वनामकृवित सिंचन जल व्यवस्थापनावरील राष्ट्रीय द्विवार्षिक कार्यशाळेचे उद्घाटन
विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील अखिल
भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (AICRP) – सिंचन जल व्यवस्थापन
विभाग आणि भुवनेश्वर येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत भारतीय जल
व्यवस्थापन संस्थान (IIWM
– Indian Institute of Water Management) यांच्या संयुक्त विद्यमाने
दिनांक १ ते ३ जुलै २०२६ दरम्यान आयोजित “सिंचन जल
व्यवस्थापन” विषयावरील द्विवार्षिक कार्यशाळा – २०२६ चे उद्घाटन दिनांक १ जुलै २०२६
रोजी सकाळी ९.३० वाजता विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील सिंपोजियम हॉल येथे झाले.
उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा.
(डॉ.) इन्द्र मणि हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नवी दिल्ली येथील भारतीय कृषि
अनुसंधान परिषदेच्या नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन विभागाचे (ICAR-NRM) उपमहासंचालक डॉ. ए. के. नायक यांनी आभासी माद्यामाद्वारे सहभाग नोंदविला.
व्यासपीठावर नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या मृदा व जल
व्यवस्थापन विभागाचे सहाय्यक महासंचालक डॉ. वेल्मुरुगन आणि भुवनेश्वर येथील भारतीय
कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत भारतीय जल व्यवस्थापन संस्थानाचे संचालक डॉ. ए.
सारंगी, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ.
खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, भुवनेश्वर
येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद अंतर्गत अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्प (जल
व्यवस्थापन) चे प्रकल्प समन्वयक डॉ. एस. मोहंती तसेच परभणी येथील अखिल भारतीय
समन्वित संशोधन प्रकल्प (सिंचन जल व्यवस्थापन) चे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी
यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विद्यापीठाचे कुलसचिव श्री. पुरभा काळे, नियंत्रक
श्रीमती भाग्यश्री जाधव, माजी शिक्षण
संचालक डॉ. उदय खोडके प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. के. गुप्ता, डॉ. डी. के. शर्मा, डॉ. के. एन. तिवारी, डॉ. एस. डी. गोरंटीवार, जैन इरिगेशनचे श्री. बी. डी.
जडे आदी मान्यवर यांच्यासह भारतातील विविध राज्यांमधील २६ संशोधन केंद्रांतील ४३
शास्त्रज्ञांनी प्रत्यक्ष उपस्थिती दर्शविली, तर २२
शास्त्रज्ञांनी आभासी माध्यमाद्वारे सहभाग नोंदविला. तसेच विद्यापीठातील सर्व
महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, विभाग प्रमुख, अभियांत्रिकी महाविद्यालयातील शास्त्रज्ञ तसेच प्रगतशील शेतकरी यांचाही या
कार्यक्रमात सहभाग होता.
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी या
कार्यशाळेत देशभरातील शास्त्रज्ञ सहभागी झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. पाण्याचे
महत्त्व अधोरेखित करताना त्यांनी “जल बिना जीवन नहीं” असे नमूद
करत, मानवी जीवन, स्वच्छता आणि संपूर्ण
समाजव्यवस्थेसाठी पाणी किती अनिवार्य आहे हे स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की,
जसे शेतीसाठी ज्ञान आवश्यक आहे, तसेच
पाण्याचेही अत्यंत महत्त्व असून या कार्यशाळेत सहभागी झालेल्या जलतज्ज्ञांमध्ये
विचारमंथन होऊन सिंचनातील पाणी बचतीसाठी उपयुक्त शिफारशी पुढे येतील.
विद्यापीठामध्ये सन १९८० पासून कार्यरत असलेल्या सिंचन जल
व्यवस्थापन योजनेद्वारे अनेक तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून, त्या
तंत्रज्ञानाचा मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये प्रभावी प्रसार करण्यात आला आहे.
तसेच एससीएसपी (SCSP) आणि टीएसपी (TSP) कार्यक्रमांतर्गत मराठवाड्यातील १२ गावांमध्ये पथदर्शी कार्यक्रम राबवून
हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आले आहे.
विद्यापीठाने चार वर्षांपूर्वी “शेतकरी
देवो भवः” हा नारा दिला होता आणि त्याच भावनेतून सातत्याने कार्य सुरू आहे. आजच्या
या राष्ट्रीय कार्यक्रमात देखील शेतकऱ्यांना विशेष आमंत्रित करून त्यांचा सन्मान
करण्यात आला असून, त्यांच्या अनुभव, विचार
आणि सल्ल्यांची नोंद या कार्यशाळेच्या चर्चेत व्हावी, असे
आवाहन त्यांनी केले.
जलसिंचन संशोधनासह विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी
भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) आणि महाराष्ट्र शासन सातत्याने
प्रोत्साहन व अनुदान उपलब्ध करून देत असल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. पुढे ते म्हणाले की, पाण्याच्या बचतीसाठी
पाण्याचा संचय, संवर्धन आणि न्यायिक वापर (Collect,
Conserve and Judicial Use of Water) अत्यंत महत्त्वाचा असल्याचे
त्यांनी स्पष्ट केले. याच दृष्टीने विद्यापीठाने ९ कोटी लिटर क्षमतेचे अमृत सरोवर
(शेततळे) निर्माण केले असून, भविष्यात २६ कोटी लिटर
जलसंचयाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मराठवाड्यातील सुमारे ८० टक्के शेती ही
पावसाच्या पाण्यावर अवलंबून असून अनेकदा दुबार पेरणीचे संकट निर्माण होते. यासाठी
विविध तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असले तरी अजून अनेक बाबींवर काम करण्याची
आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने “त्रिशूल
तंत्रज्ञान” विकसित केले असून, त्यामध्ये शेततळे, सूक्ष्म सिंचन आणि सौरऊर्जेचा वापर यांचा समावेश आहे. याद्वारे विद्यापीठाच्या
मध्यवर्ती प्रक्षेत्रावर तसेच बदनापूर येथील प्रक्षेत्रावर प्रात्यक्षिकांद्वारे पाण्याचे
महत्त्व प्रभावीपणे दाखवून देण्यात आले आहे.
शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाला संबंधित
राज्य शासनाची मान्यता मिळणे आवश्यक असते. त्यानंतरच त्या तंत्रज्ञानाचा शासनाच्या
योजनांमध्ये समावेश होऊ शकतो, हे शेततळ्याच्या उदाहरणातून स्पष्ट झाले
आहे. पाण्याच्या व्यवस्थापनासाठी केवळ कृषि अभियंत्यांचे कार्य महत्त्वाचे नसून
बीज पैदास तज्ज्ञांसह सर्व संबंधित शाखांचे योगदान तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी
नमूद केले. विद्यापीठाच्या गोदावरी तूर वाणाच्या विकासाद्वारे विद्यापीठाने हे
सिद्ध करून दाखवले आहे.
देशातील जवळपास ८० टक्के पाण्याचा वापर शेतीसाठी होतो. हा
वापर कमी करण्यासाठी पीक पद्धतीत बदल करणे आणि आवश्यक आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध
करून देणे अत्यंत गरजेचे आहे. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री उत्पादन वाढीसाठी
तसेच सिंचन क्षेत्र विस्तारासाठी सातत्याने संवर्धित सिंचनाचा आग्रह धरत आहेत.
देशाने ५० मिलियन टनांवरून ३७६ मिलियन टन कृषी
उत्पादनापर्यंत मोठी झेप घेतली असून, यात संवर्धित सिंचनाचा
व्यापक वापर झाल्यास उत्पादनात आणखी मोठी वाढ निश्चित होईल. महाराष्ट्रातून संपूर्ण
देशाला दिशादर्शक ठरणारे शेती तंत्रज्ञान दिले जात असून, या
कार्यशाळेतून भविष्यासाठी उपयुक्त आणि परिणामकारक शिफारशी पुढे याव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यासोबतच शिक्षण संस्था, उद्योग क्षेत्र आणि
शासन म्हणजेच Academia – Industry – Government या
त्रिस्तरीय समन्वयाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. “पाणीच
नवी क्रांती घडवू शकते” असे नमूद करत, कोणतेही तंत्रज्ञान
विकसित करताना त्याद्वारे पाण्याची बचत कशी साधता येईल याचा विचार प्रत्येक शास्त्रज्ञाने
करावा, असे आवाहन त्यांनी केले.
उपमहासंचालक डॉ. ए. के. नायक म्हणाले की, सिंचन
जल व्यवस्थापनासाठी पाण्याचा काटेकोर व कार्यक्षम वापर होण्याच्या दृष्टीने स्पष्ट
ध्येय आणि उद्दिष्टे निश्चित करून योग्य कार्यक्रमांची आखणी करणे आवश्यक आहे.
याच्या माध्यमातून पुढील पाच वर्षांतील संभाव्य परिणाम आणि मिळणारे लाभ
यासंदर्भातील योग्य दस्तऐवज तयार करण्यात यावेत, ज्याचा
उपयोग प्रभावी नियोजनासाठी करता येईल.
त्यांनी सांगितले की, केवळ मागील पाच वर्षांतील
नव्हे तर प्रकल्प सुरू झाल्यापासून झालेल्या सर्व महत्त्वपूर्ण यशस्वी कामगिरीची
नोंद घेणे आवश्यक आहे. तसेच भारतातील सर्व केंद्रांच्या कार्याचे मूल्यांकन
करण्यात यावे आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या केंद्रांना प्रोत्साहन देण्यात यावे.
याबरोबरच विकसित तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांमध्ये झालेल्या
सकारात्मक बदलांचे प्रात्यक्षिकरण करावे. या कार्यशाळेतील चर्चेमधून योग्य नियोजन
आणि प्रभावी शिफारसी समोर याव्यात. तसेच जिल्हास्तरावर जलसिंचन नियोजनासाठी सखोल
चर्चा व्हावी. जलआधारित आर्थिक नियोजन आणि पीक नियोजनाला प्राधान्य देण्यात यावे.
विशेषतः कोरडवाहू क्षेत्रामध्ये जमिनीतील उपलब्ध पाण्याचा विचार करून पीक नियोजन
निश्चित करावे आणि पुढील पाच वर्षांसाठी सक्षम व परिणामकारक असा आराखडा तयार करावा, असे
त्यांनी सूचित केले.
यावेळी सहाय्यक महासंचालक डॉ. वेल्मुरुगन यांनी आपल्या
मार्गदर्शनात सांगितले की,
शाश्वत शेतीसाठी तंत्रज्ञानाधारित कार्यपद्धती तसेच हवामान अनुकूल
तंत्रज्ञानाची आज नितांत गरज आहे. हवामान बदल ही जागतिक पातळीवरील गंभीर बाब असून
त्यासोबत अनेक समस्या जोडलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर योग्य नियोजन करणे
अत्यावश्यक आहे. तसेच सिंचनाच्या पायाभूत सुविधा वाढवून पाण्याचा काटेकोर व
कार्यक्षम वापर करणे गरजेचे आहे. पाण्याचे घरगुती, औद्योगिक
आणि कृषी अशा विविध क्षेत्रांमध्ये बहुविध उपयोग होत असून त्याचा वापर करणारे अनेक
घटक (Stakeholders) आहेत. पाण्याची वाढती मागणी आणि
उपलब्धतेवरील ताण या सर्व आव्हानांवर मात करण्यासाठी अथवा त्यांची तीव्रता कमी
करण्यासाठी या कार्यशाळेत सखोल चर्चा व्हावी, असे त्यांनी
नमूद केले.
विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी स्वागतपर
भाषणात विद्यापीठामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध संशोधन कार्यांचा आढावा
सादर केला.
भुवनेश्वर येथील संचालक डॉ. ए. सारंगी यांनी अखिल भारतीय
समन्वित संशोधन प्रकल्पाच्या भुवनेश्वर येथील मुख्य कार्यालयासह देशातील २६ केंद्रांवर
सुरू असलेल्या विविध संशोधन कार्याची माहिती दिली.
उद्घाटन समारंभादरम्यान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांच्या हस्ते उपस्थित मान्यवर तसेच शेतकरी प्रतिनिधींचा सत्कार
करण्यात आला. याचप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वार्षिक अहवाल तसेच देशातील विविध
ठिकाणच्या शास्त्रज्ञांनी लिखित विविध प्रकाशनांचे विमोचन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ. हरीश आवारी यांनी केले, तर सूत्रसंचालन उप संचालक संशोधन डॉ. सुनिता पवार यांनी केले.
कार्यशाळेत देशभरातील अखिल भारतीय समन्वित संशोधन
प्रकल्पांतर्गत सिंचन जल व्यवस्थापन केंद्रांतील शास्त्रज्ञ सिंचन जल व्यवस्थापन, सूक्ष्म
सिंचन, जलसंधारण, हवामान बदलाच्या
पार्श्वभूमीवरील जल नियोजन तसेच शाश्वत शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान या विषयांवर
चर्चा व अनुभवांची देवाणघेवाण करणार आहेत.
कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रकल्प समन्वयक डॉ. एस.
मोहंती तसेच परभणी येथील सिंचन जल व्यवस्थापनचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. हरीश आवारी यांनी
सर्व संबंधितांचे सहकार्य लाभत असल्याचे सांगितले.

.jpeg)
.jpeg)
.jpeg)

.jpeg)
.jpeg)

.jpeg)


.jpeg)


