वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या कृषि महाविद्यालय, गोळेगाव येथे दि. २
जुलै २०२६ रोजी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि तसेच भारतीय कृषि अनुसंधान
परिषद (ICAR), नवी दिल्ली येथील मृदा व जल व्यवस्थापन
विभागाचे सहाय्यक महासंचालक डॉ. वेल्मुरुगन यांनी महाविद्यालयास भेट दिली. यावेळी
विद्यापीठ अभियंता श्री दीपक काशाळकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ.
शिवाजीराव शिंदे, एकात्मिक शेती पद्धती संशोधन प्रकल्पाचे
प्रभारी अधिकारी डॉ. किरण जाधव तसेच प्रशिक्षण तज्ज्ञ तथा प्रमुख प्रशिक्षक श्री
राजीव पंडित उपस्थित होते.
अनुसूचित जाती व
अनुसूचित जमाती उपयोजना (SC-SP)
अंतर्गत कृषि क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial
Intelligence – AI) या विषयावरील दोन दिवसीय ऑफलाइन प्रशिक्षण
कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते
करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्यक महासंचालक डॉ.
वेल्मुरुगन उपस्थित होते. हे प्रशिक्षण शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या
मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे.
यावेळी मार्गदर्शन
करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, माहिती
तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता हे आजच्या काळातील परवलीचे शब्द बनले असून
दैनंदिन जीवनात त्यांना अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे. कृषि क्षेत्रातही या
तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असून कृषि पदवीधरांनी या ज्ञानाचा
अंगीकार करून महाविद्यालयीन जीवनात कौशल्य विकासावर विशेष भर द्यावा. ग्रामीण भागातील
विद्यार्थी कोणत्याही क्षेत्रात मागे राहू नयेत, यासाठीच कृषि
महाविद्यालयाने हे उपयुक्त प्रशिक्षण आयोजित केले असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ
घेऊन आपले भविष्य उज्ज्वल करावे.
महाविद्यालयातील
इंटरनेट व इन्व्हर्टर सुविधायुक्त संगणक प्रयोगशाळा तसेच अर्थशास्त्र विभागातील
प्रयोगशाळेचा विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा शिकविण्यासाठी प्रभावीपणे उपयोग
व्हावा. विद्यार्थ्यांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न
करावेत. कृत्रिम बुद्धिमत्ता विषयावरील हे प्रशिक्षण भविष्यात सातत्याने सुरू
ठेवावे. तसेच विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्त्व विकासावर भर देऊन उद्योजक बनावे आणि
नोकरी मागणारे नव्हे,
तर नोकरी देणारे बनण्याचा प्रयत्न करावा, असे
आवाहन त्यांनी केले.
प्रमुख पाहुणे नवी
दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेचे सहाय्यक महासंचालक डॉ. वेल्मुरुगन यांनी आजच्या
डिजिटल युगात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वतःचा विकास कसा करावा आणि
आव्हानांना कसे सामोरे जावे यावर प्रभावी मार्गदर्शन केले. मोबाईल आणि सोशल मीडिया
हे विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित करणारे मोठे माध्यम बनले असून महाविद्यालयीन जीवन
हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सुवर्णकाळ आहे. या काळात विद्यार्थ्यांनी आपल्या
आवडीच्या क्षेत्रातील नवनवीन कौशल्ये विकसित केली पाहिजेत. ही कौशल्ये भविष्यात
स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी आणि ध्येय साध्य करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
व्यक्तिमत्त्व
विकासात संवादाचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, प्रत्येकाने
आपल्या अवतीभोवतीच्या लोकांशी, प्राध्यापकांशी आणि
सहकाऱ्यांशी उत्तम संवाद साधायला शिकले पाहिजे. संकोच किंवा भीती न बाळगता संवाद
साधल्यास विचारांची देवाणघेवाण होते, आत्मविश्वास वाढतो आणि
नेतृत्वगुण विकसित होतात, असे त्यांनी नमूद केले.
प्रास्ताविकात महाविद्यालयाचे
सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजीराव शिंदे यांनी नमूद केले की, व्यक्तिमत्त्व विकास, कृत्रिम
बुद्धिमत्ता आधारित प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना बायोडाटा तयार करणे, मुलाखतीची तयारी करणे तसेच भविष्यातील करिअर घडविण्यास मोठा लाभ होणार
आहे. याशिवाय जेआरएफ, एसआरएफ (JRF, SRF) आणि विविध स्पर्धा
परीक्षांविषयीही मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यानंतर माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि सहाय्यक महासंचालक डॉ. वेल्मुरुगन यांच्या
हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच कृषि महाविद्यालयात प्रथमच विद्यार्थ्यांसाठी
उभारण्यात आलेल्या व्यायामशाळेचे उद्घाटन करण्यात आले. यासोबतच २०० एकर
प्रक्षेत्रावरील अंतरमशागतीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या लघु ट्रॅक्टरचे, मराठवाडा
कृषि विद्यापीठाने विकसित केलेल्या आधुनिक बैलचलित कृषि अवजारांचे, जनावरांसाठी नव्याने बांधलेल्या गोठ्याचे तसेच सेरिकल्चर (रेशीमशेती)
युनिटचे उद्घाटन व पाहणी करण्यात आली.
याशिवाय चार डिजिटल
वर्गखोल्या,
डिजिटल प्रयोगशाळा, इंटरनेट व इन्व्हर्टर
सुविधायुक्त संगणक प्रयोगशाळा आणि अर्थशास्त्र प्रयोगशाळेची पाहणी करण्यात आली. त्यानंतर
माननीय कुलगुरूंनी मुला-मुलींच्या वसतिगृहाच्या सुरू असलेल्या बांधकामाचा आढावा
घेतला.
कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन डॉ. दशरथ सारंग यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ.
पुंडलिक वाघमारे यांनी केले.
कार्यक्रमास डॉ. शंकर नरवाडे, प्रा. वैशाली बासटेवाड, डॉ. राहुल भालेराव, डॉ. विद्यानंद मनवर, डॉ. आर. एफ. ठोंबरे, डॉ. ज्योती गायकवाड, श्री चंद्रकांत ताटीकोंडलवार, श्री सलीम पठाण, श्री नाईक, श्री आडे तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी, प्रक्षेत्रावरील चालक, मजूर वर्ग आणि इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)

.jpeg)

.jpeg)
.jpeg)
.jpeg)
