Wednesday, July 8, 2026

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून वनामकृवित "बीजप्रक्रियेचे महत्त्व व पद्धत" विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन संपन्न

 बीजप्रक्रिया हे शाश्वत व कमी खर्चातील प्रभावी तंत्रज्ञान : संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पांतर्गत सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र तसेच शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने "बीजप्रक्रियेचे महत्त्व व पद्धत" या विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन मंगळवार, दिनांक ७ जुलै २०२६ रोजी करण्यात आले. हा कार्यक्रम विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून संपन्न झाला, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार हे होते, तर सेंद्रीय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्रमुख अन्वेषक डॉ. आनंद गोरे तसेच कीटकशास्त्रज्ञ डॉ. श्रद्धा धुरगुडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमात वनस्पती रोगशास्त्र विभागाच्या सहयोगी प्राध्यापक तथा सहायक बीज संशोधन अधिकारी डॉ. मीनाक्षी पाटील यांनी बीजप्रक्रियेचे बाबत तांत्रिक मार्गदर्शन केले.

मार्गदर्शन करताना डॉ. भगवान आसेवार यांनी बीजप्रक्रिया ही निरोगी, जोमदार आणि अधिक उत्पादनक्षम पिकाचा पाया असल्याचे सांगितले. दर्जेदार बियाण्यासोबत शिफारशीनुसार योग्य पद्धतीने बीजप्रक्रिया केल्यास उगवण चांगली होते, रोपांची वाढ सशक्त राहते आणि बीज तसेच जमिनीद्वारे पसरणाऱ्या अनेक रोगांपासून पिकांचे प्रभावी संरक्षण होते. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया नियमितपणे करावी, असे आवाहन त्यांनी केले. बीजप्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या जैविक व इतर आवश्यक निविष्ठांची योग्य माहिती घेऊन शिफारशीनुसार योग्य क्रमानेच बीजप्रक्रिया करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रोग झाल्यानंतर खर्चिक उपाययोजना करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बीजप्रक्रिया हे सर्वात प्रभावी, किफायतशीर आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ आनंद गोरे यांनी केले. डॉ. मीनाक्षी पाटील यांनी बीजप्रक्रियेचे महत्त्व, आवश्यकता, विविध पद्धती, जैविक बीजप्रक्रिया, आवश्यक सामग्री, बीजप्रक्रियेचा योग्य क्रम, घ्यावयाची काळजी तसेच त्याचे फायदे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यानंतर आयोजित प्रश्नोत्तर सत्रात शेतकऱ्यांनी बीजप्रक्रिया, रोग व्यवस्थापन आणि सेंद्रीय निविष्ठांबाबत विविध प्रश्न विचारून तज्ज्ञांकडून समाधानकारक उत्तरे मिळविली.

या ऑनलाइन कार्यक्रमाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कीटकशास्त्र विभागाच्या सहाय्यक प्राध्यापक डॉ. श्रद्धा धुरगुडे यांनी केले तसेच उपस्थित मान्यवर, तज्ज्ञ आणि शेतकऱ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

यावेळी तज्ज्ञांनी सेंद्रीय शेतीला चालना देण्यासाठी तसेच कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवून देण्यासाठी बीजप्रक्रिया हे अत्यंत महत्त्वाचे आणि प्रभावी तंत्रज्ञान असल्याचे प्रतिपादन केले.