वनश्री पुरस्कारामुळे विद्यापीठाच्या हरित उपक्रमांना नवी ऊर्जा : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत प्रदान करण्यात येणारा 'छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार–२०२४' वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या लातूर येथील कृषि महाविद्यालयाला जाहीर झाला
आहे. विशेष म्हणजे, शैक्षणिक संस्था संवर्गात महाविद्यालयाने
राज्यस्तरीय तसेच विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक पटकावून हा मानाचा पुरस्कार
प्राप्त केला आहे.
'छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार–२०२४'साठी
प्राप्त प्रस्तावांचे परीक्षण करण्यासाठी राज्यस्तरीय मूल्यांकन समितीची बैठक
माननीय मंत्री (वने) यांच्या अध्यक्षतेखाली वरिष्ठ वन अधिकारी व समिती सदस्यांच्या
उपस्थितीत दिनांक ९ जून २०२६ रोजी मंत्रालय, मुंबई येथे पार
पडली. प्राथमिक छाननी समितीच्या अहवालावर सविस्तर चर्चा करून विविध पुरस्कार
संवर्गांतील विजेत्यांच्या निवडीस दिनांक ९ जुलै २०२६ रोजी मान्यता देण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारांतर्गत राज्य व विभागीय स्तरावर
व्यक्ती, शैक्षणिक संस्था, सेवाभावी
संस्था, ग्रामपंचायत, ग्रामविभाग,
जिल्हा आदी विविध संवर्गांमध्ये वृक्षलागवड व पर्यावरण संवर्धन
क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव करण्यात येतो.
या यशाबद्दल बोलताना विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
यांनी सांगितले की, मागील
चार वर्षांत विद्यापीठाने पर्यावरण संवर्धन व हरित उपक्रम सातत्याने राबवून अनेक
मानाचे पुरस्कार प्राप्त केले आहेत. यापूर्वी विद्यापीठाला जागतिक स्तरावरील हरित
विद्यापीठ पुरस्कारही मिळाला असून, आता प्राप्त झालेल्या
वनश्री पुरस्कारामुळे या कार्याला आणखी प्रतिष्ठा लाभली आहे. त्यांनी या यशाबद्दल लातूर
कृषि महाविद्यालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. बाबासाहेब ठोंबरे आणि संपूर्ण चमूचे
अभिनंदन केले तसेच भविष्यातही पर्यावरणपूरक व समाजाभिमुख उपक्रम अधिक व्यापक
स्वरूपात राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, विद्यापीठाने
मागील चार वर्षांत परभणी, लातूर, अंबेजोगाई
आणि बदनापूर येथील परिसरात सुमारे ५.८० लाख वृक्षांची लागवड केली आहे. या
वृक्षलागवडीत ४० विविध प्रजातींचा समावेश असून त्यामध्ये प्रामुख्याने फळझाडे,
औषधी व सुगंधी वनस्पती, फुलझाडे तसेच इमारती
लाकूड देणाऱ्या वृक्षप्रजातींचा समावेश आहे.
याशिवाय, विद्यापीठ
परिसरातून जाणाऱ्या ४.५ किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गालगत ५०० मीटर रुंदीचा
हरित पट्टा विकसित करण्यात आला आहे. तसेच परभणी येथील विद्यापीठ मुख्यालयातील
मध्यवर्ती प्रक्षेत्राच्या सायळा ब्लॉकमध्ये सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून
सुमारे ३० मीटर रुंदी व ९ किलोमीटर लांबीच्या पट्ट्यात ३४ हेक्टर क्षेत्रावर दोन
टप्प्यांत विविध फळझाडे व औषधी वनस्पतींची लागवड करून हरित पट्टा विकसित करण्यात
येत आहे.
सन २०२६–२७ या वर्षासाठी वन विभाग व सामाजिक वनीकरण विभागाच्या सहकार्याने
परभणी, अंबेजोगाई, गोळेगाव,
जालना आणि बदनापूर येथील विद्यापीठाच्या ६६.४३ हेक्टर क्षेत्रावर
वृक्षलागवडीचा कार्यक्रम प्रस्तावित आहे. या अंतर्गत सुमारे ६.५० लाख रोपांची
लागवड करण्यात येणार असून, त्यांच्या संरक्षणासाठी ४४.४०
किलोमीटर लांबीचे चेन-लिंक तसेच जैविक (बायो) कुंपण उभारण्याची तरतूद करण्यात आली
आहे. या सर्व उपक्रमांमुळे विद्यापीठाचा 'हरित विद्यापीठ'
हा संकल्प अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे यांनी सांगितले की,
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली सन
२०२१-२२, २०२२-२३ आणि २०२३-२४ या कालावधीत वृक्षलागवड व
पर्यावरण संवर्धन क्षेत्रात करण्यात आलेल्या उल्लेखनीय कार्याच्या आधारे हा
पुरस्कार जाहीर झाला आहे.
ते पुढे म्हणाले की, लातूर
कृषि महाविद्यालयातील वृक्षलागवड व संवर्धन उपक्रमाची सुरुवात सन २००८ मध्ये
तत्कालीन सहयोगी अधिष्ठाता डॉ. अशोक ढवण यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा
योजनेच्या माध्यमातून कार्यक्रम अधिकारी म्हणून माझ्या पुढाकारातून करण्यात आली.
त्यानंतर हा उपक्रम सातत्याने विस्तारत गेला. महाविद्यालय परिसरात २०१८-१९,
२०२२-२३ आणि २०२३-२४ या प्रत्येक वर्षी सुमारे ६० हजार, असे एकूण १ लाख ८० हजार वृक्षांची लागवड करण्यात आली. यापूर्वी अस्तित्वात
असलेल्या तसेच नव्याने लागवड केलेल्या वृक्षांसह जून २०२६ अखेर महाविद्यालय
परिसरात अडीच लाखांहून अधिक वृक्षसंपदा विकसित झाली आहे.
या वृक्षसंपदेमुळे २४ तासात सुमारे १० लाख किलो ऑक्सिजनची निर्मिती होत
असून दरवर्षी ६,२५० कार्बन क्रेडिट
निर्माण होत आहेत. पर्यावरणाचा समतोल राखण्याबरोबरच समाजाभिमुख पर्यावरण
संवर्धनाचे प्रभावी मॉडेल लातूर कृषि महाविद्यालयाच्या माध्यमातून उभारण्यात
आल्याचे त्यांनी नमूद केले.
या यशाबद्दल संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार,
विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव
श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर,
नियंत्रक श्रीमती भाग्यश्री जाधव तसेच सर्व अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक व संशोधक यांनी लातूर कृषि महाविद्यालयाच्या चमूचे अभिनंदन
केले.




