Friday, July 3, 2026

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या नाहेप–डीएफएसआरडीए सेंटर ऑफ एक्सलन्सच्या दुसऱ्या ड्रोन प्रशिक्षण केंद्रास डीजीसीए, नवी दिल्लीची मान्यता

भारतातील एकमेव पहिले १८० दिवसीय कृषि  ड्रोन प्रशिक्षण,२१-दिवसीय प्रोफेशनल प्रमाणपत्र देणाऱ्या विद्यापीठाची आणखी एक भरारी; आता विद्यापीठातील हे दुसऱ्या ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्रास सन २०३६ पर्यंत अधिकृत मान्यता

कृषि  तंत्रज्ञान विकासाला मोठी चालना.... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने कृषि  क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. भारत सरकारच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA), नवी दिल्ली यांनी विद्यापीठातील नाहेप–डीएफएसआरडीए (NAHEP–DFSRDA) सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत सुरू होणाऱ्या दुसऱ्या रिमोट पायलट ट्रेनिंग ऑर्गनायझेशन (RPTO – Remote Pilot Training Organization) ड्रोन प्रशिक्षण केंद्रास सन २०३६ पर्यंत अधिकृत मान्यता प्रदान केली आहे.

विद्यापीठातील हे दुसरे अधिकृत ड्रोन प्रशिक्षण केंद्र असून, यापूर्वीचे केंद्र कृषि  अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यरत आहे. त्यामुळे आता विद्यापीठात अधिकृत ड्रोन पायलट प्रशिक्षण अभ्यासक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

ड्रोन नियम, २०२१ मधील नियम ३९ अंतर्गत जारी करण्यात आलेल्या Certificate of Authorization नुसार या केंद्रास रोटरक्राफ्ट–RPAS प्रकारातील स्मॉल व मीडियम वर्गाच्या ड्रोनसाठी VLOS (Visual Line of Sight) अंतर्गत दिवस व रात्र प्रशिक्षण देण्यास मान्यता मिळाली आहे.

या प्रमाणपत्राचा तपशील RPTO Authorization No. : RPTO202600120, मंजुरी दिनांक : २३ जून २०२६ वैधता कालावधी : २३ जून २०२६ ते २२ जून २०३६ असा आहे. ही मान्यता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे सहसंचालक श्री. मनीष कुमार यांच्या स्वाक्षरीने निर्गमित करण्यात आली आहे.

विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षण, संशोधन व कौशल्य विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून, ही मान्यता त्या प्रयत्नांचे महत्त्वपूर्ण फलित मानली जात आहे. या मान्यतेमुळे विद्यार्थी, संशोधक, शेतकरी युवक तसेच कृषि  उद्योजकांना अधिकृत ड्रोन पायलट प्रशिक्षण घेऊन आधुनिक कृषि  तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.

महाराष्ट्रातील नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून मान्यता प्राप्त कृषि  विद्यापीठांमध्ये वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने महत्त्वाचे स्थान प्राप्त केले असून, मराठवाडा विभागाच्या कृषि  तंत्रज्ञान विकासाला यामुळे मोठी चालना मिळणार आहे.

सध्या कृषि  क्षेत्रात ड्रोनचा वापर पीक संरक्षण फवारणी, खत व्यवस्थापन, सर्वेक्षण, पीक निरीक्षण, नकाशांकन तसेच अचूक शेती (Precision Farming) यासाठी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठाला प्राप्त झालेली ही मान्यता मराठवाडा तसेच राज्यातील कृषि  शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकासासाठी ऐतिहासिक ठरणार आहे.

या केंद्राचे अकाउंटेबल मॅनेजर (Accountable Manager) म्हणून नाहेप–डीएफएसआरडीए सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमुख प्रा. (डॉ.) गोपाल शिंदे हे कार्यभार सांभाळणार आहेत.

प्रा. (डॉ.) गोपाल शिंदे नमूद केले की, नाहेप–डीएफएसआरडीए हा भारतीय कृषि  अनुसंधान परिषद (ICAR), जागतिक बँक आणि भारत सरकार यांच्या अर्थसहाय्याने राबविण्यात आलेला प्रकल्प असून, सन २०१९ ते २०२३ या कालावधीत विविध उद्दिष्टे यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. या प्रकल्पांतर्गत १५,००० हून अधिक शेतकरी, विद्यार्थी, संशोधक आणि शिक्षकांना प्रशिक्षण, संशोधन व लघु प्रकल्पांसाठी सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले असून, विद्यापीठाच्या तांत्रिक गुणवत्तेत लक्षणीय वाढ झाली आहे. या केंद्राने एग्रीबॉट, एग्रीड्रोन, एग्री-एजीव्ही, सेन्सर प्रणाली, इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT), कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशीन लर्निंग (ML), डीप लर्निंग आणि डेटा सायन्स या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. राज्य, देश व विदेशातील ५५ हून अधिक संशोधक विद्यार्थ्यांनी येथे १ ते ३ महिन्यांच्या कालावधीत संशोधन व प्रशिक्षण पूर्ण केले असून, त्यांच्या माध्यमातून १५० हून अधिक संशोधन प्रबंध व पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांसह जागतिक स्तरावरील संशोधन समित्या, परिषद व कार्यशाळांमध्ये नेतृत्व करत या केंद्राने विद्यापीठाचा गौरव वाढविला आहे.

तसेच ते पुढे म्हणाले की, विद्यापीठाने भारतातील पहिले १८० दिवसीय कृषि  ड्रोन प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला असून, आतापर्यंत झालेल्या दोन बॅचमध्ये १०० टक्के प्लेसमेंट साध्य झाले आहे. सध्या तिसरी बॅच सुरू होत आहे. सन २०३६ पर्यंतच्या नियम व अटींच्या अधीन राहून हे केंद्र कार्यरत राहण्यास मान्यता मिळाल्यामुळे विद्यापीठाच्या प्रशिक्षण क्षमतेत मोठी वाढ होणार आहे.

या केंद्राच्या उभारणीस आरपी ड्रोन लिमिटेड यांनी सहभाग नोंदवून शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच डीडीजी श्री. विनय चौरसिया व श्री. सुरेंद्र पंडिता यांनी प्रत्यक्ष तपासणी करून मान्यतेची शिफारस केली असून, सहसंचालक श्री. मनीष कुमार यांनी विद्यापीठास शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतीय कृषि  अनुसंधान परिषद (ICAR), नवी दिल्ली यांनीदेखील या केंद्राच्या स्थापनेबद्दल विद्यापीठाचे अभिनंदन करून शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

विद्यापीठाचे माननीय कुलगुरू, शिक्षण संचालक, संशोधन संचालक, विस्तार शिक्षण संचालक, कुलसचिव, विद्यापीठ नियंत्रक, विद्यापीठ अभियंता तसेच सर्व अधिष्ठाता यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतल्यामुळे हे यश संपादन झाले.

या यशाबद्दल शिक्षण संचालक, संशोधन संचालक, विस्तार शिक्षण संचालक, कुलसचिव, विद्यापीठ नियंत्रक, विद्यापीठ अभियंता, सर्व अधिष्ठाता, प्राध्यापक व कर्मचारी यांनी तसेच डिजिटल एक्स्टेंशन तज्ज्ञ डॉ. प्रवीण कापसे आणि डॉ. शंकर पुरी यांनी प्रा. (डॉ.) गोपाल शिंदे व त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.