कृषिदिनानिमित्त वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत सामुदायिक विज्ञान
महाविद्यालयात दिनांक १ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा
हरितक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय वसंतराव नाईक यांची जयंती ‘कृषिदिन’ म्हणून मोठ्या
उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने त्यांच्या
कृषी विकासातील योगदानाला अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयातील स्व. वसंतराव नाईक यांच्या
प्रतिमेस सहयोगी अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून
विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करत
कृषी क्षेत्रातील त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचा गौरव केला.
या प्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी तथा विभाग प्रमुख डॉ.
शंकर पुरी यांनी स्व. वसंतराव नाईक यांच्या कार्याचा आढावा घेताना सांगितले की, महाराष्ट्रात हरितक्रांतीची
पायाभरणी करून शेती विकासाला नवी दिशा देण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले.
शेतकरी केंद्रित धोरणे, सिंचन विकास, कृषी शिक्षण आणि ग्रामीण भागाच्या
प्रगतीसाठी त्यांनी दिलेले योगदान आजही प्रेरणादायी आहे.
कृषिदिनाचे औचित्य साधून महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या
वतीने परिसरात वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत
विकासाचा संदेश देत आंबा, चिकू, करंज, चाफा, जास्वंद यांसारख्या उपयुक्त व पर्यावरणपूरक वृक्षांची
लागवड करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत
वृक्षसंवर्धनाची सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचा संकल्प केला.
या कार्यक्रमास अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (कृषिरत महिला) चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुनीलदत्त जक्कावाड, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


.jpeg)

.jpeg)


