शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याचे वनाकृविच्या तज्ज्ञांनी केले आवाहन
काही भागात पाऊस पडल्यानंतर सुप्तावस्थेतील शंखी गोगलगायी
बाहेर पडताना दिसत आहेत. त्यामुळे सोयाबीन, कापूस, भाजीपाला पिके तसेच फळबागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता
आहे. कोवळ्या रोपांच्या तसेच पानांच्या अवस्थेत या गोगलगायींचा प्रादुर्भाव अधिक
नुकसानकारक ठरतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहून वेळीच लक्ष देऊन
सामूहिकरीत्या एकात्मिक उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून
पिकांचे होणारे नुकसान टाळता येईल, असे आवाहन वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे डॉ. डी. डी. पटाईत,
डॉ. जी. डी. गडदे आणि श्री. एम. बी. मांडगे या तज्ज्ञांनी केले आहे.
शंखी गोगलगायींची जीवनशैली व प्रादुर्भाव:
शंखी गोगलगायी प्रामुख्याने रात्री किंवा पहाटे सक्रिय
असतात. दिवसा त्या दगडाखाली, पिकांच्या अवशेषाखाली, तणामध्ये, गोणपाटाखाली तसेच इतर ओलसर व सावलीच्या
ठिकाणी आश्रय घेतात. सतत ढगाळ वातावरण, जास्त आर्द्रता आणि
शेतामध्ये पाणी साचून राहिल्यास त्यांचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढतो. त्यामुळे
सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा शेताची पाहणी करून नियंत्रणाच्या उपाययोजना
केल्यास त्या अधिक प्रभावी ठरतात.
प्रादुर्भावाची लक्षणे :
• कोवळी पाने कुरतडलेली दिसणे.
• नव्याने उगवलेली रोपे रात्रीच्या वेळी खाल्ली जाणे
किंवा कापल्यासारखी दिसणे.
• पानांवर, खोडावर व जमिनीवर चिकट
श्लेष्माचा (चमकदार) माग दिसणे.
• शेतात किंवा बागेत मोठ्या प्रमाणात शंखी गोगलगायी व
त्यांची अंडी आढळणे.
वरीलपैकी एक किंवा अधिक लक्षणे आढळल्यास विलंब न करता
पुढीलप्रमाणे एकात्मिक व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्यात.
शंखी गोगलगायीचे एकात्मिक
व्यवस्थापन
नियंत्रणात्मक उपाययोजना
१. हाताने गोळा करून नष्ट करणे
सायंकाळी किंवा सूर्योदयापूर्वी शेतातील गोगलगायी गोळा
करून साबणाच्या अथवा मिठाच्या पाण्यात बुडवून माराव्यात किंवा शेतातून मोठ्या शंखी
गोगलगायी जमा करून प्लास्टिकच्या पोत्यात भरून त्यात कोरडे मीठ अथवा चुना टाकून
त्या पोत्याचे तोंड उघडे न ठेवता घट्ट बंद करावे, जेणेकरून त्यामधील
गोगलगायी पोत्यातून बाहेर न जाता मिठाच्या किंवा चुन्याच्या संपर्कात येऊन आत
मध्येच मरून जातील.
२. सुरक्षित हाताळणी करावी
गोगलगायी जमा करताना अथवा हाताळणी करताना उघड्या हाताने न
करता हातमोजे व तोंडावर मास्क घालूनच करणे गरजेचे आहे.
३. सापळ्यांचा वापर करावा
शेतामध्ये किंवा बागेमध्ये ७ ते ८ मीटर अंतरावर विविध
ठिकाणी वाळलेल्या गवताचे किंवा भाजीपाला पिकाच्या अवशेषाचे ढीग अथवा गोणपाट
गुळाच्या पाण्यात ओले करून शेतात ठिकठिकाणी ठेवावेत. गोगलगायी त्या ठिकाणी
आश्रयाला जातात. सूर्योदयानंतर त्याखाली गोळा झालेल्या गोगलगायी व त्यांची अंडी
गोळा करून मिठाच्या पाण्यात टाकून नष्ट करावी.
४. शेताची स्वच्छता राखावी.
शेतातील तण, पिकांचे अवशेष, दगड, लाकडाचे तुकडे, रिकामे
पोते, प्लास्टिक अथवा इतर ओलसर कचरा यामध्ये शंखी गोगलगायी
आश्रय घेतात. त्यामुळे अशी ठिकाणे नियमित स्वच्छ ठेवावीत. तसेच शेतामध्ये पाणी
साचणार नाही याची काळजी घ्यावी.
५. आमिषाद्वारे आकर्षित करून नियंत्रण
करावे.
गोगलगायींना आकर्षित करण्यासाठी शेतात ठिकठिकाणी गोणपाट ओले
करून त्यावर पत्ताकोबी अथवा पपईची पाने बारीक करून ठेवावीत, त्याकडे
आकर्षित होऊन जमा झालेल्या गोगलगायींवर तंबाखूचा अर्क ५ लिटर (२५० ग्रॅम तंबाखू
भुकटी ७.५ लिटर पाण्यात उकळून ५ लिटर तयार झालेले द्रावण) + कॉपर सल्फेट म्हणजेच
मोरचूद द्रावण ५ लिटर (३०० ग्रॅम कॉपर सल्फेट ५ लिटर पाण्यात) असे एकूण १० लिटर
द्रावण फवारावे, त्याच्या संपर्कात आल्याने गोगलगायी मरतात.
६. मिठाच्या द्रावणाची व परावर्तक फवारणी
लहान शंखीच्या नियंत्रणासाठी १० टक्के मिठाची (१०० ग्रॅम
प्रति १ लिटर पाणी) फवारणी फायदेशीर दिसून आली आहे. बोर्डो मिश्रण (१ किलो मोरचूद
+ १ किलो चुना १०० लिटर पाण्यात), कॉपर सल्फेट (३०० ग्रॅम १० लिटर पाण्यात)
किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड (२५ ग्रॅम १० लिटर पाण्यात) इत्यादीच्या फवारण्या
गोगलगाय नियंत्रणासाठी नोंदणीकृत नाहीत, परंतु गोगलगाय
नियंत्रणासाठी किंवा त्यांना परावृत करण्यासाठी फळबागेत काही प्रमाणात परिणामकारक
आहेत.
७. गोगलगायनाशकाचा वापर करावा
- गोगलगायीच्या नियंत्रणासाठी मेटाल्डिहाईड
दाणेदार या गोगलगायनाशकाचा वापर करावा.
- कापसासारख्या पिकामध्ये दाणेदार मेटाल्डिहाईड
२ किलो प्रति एकरी या प्रमाणात शेतात पसरून द्यावे, तर फळबागेमध्ये झाडाखाली दाणेदार
मेटाल्डिहाईड प्रति झाड १०० ग्रॅम पसरून टाकावे.
- शंखी गोगलगाय प्रामुख्याने पपईची रोपे
व झेंडूच्या रोपांकडे आकर्षित होतात. म्हणून मेटाल्डिहाईडच्या गोळ्या पपईच्या
पिवळ्या पानांजवळ ठेवतात. त्यामुळे त्या लवकर आकर्षित होऊन मोठ्या प्रमाणात मरतात.
- मेटाल्डिहाईडचा वापर, जास्त
तापमान व कमी आर्द्रता असताना अधिक प्रभावी दिसून येतो.
- जर हे आमिष उपलब्ध न झाल्यास, पुढील
प्रकारे आमिष तयार करून बागेमध्ये टाकून घ्यावे.
- दहा लिटर पाण्यामध्ये दोन किलो गूळ आणि
२५ ग्रॅम यीस्ट यांचे द्रावण तयार करावे. हे द्रावण ५० किलो गव्हाच्या अथवा भाताच्या
कोंड्यात टाकून चांगले मिसळावे. १० ते १२ तास हे मिश्रण आंबविण्यासाठी ठेवावे. त्यानंतर
त्यामध्ये थायामिथोक्झाम २५ टक्के ५० ग्रॅम चांगल्या प्रकारे मिसळावे. हे आमिष
शेतामध्ये ढिगाच्या स्वरुपात किंवा बांधाच्या कडेने पट्टा स्वरुपात टाकावे.
- सदरील आमिषापासून पाळीव प्राणी, लहान
मुलांना दूर ठेवावे. वरील गोगलगायनाशक अथवा आमिषाचा वापर प्लॅस्टिक हातमोजे घालूनच
काळजीपूर्वक करावा.
८. पावसानंतर नियमित शेताची पाहणी करावी.
पाऊस पडल्यानंतर सलग ३ ते ५ दिवस सकाळी व सायंकाळी शेताची
पाहणी करावी. प्रादुर्भाव सुरुवातीच्या अवस्थेत आढळल्यास नियंत्रण अधिक प्रभावी व
कमी खर्चात करता येते.
शंखी गोगलगायींचा प्रभावी बंदोबस्त करण्यासाठी केवळ एका
शेतात उपाययोजना करून अपेक्षित यश मिळत नाही. ज्या गावात किंवा परिसरात
प्रादुर्भाव दिसून येत आहे,
त्या भागातील सर्व शेतकऱ्यांनी एकाच वेळी सामूहिकरीत्या व
सुरुवातीपासूनच उपाययोजना केल्यास गोगलगायींची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होऊन
पिकांचे नुकसान प्रभावीपणे टाळता येते.
महत्त्वाची सूचना :
गोगलगायनाशक अथवा आमिषाचा वापर करताना शिफारस केलेले
प्रमाण व लेबलवरील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. आमिष किंवा गोगलगायनाशक लहान
मुले, पाळीव प्राणी व पक्षी यांच्या आवाक्याबाहेर ठेवावे. वापरानंतर हात साबणाने
स्वच्छ धुवावेत तसेच रिकामे वेष्टन अथवा डबे शेतात किंवा पाण्याच्या स्रोताजवळ
फेकू नयेत.
अधिक माहितीसाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील
कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या दूरध्वनी क्रमांक ०२४५२-२२९००० किंवा
व्हाटस्अप हेल्पलाईन क्रमांक ८३२९४३२०९७ यावर संपर्क करावा.
वनामकृवि संदेश क्रमांक: ०१/२०२६
( दिनांक: ०६ जुलै २०२६)

.jpeg)

.jpeg)
.jpeg)