सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या वतीने साजरा करण्यात येत
असलेल्या स्वच्छता पंधरवडा-२०२६ निमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी
विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर येथील फळ संशोधन केंद्र (हिमायतबाग) आणि क्षेत्रीय
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ८ जुलै
२०२६ रोजी हिमायतबाग येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न
झाला.
पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि हरित परिसर निर्मितीचा संदेश देणाऱ्या या उपक्रमांतर्गत
हिमायतबाग प्रक्षेत्रावर जांभूळ, आंबा, कांचन, करंज, नारळ आदी विविध
वृक्षप्रजातींची लागवड करण्यात आली. लावण्यात आलेल्या रोपांचे दीर्घकालीन संरक्षण
आणि संगोपन सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक रोपाभोवती संरक्षक जाळ्यांची उभारणी
करण्यात आली.
यावेळी फळ संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. संजय पाटील, क्षेत्रीय
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाचे संचालक श्री. जयप्रकाश होनराव, उद्यानविद्यावेत्ता डॉ. रवींद्र नाईनवाड, वरिष्ठ
सांख्यिकी अधिकारी श्री. मुकेश बाबू व श्री. राजेश कुमार, कृषी
अधिकारी गिरीश सोनवणे व ओंकार पाटील, वरिष्ठ लिपिक संगीता निकम
व शेख हाजी, तसेच कृषी सहायक अनिल बखळे व मन्मथ तोडकर यांच्यासह
अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणाची शपथ घेत स्वच्छ, हरित आणि प्रदूषणमुक्त
परिसराच्या निर्मितीसाठी वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनाची सामूहिक जबाबदारी पार
पाडण्याचा निर्धार व्यक्त केला. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने
किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करणे ही काळाची गरज असल्याचा संदेश यावेळी
देण्यात आला.
