकासासाठी चांगले कार्य केले पाहिजे. याबरोबरच विद्यापीठही सातत्याने प्रगती करत असून या यशामध्ये सर्वांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. नीता गायकवाड, सहाय्यक नियंत्रक श्री. अनंत कदम तसेच विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख, अधिकारी, कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना आणि रावे उपक्रमातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या निमित्ताने कृषि महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. वृक्षारोपणासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. धीरज पाथ्रीकर आणि डॉ. फरिया खान यांनी विशेष परिश्रम घेतले.